कृषी अभियंते बदलू शकतात शेतीचे चित्र

कृषी अभियांत्रिकी पदवीधर हे त्यांच्यासाठीचा अभ्यासक्रम, व्यावसायिक-उद्योग क्षेत्राशी संबंधित प्रशिक्षण, संशोधन प्रकल्प याद्वारे तांत्रिकदृष्ट्या कौशल्यपूर्ण व सक्षम बनवले जातात. त्यांना राज्य शासनाच्या कृषी विभागात सेवेच्या संधी दिल्यास राज्यातील शेतीचे चित्र बदलेल.
संपादकीय
संपादकीय

कृषी खात्यामध्ये कृषी अभियंत्याची गरज लक्षात घेऊन राज्य शासनाने चार कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाला मंजुरी दिलेली आहे. या महाविद्यालयाचा अभ्यासक्रम ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरींग’ या संस्थेने प्रमाणित केलेला आहे. राज्य शासनाच्या कायदा व न्याय विभागाने १९८३ मध्ये महाराष्ट्र कृषी विद्यापीठे अधिनियम १९८३ मधील सेक्‍शन ३५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे कृषी अभियांत्रिकी विद्याशाखेला मान्यता देण्यात आलेली आहे. राज्यातील चारही कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात सद्यस्थितीत पदवी, पदव्युत्तर व आचार्य पदवी अभ्यासक्रम सुरू आहेत. कृषी अभियांत्रिकी विद्याशाखेत पदवी अभ्यासक्रमासाठी मृद व जलसंधारण अभियांत्रिकी, सिंचन व निचरा अभियांत्रिकी, कृषी यंत्रे व शक्ती विभाग, कृषी प्रक्रिया विभाग, विद्युत व अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत विभाग, कृषी प्रक्षेत्र संरचना विभाग, मूलभूत विज्ञान व संगणकशास्त्र विभाग आणि कृषी विद्याशाखेमधील विषय शिकविले जातात. तसेच एक-एक महिन्याचे दोन उन्हाळी व्यावसायिक प्रशिक्षण आणि एक संपूर्ण सत्राचे उद्योग क्षेत्राशी संबंधित प्रशिक्षण, संशोधन प्रकल्प याद्वारे कृषी अभियांत्रिकी पदवीधर हे तांत्रिकदृष्ट्या कौशल्यपूर्ण व सक्षम बनवले जातात.

राज्य सध्या अवर्षण व दुष्काळ या दुहेरी संकटातून मार्गक्रमण करत आहे. मागील चार वर्षापासून दिवसेंदिवस पाऊसमान कमी होत आहे. तसेच हवामान बदलाच्या परिणामामुळे ज्या क्षेत्रात हमखास पाऊस पडत होता त्या ठिकाणी सध्या पाऊस कमी प्रमाणात पडत आहे, किंवा कमी कालावधीत जास्त तीव्रतेने पडून सरासरी गाठत आहे. त्यामुळे दुष्काळाची भीषणता जाणवत आहे. या हवामान बदलामुळे जी क्षेत्रे सद्यस्थितीत सुपीक व जास्त उत्पादन देणारी आहेत ती काही वर्षांनी वाळवंट होतील, असा या क्षेत्रातील संशोधकाचा कयास आहे. या सर्व बाबींवर मात करण्यासाठी कृषी अभियांत्रिकी ज्ञानाचा व मनुष्यबळाचा वापर करून घेणे काळाची गरज आहे. 

मागील ३० ते ४० वर्षांमध्ये राज्यात सिंचन क्षेत्रात अनेक कामे झालेली आहेत. सद्यस्थितीत राज्यात अनेक धरणे व कालवे बांधण्याची कामे झालेली आहेत. जागतीक बॅंकेच्या अर्थसहाय्याने सुद्धा या क्षेत्रात खूप कामे करण्यात आलेली आहेत. जागतीक बॅंकेच्या अर्थसहाय्य देतानाच्या अटी व शर्तीमध्ये कृषी अभियांत्रिकी पदवीधराचा समावेश या कामात असावयास हवा, असे मत नोंदविलेले आहे. सध्या तयार झालेल्या धरणामधील पाणी कालव्याद्वारे शेतीस योग्य यंत्रणेद्वारे नियोजीत ठिकाणी पोचविण्याची कामे व व्यवस्थापनाची कामे राहिलेली आहेत. राज्याचे जलसंपदा व जलसंधारण विभाग या दृष्टीने कामे करतात. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे या योजना राबवीत आहेत. या अभियानाचा सकारात्मक परिणाम या दोन वर्षांत दिसून येत आहेत. त्यामुळे काही विभाग टॅंकरमुक्त झालेले आहेत. सद्यस्थितीत जलसंपदा व जलसंधारण विभागात स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधर कार्यरत आहेत. स्थापत्य अभियंते सिंचन प्रकल्प व कालवे बांधणे आणि देखभाल इत्यादी गोष्टीवर भर देतात. परंतु, जलसंधारणाच्या तांत्रिक पद्धती, पीक पाणी गरज, 

आधुनिक व अतिप्रगत सिंचन पद्धती, लाभक्षेत्रातील सिंचन कार्यक्षमता, पाणी वाटप, पाणी अंदाजपत्रक, एकंदरीत पाणी व्यवस्थापन, पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन व त्यांचा सुयोग्य वापर करण्यासाठी मूलस्थानी जलसंधारण, छोटी-छोटी शेततळी तयार करुन अडचणीच्या वेळी संरक्षित सिंचन देऊन पीक उत्पादनात वाढ, पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, खार जमीन सुधारणा आदी तांत्रिक कामांची माहिती स्थापत्य अभियंत्याना नसते. त्यामुळे ह्या योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत नाहीत. कृषी अभियंते बहुतांश शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांना शेतीशी भावनिक नाते आहे. वर नमूद केलेली सर्व तांत्रिक माहिती कृषी अभियंत्याना त्यांच्या पदवी अभ्यासक्रमात दिली जाते. त्यांच्या या तांत्रिक ज्ञानाचा व मनुष्यबळाचा योग्य ठिकाणी उपयोग केल्यास राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यास मदत होईल. राज्यातील शेतीला सोनियाचे दिवस येतील. 

शासनाच्या वन आणि पर्यावरण विभागामध्ये मृद, जल आणि निसर्ग संवर्धनासाठी सुदुर संवेदन (रिमोट सेंन्सींग) आणि भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी आवश्‍यक असलेले तांत्रिक कौशल्य कृषी अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमात हे पदवीधर प्राप्त करतात. सध्या विकसित होत असलेल्या ड्रोन टेक्‍नॉलॉजी संदर्भातही संशोधन सुरू आहे. पण ते प्रारंभिक स्थितीत आहे. हवामान बदल, अनियमित पर्जन्यमान, वाढत चालले तापमान, भूगर्भातील पाणी पातळी, उपलब्ध पाण्यातून जास्त उत्पादन, स्वत:च्या शिवारातील पाण्याचे संवर्धन, त्याद्वारे संरक्षित सिंचन या सर्व बाबीनुसार शेती संदर्भातील धोरण अंमलबजावणीमध्ये कृषी अभियंता कार्यक्षमरित्या काम करून आपल्या कामाचा ठसा उमटवत आहे. जलयुक्त शिवारामध्येही त्यांची कामे गौरवास पात्र ठरलेली आहेत. त्यांची काही बोलकी उदाहरणे लेखाच्या उत्तरार्धात पाहूया... 

लक्ष्मीकांत राऊतमारे : ९४२१३०५९४३ (लेखक कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात तंत्र  अधिकारी आहेत.)



Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com