बाजारपेठा काबीज करण्याची हीच संधी

कोरोना लॉकडाउननंतर उद्भवलेल्या संकटात गटांद्वारे शेतकरी एकत्र आले. आपल्या शेतमालाची थेट ग्राहकांना मोठ्या प्रमाणात विक्री केली. आता हीच गती कायम ठेवून संघटित होणे व उत्पादन ते प्रतवारी, पॅकिंग, विक्रीपर्यंतची सक्षम मूल्यसाखळी तयार करणे गरजेचे झाले आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांची जबाबदारी म्हणूनच वाढली आहे. येत्या काळात बाजारपेठा काबीज करण्याची मोठी संधी त्यांच्यापुढे चालून आली आहे.
agrowon editorial article
agrowon editorial article

को रोनाच्या वैश्‍विक संकटाशी लढताना जगातील अनेक उद्योग क्षेत्रे हादरून गेली आहेत. भारतात कोव्हिड-१९ ची साथ आटोक्यात आणण्यासाठी २४ मार्चला लॉकडाउन घोषित करण्यात आले. त्यानंतर शेतमालाची वाहतूक, विक्री व्यवस्था कोलमडली. शेतकऱ्यांची मालविक्रीची पारंपरिक साखळी विस्कळीत झाली. त्या काळात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. आता मात्र परिस्थिती सुधारू लागली आहे. बाजार समित्यांची परिस्थिती सुधारू लागली आहे. फिनिक्स पक्ष्याप्रमाणे शेतकरी पुन्हा एकदा नवी उमेद घेऊन उंच भरारी घेण्यासाठी सरसावला आहे. 

शेतकरी उत्पादक कंपनीचा आशावादी मार्ग  कोरोनासारख्या संकटांवर मात करण्याची एकेक योजना आपसूकपणे शेतकऱ्यांसमोर येत आहे. लॉकडाउनच्या काळात पुणे, मुंबई, नाशिक आदी शहरांमध्ये विविध शेतकऱ्यांनी हजारो टन शेतमाल थेट ग्राहकांना विकला. या नव्या व्यवस्थेबद्दल शहरी भागात कौतुक व्हायला लागले. शेतकरी गटांनी निवासी सोसायटीपर्यंत लॉकडाउनच्या अवघ्या चार आठवड्यांच्या काळात आपली साखळी (लिंक) प्रस्थापित केली. अशा संकटांमध्ये आणखी एक मार्ग शेतकऱ्यांना दिसून आला तो म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनीचा. थेट ग्राहकांपर्यंत माल पोचविण्यात या कंपन्यांची मोठी भूमिका आहे. 

शेतकरी कंपन्यांना मिळाले पंख  सन १९५६ च्या भारतीय कंपनी कायद्यात बदल करून २०१३ मध्ये नवा कंपनी कायदा अस्तित्वात आला. या कायद्यात सहकार आणि खासगी कंपनी यांच्या तत्त्वांची सांगड घालून स्वरूप बदलण्यात आले. शेतकरी उत्पादक कंपन्यांना खऱ्या अर्थाने त्यातून पंख मिळाले. सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत ग्राहक आणि शेतकऱ्यांतील दूवा म्हणून शेतकरी उत्पादक कंपन्यांकडे पाहिले जात आहे. राज्यात या कंपन्या आपला विस्तार करताना दिसत आहेत. शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतमालाची विक्री करतो. मात्र त्यास योग्य दर मिळत नसल्याने शासनाकडून विक्री व्यवस्थेतील विविध मार्गांचे शोध सुरू झाले. यात गटशेती, करार शेती, ई-नाम, किरकोळ विक्री साखळी, खासगी मार्केट, थेट विक्री अशा पातळ्यांवर काम सुरू होते. त्यातूनच शेतकरी उत्पादक कंपनीच्या कार्यपद्धतीला शेतकऱ्यांनी उत्साहजनक प्रतिसाद दिला. लॉकडाउनच्या काळात बाजार समित्या ठप्प झाल्या. या बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांना सावरण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाने ''शेतकरी ते ग्राहक'' या संकल्पनेला प्रोत्साहन दिले. 

नव्या बाजारपेठेची चुणूक  शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या कार्यशैलीबाबत समाजात निर्माण झालेली उत्सुकता नव्या बाजारपेठेची चुणूक आहे. विपरीत परिस्थितीत पायाभूत सुविधा व कृषी माल साठवणीसाठी गोदामांची कमतरता असूनही काही शेतकरी उत्पादक कंपन्या नवचैतन्याने काम करीत आहेत. नाशिक जिल्ह्यातील मोहाडी येथील सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांनी लॉकडाउनच्या काळात शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत कसा पोचवावा याचा वस्तुपाठ घालून दिला. शेतकरी उत्पादक कंपन्यांचा पुरस्कार करताना शेतकऱ्याला येणाऱ्या काळात कसं बळ मिळेल याची दिशा दिली. नाशिक जिल्ह्यातीलच दिंडोरी शेतकरी सहकारी उत्पादक कंपनीनेही या काळात चांगली कामगिरी केली आहे. सोसायटीमार्फत ‘ऑर्डर’ घेऊन संलग्न कृषिधन शेतकरी गटामार्फत सुमारे २०० टन भाजीपाला आणि सहा टन नैसर्गिक बेदाण्याला थेट बाजारपेठ देण्याचा प्रयत्न केला. अशी अनेक उदाहरणे राज्यभरात सांगता येतील. 

मूल्यसाखळी सक्षम करण्याची गरज   जागतिकीकरणात बाजारपेठांचा आवाका लक्षात घेऊन पीकनिहाय मूल्यसाखळ्या उभ्या करणं ही काळाची गरज आहे. शेतीचं व्यवस्थापन करताना 'स्वॉट अनालिसीस’ महत्त्वाचं झालं आहे. यामध्ये क्षमता, कमतरता, संधी, धोके या सर्व बाबींचा अंतर्भाव करून शेतकऱ्यांना व्यावसायिक मूल्यांची जोपासना करता येईल. केवळ माल उत्पादित करून पुढील कार्य विनासायास पार पडत नाही. तर उत्पादनानंतर त्या मालाचे पॅकिंग, ग्रेडिंग, त्यावर प्रक्रिया, साठवणूक, मालाचं वितरण, विक्री अशा संपूर्ण रचनेला ''मूल्यसाखळी'' म्हणता येईल. देशात सर्वात जास्त संख्या असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यालाही त्यात कसे सामावून घेता येईल याकडे शेतकरी उत्पादन कंपन्या लक्ष देताना दिसत आहेत.  सद्यःस्थितीत समाजाच्या गरजा झपाट्याने बदलत आहेत. शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोचवणाऱ्या कल्पक योजनांमध्ये महाशेतकरी उत्पादक कंपनीचे (महा एफपीसी) कार्यही उल्लेखनीय आहे. राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांचे ते ‘फेडरेशन’ आहे. सद्यःस्थितीतील संकटांवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली क्षमता वाढवून ग्राहक वितरण साखळी सर्वांगाने सज्ज व सुरक्षित करणे गरजेचे झाले आहे. शहरी ग्राहकांनी दिलेला प्रतिसाद पाहता येणारा काळ शेतकरी उत्पादक कंपन्यांचा आहे, हे  निश्चित! 

डॉ. प्रीती सवाईराम  : ९८८१३७२५८५ (लेखिका ‘यशदा’त सहायक  प्राध्यापिका आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com