agriculture news in marathi agrowon special article on shivjayanti | Agrowon

सद्‍गुणांचे साक्षात प्रतीक

अरुण चव्हाळ 
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021

शिवराय आणि महानता, शिवराय आणि नैतिकता, शिवराय आणि एकात्मता, शिवराय आणि प्रामाणिकपणा, शिवराय आणि सुसंस्कृतपणा अशा सर्वश्रेष्ठ वृत्तीचा एकमेव ‘राजा’ म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची जगात दखल घेतली जाते. शिवजयंतीनिमित्त हा विशेष लेख!
 

‘‘छ त्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हते, तर ते साऱ्या राष्ट्राचे होते. शिवाजी महाराजांचे आपल्या देशावर फार प्रेम होते आणि मानवी सद्‌गुणांचे तर ते साक्षात प्रतीक होते,’’ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी व्यक्त केलेले हे विचार महत्त्वाचे आणि वैश्‍विकही आहेत. सिकंदर, नेपोलियन यांचे लढाऊ व्यक्तिमत्त्व त्या त्या देशातील लेखकांनीही जगासमोर आणलेले आहे आणि जगात भारत महान राष्ट्र आणि छत्रपती शिवराय हे महापराक्रमी स्वराज्य निर्माते म्हणून प्रभावशाली ठरलेले आहेत. शब्दशः शून्यातून स्वराज्य साकारून सुराज्य करणारे शिवाजी महाराज जगापुढे एक मोठा आदर्श मानले जातात. त्यांना प्रेरणा देणाऱ्या वीरमाता जिजाऊ या राष्ट्रमाता म्हणून आपण जाणतो. पण स्वराज्याचा स्रोत ज्यांनी शिवाजी महाराजांमध्ये निर्माण करून रयतेचे राज्य मानले त्या जिजाऊ कष्टाळू - स्वातंत्र्यवृत्तीच्या स्त्रीच्या मनामनांत ‘स्वतंत्रमाता’ आहेत. जगात त्यांच्या कार्याने प्रभावित झालेल्या माताभगिनी त्यांच्या लेकी म्हणून निर्भयपणे वागतात. हा संस्कार निर्माण होणे त्या संस्काराचे संवर्धन होणे यामध्येच जिजाऊंचे व्यापकपण जाणवत राहते. शिवाजी महाराज आग्रा येथे नजरकैद असताना जिजाऊंनी त्यांच्या माघारी सहा महिने राज्य कारभार सुनियोजनपूर्वक सांभाळला. महाराजांनी हे जाणून स्वराज्याचे सुराज्य केलेले आहे. 

मुळातच शिवराय वयाच्या बारा वर्षांतच अनेक विद्या व कलेत सुपरिचित झालेले होते. शहाजीराजे जेव्हा कर्नाटकात मोहिमेवर गेले, त्या वेळी जिजाऊ व शिवराय मायलेकराने पुणे जहागिरी व्यवस्थित सांभाळली. आज जेव्हा आपण सत्य जाणतो, की एका शेतात राबणाऱ्या विठाईचा मुलगा बापाच्या माघारी आपल्या देशाचा उपपंतप्रधान होतो, त्या वेळी त्या माउलीने शिवरायांचे कर्तृत्व त्या मुलाला सांगून घडवलेले असते. त्या उपपंतप्रधान संस्कृतीपुरुषाचे नाव असते यशवंतराव चव्हाण. संस्कार आणि सद्‌गुणांचे असे रूप आणि स्वरूप जाणवते. तेव्हा रयतेचे राजे परिणामकारक ठरत असतात. शिवराय आणि महानता, शिवराय आणि नैतिकता, शिवराय आणि एकात्मता, शिवराय आणि प्रामाणिकपणा, शिवराय आणि सुसंस्कृतपणा अशा सर्वश्रेष्ठ वृत्तीचा एकमेव ‘राजा’ म्हणून त्यांची जगात दखल घेतली जाते. 

सुलतानशाहीमध्ये मराठा सरदारांनी कितीही पराक्रम गाजवले तरी त्यांचे कौतुक तर सोडून द्या, पण हत्या होत असत. अशा अमानवी शाह्या उलथून सामान्य मावळ्यांना आणि जातिधर्माच्या पलीकडे दृष्टी प्रगल्भ करून त्यांच्या कष्टाला उज्ज्वल करणारे शिवराय समाजमनाला उन्नत करत गेले. धाडस, पराक्रम आणि न्यायाचा काटा स्वतः स्वकर्तृत्वावर तोलून धरणारे आणि आपल्यासारखीच माणसं निर्माण करणारे शिवराय शुद्ध शौर्यवीरांचे नायक ठरलेले आहेत. त्यांच्यामुळे महानायकांची फौज आणि त्यांच्या फौजा तयार झालेल्या होत्या. एकीकडे अष्टप्रधान मंडळ आणि दुसरीकडे स्वतःसह अष्टवधानी महानायक यामुळेच स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर करता आले. शिवरायांच्या सैन्यातील सैनिक ‘माणूस’ होऊन सामान्यांशी सौजन्याने वागत आणि आज सैनिकांच्याच व्यथा चौकशीच्या चक्रात-फेऱ्यात बंद केल्या जातात. सामान्यांचे - शेतकऱ्यांचे हाल तर मोठे जीवघेणे आहेत. शेतकऱ्यांच्या पिकांना व गवताच्या काडीला, झाडांना जपण्याचे आदेश शिवरायांनी सैनिकांना दिले आणि आज स्वयंशिस्तीवाले संघासंघाने एकत्रित होऊन शेतकऱ्यांच्या मालाला योग्य किंमत देत नाहीत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना कष्टाची माती करताना असंवेदनशील राज्यकर्ते - राष्ट्रकर्ते शिवरायांचे नाव कशासाठी घेतात? दिवसाला सरासरी दोन ते तीन शेतकरी मरण पत्करतात. तरीही शेतकऱ्यांच्या सोयीची धोरणं होत नाहीत. ऊठसूट देशात सर्व जण शेतकऱ्यांच्या दुःखाचे भांडवल करून लोकशाही बळकट करतात म्हणे? कृषिप्रधान देशात शेतकऱ्याला पत नसणे आणि निवडणुकीत शेतकऱ्याचे स्वमत स्वतःच्या सत्तेसाठी मागताना मतांचा आदर केला जात नाही. भारतरत्न नानाजी देशमुख म्हणाले, ‘‘आपल्या देशात निवडणुका आहेत, लोकशाही नाही,’’ त्याप्रमाणे शेतकरी निवडून येण्यासाठी निवडणुकीपुरते आहेत. लोकशाहीत शेतकरी - शेती मागे ठेवली जाते. वारंवार ‘शेतकरी मेळावे’ जोरदार होतात. शिवरायांचे शेती धोरण-पाणी नीतीचे पोवाडे गायले जातात. किमान त्यांचे नाव घेऊन असे वागणे अनुचित नाही. जगात आज भारत फक्त महाबाजारपेठ ठरलेला आहे. तर शिवरायांनी या राष्ट्रालाच समृद्ध केलेले आहे. त्यांनी त्या काळात ‘पुणे’ उभारले नसते, तर आज परराष्ट्रात प्रवीण पुणे बिंदूएवढेही दिसले नसते. पुण्याची माणसं परदेशात आज जेव्हा जातात तेव्हा ‘शिवरायांच्या पुण्याची माणसं त्या त्या क्षेत्रात पराक्रमी आहेत,’ असा परकीयांचा अभिप्राय आहे. आज त्यांचे नाव घेऊन जगात कुठेही आपण मुक्तपणे श्‍वास घेऊ शकतो. कारण शिवराय म्हणजे सचोटी आणि त्यांच्या मातीतला माणूस म्हणजे कला-क्रीडा ज्ञान सुसंपन्न आहे. हीच जगात ओळख आहे. रयतेचा राजा आणि राजमुद्रा आज जगात मुद्रांकित झालेली आहे. 

‘प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्‍ववंदिता।। 
शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।।’ 

शहाजीचा पुत्र शिवाजी यांची प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी आणि जिला सर्व विश्‍वाने वंदन केले आहे, अशी ही मुद्रा (रयतेच्या) कल्याणासाठी अधिराज्य गाजवते (शोभून दिसते). मुद्रेप्रमाणेच शिवरायांनी स्वराज्याचा सर्वानुआदर राखत सुराज्य निर्माण केले. निवडणुकीतील जाहीरनामा व राजमुद्रा यात फरक आहे आणि त्यांची राजमुद्रा सर्वच राज्यकर्त्यांसाठी ‘राजनीती’ शास्त्र आहे; परंतु त्यांचे नाव वारंवार घेऊन आपल्या राष्ट्रात-राज्यात शिवरायांच्या प्रत्येक धोरणाच्या विरुद्ध राज्यकारभार केला जात आहे. अस्मिता आहेच, पण त्यांच्या माणसांविषयी आपुलकीऐवजी आकुंचन पावताना अनेक जण दिसत आहेत. शिवराय दुष्ट प्रवृत्तीविरोधात लढले. आपण आपल्यात लढत आहोत. आपले आपण समजून न घेण्याचा हा मोठा फरक आहे. शिवरायांनी दुसऱ्याबरोबर आधी आपले नीट केले. आता आपण नीट राहून दुसऱ्यांबरोबर लढू नये. शेवटी लढण्यात वेळ जातो. विकास दूर जातो. काळ असे सांगतो, विकास इतरांना सोबत घेऊन करा. शिवरायांचे आताचे नायक आणि पाईक काळ सुसंगत मार्गक्रमण करतील आणि विकास साध्य करतील. कारण अशी ज्ञानी आणि गुणी माणसंच संस्कृतीचे खरे वारसदार असतात! 

अरुण चव्हाळ 
 ७७७५८४१४२४ 

(लेखक रानमेवा शेती साहित्य मंडळाचे अध्यक्ष आहेत.)


इतर संपादकीय
जैवइंधन निर्मिती-वापरासाठी  हवेत...देशाच्या आर्थिक प्रगतीचा वेग वाढविण्यासाठी इंधन...
जैव उत्तेजक समिती हवी व्यापक शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या जैव उत्तेजकांना (...
बाबासाहेबांच्या सत्याग्रहाचे शास्त्रडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला प्रत्येक लढा...
‘गोल्डनबीन’ला झळाळीविदर्भातील अकोला, वाशीमसह मराठवाड्यातील लातूर...
सहकार्य अन् समन्वयातून सुरू ठेवा बाजार...कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात या विषाणूचा...
कांद्याचा रास्त भाव काय?केंद्र शासनाने नवीन कृषी कायदे लागू केले...
श्रीलंकेचा आदर्श आपण कधी घेणार?श्रीलंका सरकारने पाम तेलाच्या आयातीवर बंदी घातली...
महाराष्ट्रातील मधुक्रांतीची दिशामार्च महिन्यामध्ये ‘मन की बात’मध्ये...
बाजारपेठेचा सन्मान करूयागोरगरिबांना स्वस्तात धान्य उपलब्ध करून...
सालगडी पाहिजेत!काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक जाहिरात फिरत...
आर्थिक प्रश्नचिन्हे कायमचआर्थिक वर्ष २०२१-२२ सुरू झाले आहे. २०२०-२१ हे...
हंगाम गोड, पण साखर कडूचखरे तर २०२०-२१ च्या गळीत हंगामापुढे अनेक आव्हाने...
पुन्हा कोरोना, पुन्हा लॉकडाउनकोरोना संकटाशी दोन हात करण्यासाठी महाराष्ट्रासह...
अस्तित्व टिकविण्यासाठीचा जागतिक संघर्षभारतातच नाही तर इतर अनेक देशांतही शेतकरी आपल्या...
आता पाया करा मजबूतराज्य-राष्ट्राचा कारभार असो की एखाद्या संस्थेचा,...
तंत्र शून्य मशागतीचे, अनंत फायद्याचेसन २०१० च्या दशकातील शेती व्यवसायात जमिनीतील...
दूरचे महासागर आणि आपले हवामानभारतीय शेती मोठ्या प्रमाणात हवामानावर अवलंबून आहे...
कारभारवाडीचा आदर्शलहानमोठ्या धरण लाभक्षेत्रातील तसेच नदी काठच्या...
मूळ प्रश्‍नाला सोईस्कर बगल !जागतिक भूक निर्देशांकातील आकडेवारीनुसार १०७...
संकट अस्मानी आणि सुलतानीहीयावर्षाच्या खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तिन्ही...