डोळे उघडवणारे ‘अदृश्य सत्य’

‘एफएओ’च्या या ‘अदृश्य सत्य’ अहवालावर सर्वत्र चर्चासत्र आणि कार्यशाळा घेऊन आपल्या शेतकऱ्यांना सेंद्रिय कर्बाचे महत्त्व आणि सुपीक जमिनीबद्दल शिक्षित करणे हे शेतीचे भविष्यामधील पुढचे पाऊल असणार आहे.
sampadkiya
sampadkiya

संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या (एफएओ) रोम येथील मुख्यालयात २ ते ४ मे २०१८ या तीन दिवसांच्या कालावधीत ‘माती प्रदूषण’ या विषयावर एक आंतरराष्ट्रीय परिषद झाली. मातीच्या सुपीकतेमध्ये अडथळे निर्माण करणाऱ्या विविध घटकासोबत मातीला जोडलेली अन्नसुरक्षा, पर्यावरण आणि या सर्वांचा मानवी आरोग्यावर होत असलेला परिणाम यावर चर्चा होत असताना या गोष्टी नियंत्रणात कशा आणता येतील यावरही प्रकाश टाकण्यात आला. जगातील अनेक कृषी आणि मृदातज्ञ येथे आवर्जून हजर होते. या परिषदेचा सविस्तर अहवाल ‘एफएओ’ने मातीचे प्रदूषण: ‘एक अदृश्य सत्य’ या शीर्षकाखाली ५ मे रोजी प्रसिद्ध केला आहे. जगामधील विविध राष्ट्रे आणि त्यांची धोरणे राबविणारी उच्च यंत्रणा यांच्यासाठी जागतिक आरोग्य संघटना, जागतिक अन्न आणि कृषी संघटना, युनिसेफ, युनेस्को यांचे वार्षिक अहवाल आणि त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या परिषदा या खऱ्या अर्थाने मार्गदर्शक असतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालावरून गरीब आफ्रिकन राष्ट्रांची आरोग्य विषयक धोरणे ठरून त्यांना मोठ्या प्रमाणावर जागतिक स्तरावर मदत ही मिळते, त्याचबरोबर जागतिक अन्न आणि कृषी संघटना आफ्रिका आणि आशिया खंडामधील अनेक गरिब, अविकसित राष्ट्रांना सातत्याने कृतीशील मार्गदर्शन करत असते. ‘एफएओ’चा मातीचे प्रदूषण : ‘एक अदृश्य सत्य’ हा अहवाल आज कृषी जगताचे डोळे खऱ्या अर्थाने उघडणारा ठरलेला आहे.

शेतकरी आणि त्याची जमीन हे एकमेकांस आई मुलासारखे घट्ट जोडलेले असतात. जमीन पिकली तरच शेतकऱ्यास उभारी मिळते. एक खचला तर दुसरा पूर्ण खचून जातो आणि हे विदारक दृश्य आज आपण सर्वत्रच पहात आहोत. कसे ओळखणार मातीचे प्रदूषण? वळवाच्या पावसाचे टपोरे थेंब जेंव्हा उन्हामध्ये भाजलेल्या जमिनीवर पडतात तेंव्हा मातीमधून नकळत एक वेगळाच सुगंध बाहेर पडू लागतो. हाच तो सुगंध जो तुमची जमीन प्रदूषणमुक्त आहे, हे सांगत असतो. मातीमध्ये परोपकारी जिवाणू आणि बुरशी यांचे फार मोठे साम्राज्य असते. यांना जोडणारा अजून एक जैविक घटक तेथे असतो आणि त्याचे नाव ‘अॅक्टिनोमायसिट्स’. जमीन सुपीकतेचा हा फार महत्त्वाचा दर्शक आहे. उन्हाळ्याच्या दाहक उष्णतेमध्ये जमिनीच्या वरच्या थरात असलेला हा सजीव घटक नेहमी सुत्पावस्थेत राहतो, मात्र पहिल्या पावसाचे थेंब जमिनीवर पडताच तो सुत्पावस्थेत बाहेर पडून जमीन सुपीक करण्याच्या आपल्या कार्यास वेगाने सुरवात करतो. पहिल्या पावसाच्या वेळी बाहेर पडणारा हा मातीचा गंध ही त्याच्या श्रीमंतीची रासायनिक क्रिया आहे. पहिल्या पावसाचा गंध आपणास घनदाट जंगलात नेहमीच जाणवतो दुर्देवाने शेतामधून तो हरवला आहे. मातीच्या गंधावर मराठीमध्ये कितीतरी कविता, लेख आहेत. या गंधावर मूलभूत विज्ञानामध्ये भरपूर संशोधन ही झाले आहे. मात्र रासायनिक खतावर आधारित प्रगत शेती तंत्रज्ञानात आज हा गंध उपेक्षित झाला आहे. तुमची जमीन सेंद्रिय असेल, तिच्यामध्ये सेंद्रिय कर्ब आणि त्यास जोडलेली सुपीकता असेल, तर तेथे हा गंध हमखास येणारच. 

सेंद्रिय कर्ब हे ‘अॅक्टिनोमायसिट्स’चे मुख्य खाद्य आहे. हे खाद्य कमी होऊ लागले की मातीमधील हा घटक नष्ट होऊ लागतो म्हणजेच तुमची जमीन प्रदूषित होत आहे. पहिल्या पावसात गोठ्यामधील वासरे श्वास घेऊन सैरभैर होतात ती याच गंधामुळे. जंगलामधील तृणभक्षी प्राण्यांसाठी हा गंध म्हणजे दिवाळीचा आनंदच असतो. हा गंध म्हणजे प्रदूषणमुक्ती आणि मातीमधील जैवविविधतेचा खरा जयजयकार. पहिल्या पावसाच्या दहा पंधरा मिनिटांच्या शिडकाव्यानंतर आपण आपल्या शेतावर याचा जरूर अनुभव घ्या. ‘अॅक्टिनोमायसिट्स’चा पुन:श्च जन्म आणि त्या निर्मितीमधील हा सुवास जैव समृद्ध शेतीचा हसरा चेहरा आहे. जमिनीमध्ये घातलेली रासायनिक खते आणि कीडनाशके हा गंध लोप पावण्यास कारणीभूत ठरतात. पिकांचे अवशेष त्याच जमिनीत गेले तर पहिल्या पावसात तेथे हा गंध येणारच; पण आपण जमीन तणमुक्त करून पिकांचा मुळापासून ते शेंड्यापर्यंतचा प्रत्येक अवशेष ओरबाडून शेती आरशासारखी स्वच्छ करतो; मात्र नंतर या आरशामधील जमिनीची दुखावलेली प्रतिमा पाहिली की मनस्वी दु:ख होते. तुम्हाला उत्पन्न देणे हे एवढेच जमिनीचे कार्य नाही तर तुमच्याबरोबरच कोट्यवधी जिवांचा तिला सांभाळसुद्धा करावयाचा आहे, हे आपण विसरून जातो. अशा प्रदूषित मातीमधील उत्पादित अन्न सत्त्वहीन असते आणि म्हणूनच शेती अशाश्वत होते.  पूर्वी विहिरी भरलेल्या होत्या, शेतीला पाटाचे पाणी होते. बांधावर वृक्ष होते आणि जमिनीस एक वर्षाआड विश्रांतीसुद्धा. जमिनीस गंध येण्यासाठी हे सर्व आवश्यक होते. आज यातील काहीही उरलेले नाही. जमिनीस खोल छिद्रे पाडून आपण पिकांना क्षारयुक्त पाणी देतो आणि माती प्रदूषण वाढवतो. ठिबक सिंचनावर उत्कृष्ट उत्पादन देत असतानाही ऊस पिकास कोट्यवधी लिटर पाणी पाजले जाते. यामुळेच पश्चिम महाराष्ट्रात आज हजारो एकर शेती क्षारामुळे नापीक झाली आहे. हे सर्व माती प्रदूषणच आहे. मात्र, या संवेदनशील विषयावर कुणीही बोलावयास तयार नाही. पाणी देण्यासाठी अनेकवेळा सांडपाण्याचा वापर होतो. त्यामुळेही माती प्रदूषित होऊन अन्न सुरक्षा आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. रासायनिक खतामुळे जमीन हलकी होते तिच्यामध्ये वालुकामय घटकांचे प्रमाण वाढते ही प्रदूषित माती आहे. 

मातीचे वाढते प्रदूषण हा जमीन सुपीकतेच्या दिशेने होणाऱ्या शाश्वत कृषी प्रवासामधील फार मोठा अडथळा आहे. अशी माती जमिनीमध्ये विविध प्रकारच्या कीड जोपासणीस प्रोत्साहन देते, परोपकारी जिवांना असाह्य करते. आज आपण जल, वायू, ध्वनी प्रदूषणास महत्त्व देतो कारण ते आपणास प्रत्यक्षात जाणवतात मात्र शेतकऱ्यांच्या जीवनाशी खेळणाऱ्या त्याच्या शेतजमिनीमधील या अदृश्य प्रदूषणास आम्ही पूर्ण दुर्लक्षित करत आहोत. ‘एफएओ’च्या या ‘अदृश्य सत्य’ अहवालावर सर्वत्र चर्चासत्र आणि कार्यशाळा घेऊन आपल्या शेतकऱ्यांना सेंद्रिय कर्बाचे महत्त्व आणि सुपीक जमिनीबद्दल शिक्षित करणे, हे शेतीचे भविष्यामधील पुढचे पाऊल असणार आहे. मातीला गंध असेल तरच शेतीचा आनंद लुटता येऊ शकतो, हे लक्षात घ्यायला हवे.

DR. NAGESH TEKALE ः ९८६९६१२५३१ (लेखक शेतीप्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com