शर्यतीतील बैलांवरील ताणतणाव नियोजन

मागील आठवड्यात बैलगाडा शर्यतीसंबंधी ‘ॲग्रोवन’मध्ये दोन लेख प्रसिद्ध करण्यात आले होते. त्या लेखांवर राज्यभरातून खूप प्रतिक्रिया आल्या. काही शेतकरी-पशुसंवर्धकांनी शंका उपस्थित केल्या, तर काहींनी सूचनाही केल्या. त्याचीही चर्चा होणे गरजेचे आहे. म्हणून हा लेख प्रपंच!
agrowon editorial article
agrowon editorial article

बैलगाडा शर्यतीसाठी अत्यंत पद्धतशीरपणे निवडलेल्या गाय व खोंडापासून तयार झालेल्या खोंडांना निवडून त्यांना प्रशिक्षित केले जाते व त्यांचा वापर शर्यतीसाठी केला जातो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अशा प्रकारच्या जोड्यांच्या माध्यमातून या शर्यतीसाठीच्या खोंडांचे संवर्धन केले जाते. त्याला प्रशिक्षित करताना विशिष्ट प्रकारचा आहार देऊन शर्यतीसाठी तयार केले जाते. या ठिकाणी नैसर्गिक संयोगाद्वारेच त्यांचे उत्पादन घेतले जाते. अशा खोंडांना वयाच्या सहा महिन्यांपासून अत्यंत काळजीपूर्वक प्रेमाने प्रशिक्षण दिले जाते. त्याला घरातीलच एक प्रतिनिधी समजून वागणूक दिली जाते.

पूर्ण वाढ झालेला खोंड सरळ उंच मान, विशिष्ट पद्धतीचे शिंगे, तुकतुकीत कांती असणारा हा खिलार खोंड विविध यात्रा, जत्रा उरूस या ठिकाणी पशू प्रदर्शनात सादर केला जातो. अशा प्रकारच्या संवर्धन करणाऱ्या पशुपालकांच्या नजरेतून अशा विशिष्ट गुणांच्या आधारावर अशा खोंडांची निवड केली जाते. त्याचा वापर शर्यतीसारख्या सांस्कृतिक व पारंपरिक खेळांद्वारे मनोरंजनासाठी केला जातो. सर्वसाधारण माणसांप्रमाणेच खेळ, शर्यती, प्रदर्शन, प्रशिक्षण त्याचबरोबर या सर्वांसाठी होणारी त्या खोंडांची वाहतूक यामुळे पशुधनावर ताण निश्‍चितच येतो. जे बैल या सर्व गोष्टींना रुळलेले असतात ते हा ताण सहजतेने सहन करतात. एका दुसऱ्या दिवसाच्या विश्रांतीने पूर्ण नॉर्मल होऊन जातात. हे सर्व त्यांच्या सोयीचे होऊन गेल्यामुळे ते कधीही मोठ्या तणावाखाली येत नाहीत. त्यामुळे आपल्याला कधीही गर्दीत घुसणे, गर्दीपासून दूर पळणे असे प्रकार अत्यंत क्वचित पाहायला मिळतात. खरे कौशल्य हे त्यांना हाताळणे, त्यांच्यावर काबू करून व्यवस्थित त्यांना स्पर्धेच्या ठिकाणी वाहून नेणे यामुळे येतो.

पाळीव जनावरे सहसा कमी ताण घेतात. साधारणपणे जनावरांचा स्वभाव हा आनुवंशिक असतो. त्याचा परिणाम हा त्यांच्या हाताळणीच्या वेळी दिलेल्या प्रतिसादावर होऊ शकतो. परंतु एकंदरीतपणे, अशा बैलांची नियमित हाताळणी तसेच स्पर्धेसाठी होणारा प्रवास हा तितका तणावपूर्ण नसतो. ज्या जनावरांना नियमित प्रशिक्षण आणि सराव असतो त्या बैलांवर तणाव येत नाही. ज्या बैलांना त्याची सवय नाही त्याच्यावर मात्र थोडा ताण जाणवतो. जनावरांना नियंत्रणात आणण्यासाठी केलेल्या सर्व कृती या थोड्या फार प्रमाणात बैलांवर ताण वाढवतात. तथापि, या बैलांना लहान वयातच त्याचे व्यवस्थित प्रशिक्षण दिले असेल, नियमित काळजी घेणाऱ्या सोबत असेल तर बैल ताण घेत नाहीत. तणावाला दिलेला प्रतिसाद हा बैलांपरत्वे स्वाभाविक असतो, हा सुद्धा त्याला दिलेल्या प्रशिक्षण कालावधी व त्याच्या प्रकारावर अवलंबून असतो. त्यामुळे योग्य प्रशिक्षिकांमार्फत दिलेल्या योग्य प्रशिक्षणामुळे निश्‍चितच ताण कमी होतो. 

प्रशिक्षक ज्या वेळी प्रशिक्षण कालावधीत दररोज कमीत कमी पंधरा मिनिटे अशा प्रशिक्षणार्थी खोंडासोबत घालवतो, त्या वेळी खोंडांमध्ये हाताळणी, वाहतुकीदरम्यान येणारा ताणतणाव नाहीसा होऊन शांत होतात. अशा खोंडांना योग्य तालीम मिळाल्यास लवकरच ते चांगल्या प्रकारे पळू शकतात. पाळीव प्राण्यांना प्रशिक्षित करणे तुलनेने सोपे असते. प्रशिक्षण कालावधीतील मिळालेला, सोसलेला ताणतणाव हा हळूहळू नंतर त्यांच्या जीवनाचा  अविभाज्य भाग बनतो, पुढे जाऊन त्याची त्याला सवय होते. तो ताण सहन करून सहज स्वीकारला जातो. खोंडाना योग्य वयात प्रशिक्षण मिळाल्यास ते प्रौढपणी सर्व ताण सहन करू शकतात. प्राण्यांना प्रशिक्षण म्हणजे शिकवणे, विशिष्ट परिस्थिती किंवा उत्तेजना यांना प्रतिसाद देणे त्याचबरोबर वर्तन सुधारणा व शिकणे समाविष्ट आहे. प्रशिक्षण हे सहवास, शोध, संरक्षण आणि मनोरंजन यासांरख्या हेतूसाठी असू शकते. आजकाल प्रशिक्षणातून काही घोडे स्पर्धात्मक खेळासाठी तयार केले जातात.

ऑलिंपिक खेळापर्यंत त्यांचा खेळाडू म्हणून देखील वापर सुरू आहे. उधळणे, सैरभैर होणे हे सर्व प्रकारच्या जनावरांत जसे की शेळ्या, मेंढ्या, घोडे, गाय, बैल, म्हैस यांच्यात सारखंच असतं. माणसांची गर्दी असेल तर काहीवेळा हे घडू शकतं. पण ज्या जनावरांची हाताळणी, संवर्धन मानवाच्या सानिध्यात झाले आहे, पूर्णपणे माणसाळले आहेत अशी जनावरे कमी प्रमाणात उधळतात अथवा सैरभैर होतात. जंगली जनावरे अथवा पाळीव नसलेली जनावरे यांच्यात ही समस्या मोठ्या प्रमाणात दिसते.

खूर असणारे सर्व प्राणी हे आपल्यावर हल्ला करणाऱ्या शिकारी प्राण्यापासून दूर पळण्यासाठी प्रसिद्ध आहेत. एक खूर असणाऱ्या घोड्याप्रमाणे दोन खूर असणाऱ्या जनावरातील पायांची रचनाही पळण्यासाठीच विकसित झाली आहे. दोन खूर असणारे प्राणी, जनावरे हे हल्ला करण्यासाठी व पळून जाण्यासाठी आपल्या पायांचा चांगला उपयोग करू शकतात. शरीररचनेत पोटाचा आकार हा एखाद्या छोट्या पिंपासारखा सुटसुटीत असतो. राज्यातील खिलार, देवणी जातीच्या बैलांत अशा प्रकारे निमुळते होत जाणारे पोट असते. तथापि, गाईंमध्ये मात्र मोठ्या स्थूल आकाराच्या पिंपासारखा पोटाचा आकार असतो हे धावण्याच्या क्षमतेवर निश्‍चित परिणाम  करतात. 

एकंदरीत शर्यतीतील बैलावरील ताण हे क्षणिक असतात, पण त्याचे नियोजन हे त्याला दिलेल्या प्रशिक्षणामुळे होत असते. विश्रांतीनंतर काही तासांत ते पूर्वपदावर येतात. तथापि, त्यांना जर शारीरिक इजा पोहोचवली तर मात्र त्याचे परिणाम दीर्घकाळ राहतात. ते शरीरावरील जखमा, मुरगळलेल्या शेपट्या यातून दिसून येते, जे सर्वमान्य होऊ शकत नाही. प्राण्यांची, जनावरांची क्षमता सिद्ध करण्यासाठी विशिष्ट चौकटीचे पालन हे करावेच लागेल. जेव्हा एखादी परीक्षा घेतली जाते, त्या वेळी परीक्षार्थी नापास झाला तर परीक्षा घेणे ही क्रूरता ठरत नाही, पण परीक्षकासोबत जर परीक्षार्थी विचित्र पद्धतीने वागला तर ती क्रूरता ठरू  शकते.  (संदर्भ: Running ability  of bulls 2018)

डॉ. व्यंकटराव घोरपडे  ९३२५२२७०३३

(लेखक पशुसंवर्धन विभागातील सेवानिवृत्त सहायक आयुक्त आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com