agriculture news in marathi, agrowon special article on subhabhul | Agrowon

सुबाभळीपासून मिळवा चारा, इंधन आणि ऊर्जाही

नंदिनी निंबकर   
गुरुवार, 7 फेब्रुवारी 2019

शेतकऱ्यांना सुबाभूळ लावणे फायदेशीर होण्यासाठी चाऱ्याबरोबर त्यामध्ये इतर उपयोग असणेही आवश्यक आहे. सुबाभळीचे लाकूड ऊर्जा निर्माण करण्यासाठी, तसेच कागद-निर्मितीसाठी कच्चा माल म्हणूनही वापरता येईल. 
 

बाभूळ (Leucaena leucocephala) ही एक वेगाने वाढणारी वृक्षजाती आहे. ती मध्यम घनतेचे लाकूड (तिच्या जलद विकासामुळे) आणि पाल्यापासून अव्वल दर्जाचा प्रथिनयुक्त चारा देते. तसेच, तिच्या मुळांमध्ये होणाऱ्या नत्राच्या स्थिरीकरणामुळे माती सुधारते. या सर्व फायद्यांमुळे १९८० च्या दशकाच्या सुरुवातीला सुबाभूळ हवाईतून भारतात आणण्यात आली. भारत सरकारने हरित आच्छादन वाढवणे तसेच ग्रामीण कुटुंबांना इंधन पुरवणे यासाठी सुरू केलेल्या सामाजिक वनीकरणाच्या कार्यक्रमाचा तो एक भाग होता. 

अपारंपरिक ऊर्जास्त्रोत खात्याने (DNES) (नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय-MNRE चा पूर्वीचा अवतार) सुद्धा बायोमास गॅसिफायर ऊर्जानिर्मिती कार्यक्रम सुरू केले. परंतु, यामार्गे निर्माण केलेल्या विजेचा उत्पादन खर्च अधिक असल्यामुळे हा कार्यक्रम अयशस्वी झाला आणि ऊर्जानिर्मात्यांनी लाकूड विकत न घेतल्यामुळे सुबाभळीची लागवडही बंद झाली. सुबाभूळ तणासारखी पसरत असल्यामुळे तिचे निर्मूलन काही झाले नाही. उलट बऱ्याच ठिकाणी ती वेगाने पसरली. १९८० च्या दशकाच्या शेवटापर्यंत सुबाभळीचा प्रसार करण्यात भारत सरकारला काही रस राहिला नाही, कारण त्याच्या तुलनात्मकदृष्ट्या मऊ लाकडाला इमारती लाकूड म्हणून सोडाच, पण सरपण म्हणूनही विशेष मागणी नव्हती. मात्र, अलीकडे सुबाभूळ हे आकर्षक चारा पीक म्हणून जगभर ओळखले जाऊ लागले आहे. सुबाभळीमध्ये चांगला चारा म्हणून असणारे गुणधर्म, तसेच इंधन व कागदासाठी लगदा पीक यासाठी तिचे मूल्य यामुळे भविष्यात भारतात तिला महत्त्व प्राप्त होऊ शकेल. 

नोव्हेंबर २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे एक आंतरराष्ट्रीय सुबाभूळ परिषद घेण्यात आली. जगभरातील संशोधकांनी (भारताचे प्रतिनिधी म्हणून मी व डॉ. अनिलकुमार राजवंशी असे दोघेच होतो) सुबाभळीच्या विविध उपयोगांवर आणि तिच्याखालील क्षेत्र कसे वाढवायचे, यावर चर्चा केली. ही परिषद २० वर्षांपेक्षा जास्त काळानंतर (यापूर्वीची १९९७ साली व्हिएतनाम येथे झाली होती) घेण्यात आली.  यावरून सुबाभळीला चारा म्हणून नव्याने मिळालेल्या लोकप्रियतेची खातरजमा झाली. सुबाभूळ ही जनावरांसाठी चांगल्या पावसाच्याच नव्हे, तर कोरडवाहू आणि दुष्काळप्रवण प्रदेशातही अतिउत्तम चारा पीक आहे, असे जवळजवळ सर्व शास्त्रज्ञांनी आणि संशोधकांनी दाखवून दिले. परिषदेत सादर केलेली बहुतेक सर्व आकडेवारी सुबाभळीच्या पाल्याच्या भक्षणातून वाढलेल्या मांस उत्पादनाबद्दल असली, तरी सुबाभळीच्या पाल्याचा थोड्या प्रमाणात पशुआहारात समावेश करण्याने दुग्धोत्पादनात वाढ होते. त्यायोगे पेंडीसारख्या पूरक खुराकाची गरज कमी होते किंबहुना संपतेही हे सर्वश्रुत आहे. आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये बऱ्याचशा मोठ्या (१५०० ते ३००० हेक्टर) शेतांना भेटी दिल्या आणि तिथे गुरे फक्त सुबाभूळ-गवत कुरणांवर चरत असल्याचे आढळून आले. सुबाभळीमध्ये मायमोसिन हे पोषणविरोधी संयुग आढळते आणि त्यामुळे जनावरांना विषबाधा होऊ शकते. परंतु, या परिषदेत अनेक संशोधकांनी दाखवले की सुबाभळीचा पाला खाद्य म्हणून द्यायला सुरुवात केल्यावर थोड्याच काळात जनावरांच्या कोठीपोटात (rumen) जिवाणूंचे अनुकूलन होऊन ते मायमोसिनचे विघटन करू शकतात. शिवाय संशोधकांनी असे जिवाणू ओळखून काढले आहेत, की जे जनावरांच्या कोठीपोटात सोडले असता मायमोसिनला पूर्णपणे निष्प्रभ करतात. 

भारतात चाऱ्याची फार मोठ्या प्रमाणावर टंचाई आहे. बऱ्याच ठिकाणी उभारल्या जात असलेल्या जनावरांच्या छावण्या याला साक्षी आहेत. लहानमोठ्या सर्व प्राण्यांसाठी आपल्याला चाऱ्याची गरज असते आणि चराई कुरणांचे मोठे क्षेत्र नसल्यामुळे (ऑस्ट्रेलिया, युरोप आणि अमेरिकेतल्याप्रमाणे) सुबाभळीचा पाला तोडून व सुकवून जनावरांना खायला घालण्याची गरज आहे. परंतु, शेतकऱ्यांना सुबाभूळ लावणे फायदेशीर होण्यासाठी तिला इतर उपयोग असणेही आवश्यक आहे.  त्यासाठी सुबाभळीचे लाकूड ऊर्जा निर्माण करण्यासाठी, तसेच कागद-निर्मितीसाठी कच्चा माल म्हणून वापरता येईल. सुबाभूळ लाकडाचा उपयोग कागदाच्या लगद्यासाठी कच्चा माल म्हणून भारतात आधीपासूनच करण्यात येत आहे. बहुधा सुबाभळीच्या लाकडाचा कागदाचा लगदा बनवण्यासाठी वापर करणारा भारत हा एकमेव देश असावा. भारत सरकारचे कागद लगद्यावरील आयात शुल्काविषयीचे धोरण हे आयातदारांपेक्षा स्थानिक कागद गिरण्यांना धार्जिणे बनवले, तर हा कार्यक्रम आणखीही पसरण्यास वाव आहे. सध्या कागद लगद्यावर आकारण्यात येणारे आयात शुल्क अत्यल्प असल्यामुळे सुबाभळीची लागवड आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरत नाही. सुबाभळीचा वापर ऊर्जानिर्मितीसाठी करणे सध्या तरी त्यापेक्षा जास्त चांगला पर्याय ठरेल.

१९९० च्या दशकाच्या सुरुवातीला निंबकर अॅग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटने कृषी अवशेष आणि त्याला पूरक म्हणून सुबाभळीच्या लाकडांचा वापर करून त्यापासून प्रत्येक तालुक्यात १० मेगावॉट वीजनिर्मिती करण्याचे तालुका जैवभार धोरण विकसित केले होते. हे धोरण MNRE ने राबवले होते आणि त्याची फलश्रुती राष्ट्रीय जैवभार आधारित वीज प्रकल्पांमध्ये झाली. अशा तऱ्हेने विद्युत संयंत्रे ही वीज आणि चारा या दोन्हींचे स्त्रोत बनू शकतील. आमच्या अभ्यासावरून असे दिसून आले आहे, की ५ मेगावॉट वीजनिर्मितीसाठी सुबाभळीखाली १६०० हेक्टर लागवड करण्याची गरज आहे. यापासून दर वर्षी सुमारे १२ हजार टन सुक्या चाऱ्याचे (पाला आणि बारीक काड्या) उत्पादन होऊ शकेल. हा चारा सुमारे ७५०० जनावरांसाठी पुरेल.  देशभर निरनिराळ्या तालुक्यांमध्ये अशी अनेक केंद्रे उभारली असता ऊर्जा आणि चारा उत्पादनाचे विकेंद्रीकरण साधता येईल. सुबाभळीपासून हेक्टरी वर्षाला सरासरी ५ ते १० टन सुका चारा आणि ४० ते ५० टन लाकडाचे उत्पादन होऊ शकते. उच्च प्रथिनयुक्त सुक्या चाऱ्याचा सध्याचा रुपये १२ प्रति कि. ग्रॅ. हा दर पाहता सुबाभळीच्या फक्त चाऱ्यापासून वर्षाला प्रतिहेक्टर रुपये ६० हजार उत्पन्न मिळवणे शक्य आहे. लाकडापासून रुपये २ प्रति कि. ग्रॅ. या दराने पूरक उत्पन्न मिळू शकेल. अशा तऱ्हेने एक हेक्टरपासून शेतकऱ्यांना वर्षाला रुपये एक लाख ४० हजार इतके उत्पन्न मिळू शकते. 

आमच्या आकडेमोडीवरून असेही दिसून आले आहे, की सुबाभळीच्या ताज्या लाकडांचा रुपये २ प्रति कि. ग्रॅ. हा दर धरला, तर विजेची किंमत प्रतियुनिट (किलोवॅटवर) रुपये ५.७० इतकी होईल. ही वीज सूर्य ऊर्जेपासून तयार केलेल्या विजेपेक्षा महाग आहे, पण डिझेल जनरेटरच्या माध्यमातून निर्माण केलेल्या विजेपेक्षा स्वस्त आहे. परंतु या योजनेचे प्रमुख आकर्षण हे आहे ,की ती विकेंद्रित आहे आणि सूर्यऊर्जा उपलब्ध असो-नसो वर्षभर चालू शकते. ही योजना यशस्वी करण्यासाठी लाकूड आणि पाला कापण्याची यंत्रे विकसित करण्याची गरज आहे, तसेच पाला आणि लाकूड दोन्हींचे चांगले उत्पादन देणाऱ्या सुबाभळीच्या जाती उत्तम संशोधन आणि विकासातूनच निर्माण होऊ शकतील.  

नंदिनी निंबकर       

ईमेल : nnimbkar@gmail.com
(लेखिका निंबकर अॅग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट (नारी) फलटणमध्ये कार्यरत आहेत.)     


इतर संपादकीय