ऊस घ्यायचा नाही तर पर्याय सांगा

‘पाण्याच्या उपलब्धतेनुसार हवी पीकरचना’ आणि ‘जलसाक्षरतेतून करूया दुष्काळावर मात’ या रमेश पाध्ये यांच्या लेखांत ऊस पीक घेणे शेतकऱ्यांनी तात्काळ थांबवावे, असे मत मांडले आहे. त्यास उत्तर म्हणून शेतकऱ्यांच्या बाजूने मत मांडणारा हा लेख...
संपादकीय
संपादकीय

महाराष्ट्रात उसाची लागवड ९.८ लाख हेक्टर क्षेत्रावर केली जाते. सध्या उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार ऊस पिकासाठी १५०० ते २००० मि. मी. पाणी प्रति वर्ष प्रति हेक्टर लागते. केळी पिकासाठी हे प्रमाण १२०० ते २२०० मि. मी. व द्राक्ष पिकासाठी ५०० ते १२०० मि. मी. पाणी लागते. इतर नगदी पिकांच्या तुलनेत उसाची पाण्याची गरज जास्त आहे हे उघड आहे. सध्याच्या घडीला उपलब्ध असणारे प्रगत तंत्रज्ञान वापरून आपण हा आकडा अजून कमी करू शकतो किंबहुना मोठ्या प्रमाणात तो प्रयत्न होताना दिसत आहे. परंतु ऊस पिकावर सरसकट बंदी हा यावरील मार्ग इष्ट वाटत नाही. १९९० च्या दशकात उसाला मोकाट पद्धतीने पाणी दिले जात असे. पाण्याचा वारेमाप वापर झाल्यामुळे सांगली भागातील कितीतरी शेतजमिनी क्षारपड झाल्या हे सर्वश्रुत आहे. काळ बदलला, नवीन तंत्रज्ञान आले त्यामुळे १९९० च्या दशकातील मोकाट पाणी देण्याच्या पद्धतीचे नियम आजच्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला लावणे योग्य होणार नाही. आज ऊस उत्पादक शेतकरी ठिबक सिंचन पद्धत वापरतो प्रगतिशील शेतकऱ्यांच्या शेतावर आज स्वयंचलित सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञान कार्यरत आहे. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे पाण्याचा सुयोग्य वापर सुरू आहे. 

ऊस उत्पादक पाण्याचा अनावश्यक वापर करतोय, असा समज करून घेणे चुकीचे आहे. कित्येक ऊस उत्पादक एकरी पाण्याच्या वापराचे प्रत्येक लिटरचे नियोजन करत असतात. उदाहरणच द्यायचे झाले तर पाण्याच्या कार्यक्षम वापरासंदर्भात पश्चिम महाराष्ट्रात काही सहकारी संस्था कार्यरत आहेत. गोटखिंडी हे वाळवा तालुक्यातील एक छोटेसे गाव आहे. हे गाव संपूर्ण बागायती असून तेथे ऊस शेती केली जाते. या गावात प्रगतीशील ऊस उत्पादक विनायक पाटील यांची ४५ एकर उसाची शेती आहे. पाटील यांनी सहकार तत्त्वावर शेतकऱ्यांचा गट स्थापन करून राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याच्या मदतीने ६०० एकर क्षेत्रावर स्वयंचलित ड्रीप सिस्टीम बसवली आहे. १६ मि.मी. च्या लॅटरल वापरल्या असून ताशी एक लिटर डिस्चार्ज असणारे ड्रीपर त्यांनी बसवले आहेत. या ६०० एकर क्षेत्रासाठी ते दिवसाला ९० लाख लिटर पाणी उपसतात. यावरून वर्षभराचा विचार केला तर पावसाचा हंगाम सोडून दहा महिन्यांत एक एकर ऊसासाठी ते ४५ लाख लिटर पाण्याचा वापर करतात. सध्या उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार एका वर्षात ऊस पिकासाठी एकरी ८० लाख लिटर पाणी लागते. यानुसार विनायक पाटील वापरत असलेले पाण्याचे प्रमाण निम्मे आहे. त्याच सोबत त्यांची उसाची लागवड ७ फूट अंतरावर असल्यामुळे पाण्याचा पुरवठा उसाच्या मुळाजवळ केला जातो. इतरत्र होणारा पाण्याचा ऱ्हास टाळला जातो. इतक्या कमी पाण्यात काटेकोरपणे वर्षाचे ऊसाचे नियोजन अनेक शेतकरी करत आहेत. अशा पद्धतींचा विस्तार शासकीय यंत्रणामार्फत झाला, तर येणाऱ्या काळात कमी पाण्याचा वापर करून उसाची शेती सर्वदूर करता येऊ शकेल.

मागील काही वर्षांपासून बहुतांश शेतमाल कवडीमोल भावाने विकावा लागत आहे. अशा परिस्थितीत ऊस हे पीक शेतकऱ्याला सुरक्षित वाटते. ऊस पिकासाठी एफआरपी असल्यामुळे शेतकऱ्याला दराची किमान हमी आहे. एक एकर क्षेत्रात सरासरी ५० टन ऊस कारखान्यास गेला तरी वर्षभराचा उत्पादन खर्च वजा करता एकरी अंदाजे एक लाख रुपये शिल्लक राहतात. त्यामुळे शेतकरी ऊस पिकाकडे आकर्षित होत आहेत. फळपिके, नगदी पिके अस्मानी संकटे जसे की गारपीट, मुसळधार पाऊस, कमी किंवा जास्त तापमानात होणारे बदल याला बळी पडून आर्थिक नुकसान होण्याची शक्यता प्रचंड आहे. ऊस पीक अशा ताणांना प्रतिकारक्षम असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही जमेची बाजू आहे. आर्थिक बाबतीत जर ऊस पिकाचा विचार केला, तर उसाचे बिल हे एक गठ्ठा शेतकऱ्याच्या हातात येते. त्यामुळे वर्षभराचे खर्चाचे नियोजन करणे सोपे जाते. ऊस पिकावर अवलंबून असणारा साखर उद्योग कुशल व अकुशल कामगारांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देतो. ऊस वाहतुकीसाठी लागणारे ट्रॅक्टर, ट्रक, बैलगाडी हे देखील पुरवणारे शेतकरीच असून या व्यवसायातून देखील शेतकऱ्याला पैसे कमावण्याची संधी आहे. आज नामांकित सह्याद्री सहकारी साखर कारखाना, यशवंतनगर यांच्याकडे १५० ट्रॅक्टर-बैलगाडी, ३७५ ट्रॅक्टर, १५ ट्रक, ११०० बैलगाडी इतका लवाजमा असल्याचे ज्ञात आहे. एक बैलगाडी या मागे २ मजूर, एक ट्रॅक्टर किंवा ट्रकमागे ८ ते १० मजूर काम करतात. एका साखर कारखान्यात कायमस्वरूपी जवळपास १००० कर्मचारी असतात. हंगामी १५० ते २०० लोकं काम करतात. या सर्वांचा हिशोब केल्यास एक कारखाना किती लोकांना रोजगार उपलब्ध करून देतो याचा अंदाज लागेल. ऊस पिकावरील सरसकट बंदी आणल्यास वरील सर्व लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो याचादेखील विचार व्हायला हवा.

पाध्ये यांच्या मते ऊस पीक सोडून भाजीपाला, फळपिके या पिकांकडे वळले पाहिजे. आज भारतातील ऊसाखालील क्षेत्र ४४ लाख हेक्टर पेक्षा जास्त आहे. फळ पिकांमध्ये द्राक्ष पिकाचे एकूण क्षेत्र साधारणपणे १.४ लक्ष हेक्‍टर तर डाळिंबाचे एकूण क्षेत्र २.५ लक्ष हेक्टरपेक्षा अधिक आहे. त्यामुळे उसाखालील क्षेत्र १० टक्क्यांनी जरी या फळपिकांकडे वळले तर बाजारपेठेत अशा पिकांची आवक होऊन त्याची परिस्थिती अक्षरश: सध्याच्या कांदा, बटाटा सारखी होऊन जाईल. जर बारमाही भाजीपाला केला तर त्यासाठी लागणारे एकूण पाणी हे ही जवळपास ऊस पिका इतकेच किंवा अधिक लागू शकते. शेतकरी जेव्हा एखाद्या पिकाची लागवड करण्याचे पाऊल उचलतो त्यामागे त्याचा अनेक पिढ्यांचा मोठा अभ्यास असतो. त्यामुळे त्याला असा अनाहूत सल्ला देणे योग्य होणार नाही.

उत्पन्नाची हमी देणारे, कीड रोगांचे प्रमाण नियंत्रणात असणारे, कमी उत्पादन खर्च लागणारे दुसरे काही पर्याय आहेत का? शेतकऱ्याला ऊस लावू नका म्हणून सुचवणाऱ्यांनी हे पण सुचवावे की नक्की काय केल्यास उसासारखे किमान खात्रीशीर उत्पन्न मिळेल. ज्या दिवशी तो पर्याय मिळेल तेंव्हा इतर कुणी सांगण्यापूर्वी तो पर्याय घेताना शेतकरी आपल्याला दिसेल.

डॉ. अंकुश चोरमुले ः ९७३००००६२३ (लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com