मराठवाड्यात उसाला पर्याय हवाच

ब्राझीलमध्ये अॅमेझॉनच्या घनदाट जंगलालगत शेकडो हेक्टरवरची सलग ऊस शेती मी पाहिली. जंगल श्रीमंतीमुळे जमिनीत कायम ओलाव्यासोबत सेंद्रिय कर्बाचे वाढते प्रमाण म्हणून हा देश ऊस उत्पादन, साखर आणि इथेनॉल निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. मराठवाड्याकडे यापैकी काय आहे?
संपादकीय.
संपादकीय.

यावर्षी मराठवाड्यात पडलेला तुटपुंजा पाऊस, ६६ पैकी ५६ तालुक्यांत दुष्काळ, अनेक गावांत सुरू असलेले पाण्याचे टँकर आणि चारा छावण्या, अशा दाहक परिस्थितीतही शिवारात उभ्या असलेल्या ऊस पिकाचा विभागीय आयुक्तांनी अभ्यास करून महाराष्ट्राच्या इतर चार भौगोलिक क्षेत्राच्या तुलनेत मराठवाड्यात घटत असलेले ऊस क्षेत्र, त्याची उत्पादन क्षमता, उसावर अवलंबून असणारे साखर कारखाने, त्यांच्यावरचा कर्जाचा डोंगर, शेतकऱ्यांचे देणे यामुळे कारखानदारी कशी तोट्यात जात आहे, याचा सविस्तर अहवाल ऑगस्ट महिन्याच्या शेवटी महाराष्ट्र शासनास सादर केला आहे. गेल्या एक दशकापासून मराठवाडा दुष्काळात भाजला जात आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे आजही जायकवाडीचा अपवाद वगळता मराठवाड्यामधील अनेक लहान, मोठे, मध्यम जल प्रकल्प पाण्याची पातळी मृत साठ्याच्या खाली दाखवत आहेत. पिण्याच्या पाण्याला अग्रक्रम देण्यासाठी सतत तहानलेल्या ऊस पिकावर मराठवाड्यात बंदी असावी, हा आयुक्तांचा अहवाल शासन आणि शेतकरी या दोघांचेही डोळे उघडणारा आहे. 

भौगोलिक परिस्थितीचा विचार करता ऊस हे पश्चिम महाराष्ट्राचे पीक. या पिकाला सांभाळण्यासाठी या भागात शेकडो लहान मोठे जल प्रकल्प आणि दुधडी भरून वाहणाऱ्या नद्या आहेत. मराठवाड्यात यातील काहीही नाही म्हणूनच जमिनीला हजारो छिद्रे पाडून आम्ही ऊस शेती करत आहोत, तरीही पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्याचे ऊस उत्पादन प्रति हेक्टरी अर्धेसुद्धा नाही. मागील वर्षी दुष्काळामुळे महाराष्ट्रामधील ऊस उत्पादन जवळपास ४० टक्क्यांनी कमी झाले. औरंगाबाद जिल्ह्यात असलेले ऊस उत्पादन आज १.४ लाख टनावरून ०.८ लाख टनांपर्यंत खाली आले आहे. धरणामधील पाणी उसाला की लोकांना पिण्यासाठी या पार्श्वभूमीवर आयुक्तांचा अहवाल खुपच काही सांगून जातो. हा अहवाल शासनाने स्वीकारला अथवा बासनात ठेवला तरी मराठवाड्याच्या उसाला या संतभूमीमध्ये पर्याय शोधणे ही काळाची गरज आहे.

हा शासकीय अहवाल अभ्यासपूर्ण असावा, कारण यामध्ये मराठवाड्यात जेथे जमिनीचे वाळवंट झाले आहे, तेथे ऊसासाठी ठिबक सिंचनसुद्धा कितपत यशस्वी होईल यावर शंकाच व्यक्त केली आहे. तापमान कमी असेल आणि जमिनीमधील सेंद्रिय कर्ब जास्त असेल तर ठिबक जास्त यशस्वी होते. सेंद्रिय कर्बाबद्दल मराठवाड्यात आनंदच आहे. ऊस कटाई कामगार सर्वात जास्त बीड जिल्ह्यामध्ये आहेत. त्यांच्या अनेक समस्या आहेत, त्यात मुकादमाकडून उचलेले कर्ज, प्रतिवर्षी होणारे ५-६ महिन्यांचे स्थलांतर, मुलांच्या शिक्षणाची होणारी हेळसांड, स्त्रिया आणि मुले यांच्या आरोग्य समस्या या सर्व या ऊस शेतीला जोडलेल्या आहेत. ऊस उत्पादन थांबवायचे असेल तर या समस्येवर प्रभावी उपाय हवा.

सहा दशकांपूर्वी मराठवाड्यात ऊस हे एक शाश्वत पीक होते. कारण त्या वेळी शेतकऱ्याची विहीर पाण्याने भरलेली असे, मोटेने पाणी दिले जात असे अथवा ज्याची शेती नदीकिनाऱ्‍यावर होती तोच ऊस पिकवत असे. साखर कारखाने कुठे दिसतच नव्हते. गूळ उत्पादन एवढाच उद्देश होता. गावामधील पाच पन्नास तरुणांना रोजगार देणारा हा व्यवसाय होता. काळ बदलला आणि ऊस बाळाचे ‘नगदी पीक’ असे बारसे झाले. बाळ मोठे होऊ लागले, सगळ्या लहान मोठ्या वावरात फिरू लागले. त्याची पाण्याची आणि रासायनिक खतांची भूक वाढू लागली. ती भागवताना नद्या, विहिरी आटल्या, धरणामधील गाळ दिसू लागला, घरामध्ये गुळाच्या ढेपीऐवजी खतांची पोती आली, पण बाळाची भूक थांबत नव्हती. ‘बोअरवेल’ पाषाण फोडून खोल जाऊ लागल्या, भूजलाचा उपसा सुरू झाला आणि सोबत पाणीटंचाईही. ऊस पिकाला विरोध नसावा, जर ते पावसाच्या साठवलेल्या जलावर ठिबकच्या साहाय्याने सेंद्रिय पद्धतीने घेतले असेल तर! भूगर्भामधील पाचशे फुटाखालचे शुद्ध जल उपसून अशी शेती करणे पर्यावरणासाठी घातक आहे.

मराठवाड्यामधील हजारो शेतकऱ्यांची ऊस शेती आज पाण्याअभावी वाळून गेली आहे. चारा छावण्यात जनावरांना वाळलेला ऊस खाऊ घातला जात आहे. अनेकांनी भुकेल्या जनावरांना आपल्या ऊस फडामध्ये सोडले आहे. यातून आपण काय शिकणार आहोत? ब्राझीलमध्ये अॅमेझॉनच्या घनदाट जंगलालगत शेकडो हेक्टरवरची सलग ऊस शेती मी पाहिली. जंगल श्रीमंतीमुळे जमिनीत कायम ओलाव्यासोबत सेंद्रिय कर्बाचे वाढते प्रमाण म्हणून हा देश ऊस उत्पादन, साखर आणि इथेनॉल निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. मराठवाड्याकडे यापैकी काय आहे? ऊस शेती, घसरते भूजल आणि बदलते वातावरण यावर कुठंही मंथन होत नाही. मराठवाड्यातील एका ऊस शेतीजवळच्या रसवंतीजवळ मी या वर्षी भर उन्हाळ्यात दुपारी मित्रांसह थांबलो होतो. शेतामधील चार ऊस तोडून त्याने आम्हाला तीन ग्लास रस दिला. दीड एकरावर लावलेला तो ऊस तीन बोअर, विहिरी सुकवून चौथ्यावर कसातरी जगत होता. रसाचा घोट घेताना त्या चरखामध्ये गेलेल्या चार उसांनी पिलेल्या दहा घागरीचे पाणी मला समोर दिसत होते. ‘‘साहेब, हे सगळे सोडून मी आता शहरात जाणार, हातावरचे पोट, डोक्यावर कर्ज, जसे मिळेल ते खाऊ, पण हा ऊस आता नको.’’ एका ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वास्तवाचे ते गणित होते.

मराठवाड्यामधील अंदाजे दीड लाख शेतकरी तीन लाख हेक्टरच्या वर ऊस पिकवून त्यास २०० लाख लिटर पाणी प्रति हेक्टरी पाजत आहेत. हे चित्र पाहिल्यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही की आज मराठवाड्यात दुष्काळ आहे. ऊस या पिकाने आज हजारो अल्पभूधारकांना उद्ध्वस्त केले आहे. ठिबकचा अट्टहास करून ऊस लागडीस प्रोत्साहन देण्यापेक्षा याच अनुदानामधून हजारो ऊसतोड मजुरांचे स्थलांतर सहज थांबवता येते. अरबस्तानामधील हजारो मैल पसरलेल्या वाळवंटात अनेक ठिकाणी खजूर शेतीचे हिरवे ठिपके दिसतात.

मराठवाड्याच्या एकेकाळच्या सुपीक शेतीचे आज झालेले वाळवंट आणि या वाळवंटात पसरलेली उसाची शेती मला खजूर शेतीप्रमाणे भासते. फरक एवढाच की खजूर हे वाळवंटामधील शाश्वत उत्पादन देणारे पीक आहे आणि आमच्याकडचा ऊस हे शाश्वत उद्ध्वस्तीच्या महामार्गावरील मैलाचा दगड आहे. या दगडावर एकच आकडा लिहिलेला आहे. ‘मराठवाडा ऊस क्षेत्र ३ लाख १३ हजार हेक्टर’. दुष्काळ ही संधी समजून भूगर्भातील जलउपशावरच्या ऊस शेतीस कडधान्यांचा शाश्वत पर्याय देऊन जमिनीमधील कर्ब वाढविणे म्हणजेच दुष्काळी संधीचे खरे सोने, म्हणूनच अशा ऊस बंदीच्या शिफारशीचा अहवाल मला सोन्याच्या पेढीसारखा वाटतो.

डॉ. नागेश टेकाळे ः ९८६९६१२५३१ (लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com