ऊर्ध्व मानार प्रकल्पातील हुकाचुकी

ऊर्ध्व मानार हा प्रकल्प देशातले एक आदर्श उदाहरण व्हावे, असा मूळ प्रयत्न होता, पण जे इतर सिंचन प्रकल्पात घडते तेच इथेही घडले आणि शेवटी हाती धुपाटणेच आले. ऊर्ध्व मानार प्रकल्पात नेमक्या काय चुका झाल्या, त्याचा या लेखाद्वारे थोडक्‍यात आढावा घेऊया...
agrowon editorial article
agrowon editorial article

महाराष्ट्रातला एकही सिंचन प्रकल्प बिनचूक नाही आणि नियोजनाप्रमाणे एकही प्रकल्प पूर्ण झाला नाही. अगदी लहानात लहान पाझर तलावाचे उदाहरण घ्या. उस्मानाबाद आणि लातूर मिळून एक जिल्हा असताना सिंचन सुविधा वाढविण्यासाठी पाझर तलाव खोदायची मोठी मोहीम राबवली गेली. त्यात काही हजार तलावांची निर्मिती झाली. काम संपल्यावर लक्षात आले की बहुतांश तलावांच्या तळाला काळा पाषाण आहे. त्यातून पाणी खाली झिरपत नाही. साठवलेल्या पाण्याची वाफ होऊन वातावरणात उडून जाते. करायला गेले पाझर तलाव, झाले बाष्पीभवन तलाव! जिल्हा जलमय झाला म्हणून नेते आणि तंत्रज्ञांनी स्वत:ची पाठ थोपटली.

१९८०-९० च्या दशकात मराठवाड्यात सिंचन खात्याने ३०० उपसा सिंचन योजना उभारल्या. सर्व निरर्थक ठरल्या. त्यातली एकही योजना दोन हंगामसुद्धा धड चालली नाही. सामान जागीच सडल्यावर ते काढून भंगारात विकले. नद्यांवर किती बंधारे बांधले त्याची गणती नाही. ते तुटले, फुटले, नदी किनाऱ्याला भगदाडे पडली. सुपडा साफ! लघू सिंचन प्रकल्प लोकांनी मागितले म्हणून नाही, तर सिंचन खात्याला वाटले तिथे झाले. तयार केले अन् वाऱ्यावर सोडून दिले. मध्यम प्रकल्प जागा असेल तिथे झाले. धरण, कालवे बांधण्यासाठी अशा एका एका प्रकल्पावर कोट्यवधी रुपये खर्च झाले. हेसुद्धा सवतीच्या लेकरांसारखे पोरके झाले. दुरुस्तीची सोय नाही. लाभक्षेत्रात पन्नास गावांचा शिवार असेल तर त्यातल्या पाच गावांनाही धड पाणी पुरत नाही.

मेल्यात ना जित्यात! छोट्या ते मध्यम प्रकल्पांची अशी अवकळा, त्यापेक्षा मोठ्या धरण क्षेत्रात तर शोककळाच दृष्टीला पडते. आवाक्‍यात असलेले लहान प्रकल्प नीट हाताळता येत नाहीत, तिथे मोठ्या प्रकल्पांची अवस्था चांगली असेल अशी अपेक्षा करणेच चुकीचे आहे. त्यांच्या भरवशावर पीक नियोजन करता येईल, अशी कुठे परिस्थिती नाही. जेव्हा केव्हा पाणी सुटेल तेव्हा शेतात उभे असलेले पीक भिजवायचे अशी पद्धत रुढ आहे. अशा परिस्थितीत फक्त ऊस बसतो. जास्त पाणी झाले तर ऊस उमळत नाही आणि ताण पडला तर हा म्हणता वाळत नाही. एकरी दहा टनांपासून तीस टनांपर्यंत काही ना काही हमखास उत्पादन मिळते. म्हणून कालव्याचे पाणी तिथे ऊस, असे समीकरण पक्के झाले आहे. 

प्रकल्पात हुकाचुका होतात. ते बिघडतात. निरुपयोगी ठरतात आणि टीकेचा विषय बनतात, हे कोणालाही रुचणारे नाही. ज्यांच्या दुष्कृत्यांमुळे हे घडते त्यांनासुद्धा मनाची लाज वाटत असावी. घडत असलेला प्रमाद कोणाला दिसत नाही असे नाही, पण थोडेथोडके का होईना लोकांचा फायदा होईल या उदात्त हेतूने अपराध पोटात घातले जातात. ऊर्ध्व मानार देशातले एक आदर्श उदाहरण व्हावे, असा मूळ प्रयत्न होता, पण जे इतर प्रकल्पांत घडते तेच इथेही घडले आणि शेवटी हाती धुपाटणेच आले. काय चुका झाल्या त्याचा थोडक्‍यात आढावा घेऊ. 

पाण्याची मात्रा ठरविणे हा प्रकल्प संकल्पनाचा आत्मा म्हणता येईल. एका पाळीला दर हेक्‍टरी किती पाणी द्यायचे आणि दोन पाणी पाळ्यात किती दिवसांचे अंतर ठेवायचे हाच हिशेब मुळात चुकला. 

पिकांचे प्रकार, जमिनीची पाणी धारण क्षमता, हवामान आणि सिंचन पद्धतीची कार्यक्षमता या प्रमुख घटकांचा अभ्यास करून पाण्याची मात्रा ठरवावी लागते. असा अभ्यास झाला नाही. गृहीत धरलेली मात्रा गरजेपेक्षा खूप कमी धरली गेली.  जेवढे पाणी तेवढाच मोठा पाइप. पाणी कमी धरल्यामुळे लहान आकाराचे पाइप वापरले गेले. 

कालव्यापासून मायनरवरच्या पहिल्या तोटीपर्यंत जमिनीला पाणी मिळत नाही. लाभक्षेत्र म्हणून घोषित झालेल्या बऱ्याच भूभागापर्यंत पाणी नेले नाही. महसूल विभागाने अशा जमिनीचे खरेदी विक्रीचे कर वाढवले. 

कित्येक तोट्यांना कधीच पाणी येत नाही. काही तोट्या कधी बंद तर कधी चालू होतात. तोटीतून पडणाऱ्या पाण्याला दाब नसतो.  पाच, सहा शेतकऱ्यांत मिळून एक तोटी दिली आहे. पाणी कमी असल्यामुळे शेतकऱ्यांची आपसात भांडणे होतात.  पाइपमध्ये साचलेला गाळ काढण्यासाठी एअर कॉंप्रेसरचा वापर होतो. त्याच्या अतिदाबाने पाइपचे जोड निखळून गळती सुरू होते. 

मायनरच्या मुखाशी बसवलेल्या तकलादू जाळ्या वारंवार तुटतात. कचरा पाइपमध्ये शिरून ते बंद होतात.  फूटतूट झालेल्या आकाराचे पाइप बाजारात मिळत नाहीत. उत्पादक एक दोन पाइप पाठवत नाही.  

या चुका दुरुस्त करणे शक्‍य आहे. प्रकल्पावर झालेल्या खर्चाच्या मानाने दुरुस्तीचा खर्च नगण्य असणार आहे. दुरुस्त्या बिनचूक होतील अशी खबरदारी घ्यावी लागेल. चुकांची दुरुस्ती चुकीच्या पद्धतीने झाली तर चुकांच्या चक्रव्यूहातून कधीच बाहेर पडता येणार नाही. ऊर्ध्व मानार प्रकल्प पूर्ण दुरुस्त करता येईल याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे. पाणी शेतीत चमत्कार घडवून आणू शकते याची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. म्हणून पाणी व्यवस्थापनाकडे नव्या दृष्टीने बघणे अगत्याचे आहे.

जागतिक स्तरावर पीक उत्पादन तंत्र व अन्नप्रक्रिया उद्योगात प्रचंड बदल झाले आहेत. जास्त पैसा देणाऱ्या प्रक्रियाक्षम पिकांचे उच्च तंत्रज्ञान वापरून उत्पादन केल्यास आज भिकेला लागलेल्या खेड्यांमध्ये श्रीमंती मावणार नाही. शेतीला वेळच्या वेळी खात्रीशीर पाणी मिळाले आणि हाती थोडा पैसा खुळखुळला तर लोकांच्या कर्तबगारीला उधान येते. सामाजिक परिवर्तनाचे वारे स्वयंस्फूर्तीने वाहू लागतात आणि एका उत्साही, निरोगी, आनंदी आणि संपन्न समाजाचा आविष्कार होतो. ग्रामीण भागाच्या संपूर्ण क्रांतीची ताकद पाणी या संसाधनात आहे. म्हणून लोकांनी पुढाकार घेऊन सिंचन प्रकल्पात सुधारणा कराव्यात. या चळवळीला तांत्रिक मार्गदर्शन करणे हे महाराष्ट्र सिंचन सहयोगचे ब्रीद आहे.

बापू अडकिने ः ९८२३२०६५२६ (लेखक महाराष्ट्र सिंचन सहयोगचे उपाध्यक्ष आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com