agriculture news in marathi agrowon special article on VASANT PANCHAMI - A FESTIVAL OF FARMERS | Agrowon

वसंत पंचमी म्हणजे आनंदोत्सव

डॉ. नागेश टेकाळे
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021

आज १६ फेब्रुवारी अर्थात ‘वसंत पंचमी.’ पंजाब आणि मध्य प्रदेशमध्ये शेतकरी आपल्या मोहरीच्या फुललेल्या शेतात सहकुटुंब सहपरिवार जाऊन हा सण म्हणण्यापेक्षा आनंदोत्सव साजरा करतात. सकारात्मक उद्देशाने केलेली शाश्वत शेती ही नेहमीच वसंत पंचमी असते.

वसंत पंचमी म्हणजे शेतकऱ्यांसाठी आनंद उत्सवाची पर्वणीच! कारण हा शुभ दिवस त्यांच्या शेतात पिकणाऱ्या आणि फुलोऱ्यात आलेल्या मोहरी या पिकाचा आहे. मध्य प्रदेशमध्ये तेथील शेतकरी शेकडो एकरवर सलगपणे मोहरीचे उत्पादन घेतात. काश्मीर, पंजाब, हरियाणा, राजस्थान राज्यातही या पिकाचा सन्मान केला जातो. हिवाळ्यामध्ये ‘मकाई की रोटी अन् सरसो का साग’ त्यात शुद्ध तूप टाकलेले हे या राज्यांमधील शेतकऱ्यांचा पंचपक्वानासारखा पौष्टिक आहार असतो.

भारतीय संस्कृतीमधील प्रत्येक सणवार आणि उत्सव यास कायम कृषी आणि निसर्गाची जोड आहे. शेती, शेतकरी, त्यांचे गोधन, वाहणाऱ्या नद्या, शेतातील पिके यांच्या आनंदामधूनच प्रत्येक सणाचा उगम झाला आहे पण आज हे चित्र बदलले दिसते. फक्त पोळा, दक्षिणेकडचा पोंगल, पंजाबामधील बैशाखी आणि वसंत पंचमी यांचा अपवाद वगळता आता शेतकऱ्यांचे फारसे सण आढळत नाहीत. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर या सहा ऋतू मध्ये वसंत ऋतूला ऋतुराज म्हटले आहे. पंचमीला वसंताचे आगमन होते म्हणून यास ''वसंत पंचमी'' म्हणतात. या दिवशी पिवळ्या रंगास बरेच महत्त्व असते. पंजाब आणि मध्य प्रदेशमध्ये शेतकरी आपल्या मोहरीच्या फुललेल्या शेतात सहकुटुंब सहपरिवार जाऊन हा सण साजरा करतात. अंगावर पिवळे वस्त्र विशेषतः स्त्रियांनी नेसलेल्या पिवळ्या साड्या आणि मोहरीच्या शेतामध्ये फुललेल्या पिवळ्या फुलांच्या साथीने त्यांचे एकत्र नृत्य, सुमधुर गाणी म्हणजे आनंदाला उत्थान आलेले असते. अनेकजण लहान मुलामुलींसह पतंग उडवितात. शेतात भरपूर धान्य पिकू दे, उत्पादनांचे उच्चांक प्राप्त होऊ दे आणि घरोघरी आनंद नांदू दे, अशी प्रार्थना केली जाते. प्रतिवर्षी गहू, मोहरी आणि तूर उत्पादनांचे रेकॉर्ड मोडणाऱ्या मध्य प्रदेश राज्याचा आणि तेथील शेतकऱ्यांचा या वसंत पंचमी उत्सवावर फार विश्वास आहे. या उत्सवाची तयारी कित्येक दिवस आधीच सुरू असते. आपल्याकडे ज्याप्रमाणे गणपती, दिवाळीला सर्वांना घरी बोलावतात त्याप्रमाणे त्यांच्याकडे वसंत पंचमीला नातेवाईक, मित्रमंडळींना त्यांच्या पिवळ्याधमक मोहरीच्या शेतात भोजन आणि नृत्य कार्यक्रमास आवर्जून आमंत्रित करतात. 

पंजाब बरोबरच मॅक्सिकन गव्हाच्या संकरित जातीसाठी अजून एका राज्याची निवड करावयाची होती तेव्हा हरित क्रांतीचे पितामह डॉ. नॉर्मन बोरलॉग यांनी मध्य प्रदेशला पसंती दिली ती तेथील फुललेल्या मोहरीच्या शेतांमुळेच. त्यावेळी मध्य प्रदेशमध्ये त्यांचे स्वागत शेतामधील या फुलांनीच केले होते. ‘‘किती सुंदर आहे हा फुलांचा आणि शेतकऱ्यांचा देश’’ हे त्यांचे उद्गार अजूनही तेथील वयोवृद्ध शेतकरी विसरलेला नाही. 
सहा वर्षापूर्वी मी काश्मीरच्या गुलमर्ग रस्त्यावर अशाच फुललेल्या मोहरीच्या फुलांचा आनंद शेतात जाऊन उपभोगला होता. सर्वत्र बर्फाची चादर आणि त्यामध्ये मोहरीच्या फुलांची सुबक नक्षी आणि त्यापाठीमागे उंच चिनार वृक्ष पाहिल्यावर काश्मीरला नंदनवन का म्हणतात, हे सहज कळून जाते. मोहरी हे येथील शेतकऱ्यांचे पारंपरिक पीक आहे. मोहरीच्या तेलामुळे काश्मीरचा शेतकरी हिमालयाच्या चढ उतारावर अपार कष्ट करून शेत पिकवतो. कारण त्यांच्या आहारात या तेलाचा समावेश असतो. म्हणूनच काश्मीरच्या खोऱ्यात केशर, सफरचंद या बरोबरच मोहरीच्या पिकालाही मोठा सन्मान आहे. पिवळा रंग हा ताणतणाव कमी करतो. त्याचबरोबर तो सकारात्मकतेचा स्रोत सुद्धा आहे. पिवळ्या रंगामुळे सणवार, उत्सव यांचा आनंद द्विगुणित होतो म्हणून तर नवरात्री, दसरा, दिवाळी आणि वसंत पंचमीला कारळे, झेंडू, शेवंती आणि मोहरीच्या फुलांना महत्त्व असते. उत्तराखंडामध्ये वसंत पंचमीला शेतामध्ये शेणाच्या गोवऱ्यांचा ढिगारा करतात. त्यांच्यावर मोहरीची पिवळी फुले ठेवून त्याभोवती वर्तुळाकार पाणी फिरवतात. शेताला हा सेंद्रिय खताचा नैवेद्य व जास्त उत्पादनाचे प्रतीक म्हणून पिवळी फुले असा याचा अर्थ आहे. आजही उत्तराखंडमध्ये सर्वत्र सेंद्रिय शेती व अनेक ठिकाणी मोहरीचे पीक घेतले जाते. निसर्गाची पुजा करणारा येथील शेतकरी विकास गंगेमध्ये त्यांचा काहीही दोष नसताना मात्र उध्वस्त होत आहे. पंजाबामध्ये तांदूळ, गहू आणि मोहरीचे प्रचंड उत्पादन होते. जेव्हा वसंत पंचमीला मोहरीचे शेत पिवळ्या फुलांनी फुललेले असते, तेव्हा बाजूच्या शेतामधील गहू आनंदाने डोलत असतो. तेथील शेतकरी असे म्हणतात, शेतात मोहरी फुलली 

की गहू भरण्यासाठी धान्याची पोती कमी पडू लागतात. 
वसंत पंचमीपासून उत्तरेकडे अजून एक छान प्रथा सुरू होते. गावात ज्या ठिकाणी होळी पेटवली जाते त्या जागेवर लाकडाचा एक मोठा ओंडका आणून ठेवतात. यानंतर पुढील ४० दिवस प्रत्येक घरामधून अमंगल विचारांची एक एक गोवरी या ओंडक्यावर आणून ठेवली जाते. फाल्गुन पौर्णिमेला बरोबर ४० दिवसांनी होळी पेटवली जाते आणि या अमंगल विचारांचे, प्रवृत्तीचे दहन होते. शेतकऱ्यांच्या आनंदाचा हा स्रोत मोहरीच्या पिकांसह हरित क्रांतीच्या महाप्रवाहात वातावरण बदलाचे हेलकावे खाणाऱ्या शेतीरुपी नौकेच्या माध्यमातून आजही टिकून आहे हे विशेष! शेती हा एक एकेकाळी आनंद लुटण्याचा उत्सव होता आणि अजूनही तो आहे. आनंद हा शोधावयाचा असतो. एक थेंब मधासाठी मधमाशीला १०० फुलांना तरी भेट द्यावी लागते तेव्हा तिला तो स्वर्गीय आनंद मिळतो, आम्हांला मात्र तो दोन-तीन पिकांमधूनच हवा असतो. मध्य प्रदेश आणि उत्तरेकडील शेतकऱ्यांनी वसंत पंचमीस मोहरीच्या पिवळ्या फुलामध्ये हा आनंद शोधला, आपण सुद्धा तसाच प्रयत्न करावयास हवा. शेतात पिकणारे प्रत्येक पीक जेव्हा शेतकऱ्यास वसंत पंचमीचा आनंद देईल तो दिवस खऱ्या अर्थाने बळीराजाचा उत्सव असेल. सकारात्मक उद्देशाने केलेली शाश्वत शेती ही नेहमीच वसंत पंचमी असते.

डॉ. नागेश टेकाळे
 ९८६९६१२५३१

(लेखक शेती प्रश्नांचे  अभ्यासक आहेत.)


इतर संपादकीय
जैवइंधन निर्मिती-वापरासाठी  हवेत...देशाच्या आर्थिक प्रगतीचा वेग वाढविण्यासाठी इंधन...
जैव उत्तेजक समिती हवी व्यापक शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या जैव उत्तेजकांना (...
बाबासाहेबांच्या सत्याग्रहाचे शास्त्रडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला प्रत्येक लढा...
‘गोल्डनबीन’ला झळाळीविदर्भातील अकोला, वाशीमसह मराठवाड्यातील लातूर...
सहकार्य अन् समन्वयातून सुरू ठेवा बाजार...कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात या विषाणूचा...
कांद्याचा रास्त भाव काय?केंद्र शासनाने नवीन कृषी कायदे लागू केले...
श्रीलंकेचा आदर्श आपण कधी घेणार?श्रीलंका सरकारने पाम तेलाच्या आयातीवर बंदी घातली...
महाराष्ट्रातील मधुक्रांतीची दिशामार्च महिन्यामध्ये ‘मन की बात’मध्ये...
बाजारपेठेचा सन्मान करूयागोरगरिबांना स्वस्तात धान्य उपलब्ध करून...
सालगडी पाहिजेत!काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक जाहिरात फिरत...
आर्थिक प्रश्नचिन्हे कायमचआर्थिक वर्ष २०२१-२२ सुरू झाले आहे. २०२०-२१ हे...
हंगाम गोड, पण साखर कडूचखरे तर २०२०-२१ च्या गळीत हंगामापुढे अनेक आव्हाने...
पुन्हा कोरोना, पुन्हा लॉकडाउनकोरोना संकटाशी दोन हात करण्यासाठी महाराष्ट्रासह...
अस्तित्व टिकविण्यासाठीचा जागतिक संघर्षभारतातच नाही तर इतर अनेक देशांतही शेतकरी आपल्या...
आता पाया करा मजबूतराज्य-राष्ट्राचा कारभार असो की एखाद्या संस्थेचा,...
तंत्र शून्य मशागतीचे, अनंत फायद्याचेसन २०१० च्या दशकातील शेती व्यवसायात जमिनीतील...
दूरचे महासागर आणि आपले हवामानभारतीय शेती मोठ्या प्रमाणात हवामानावर अवलंबून आहे...
कारभारवाडीचा आदर्शलहानमोठ्या धरण लाभक्षेत्रातील तसेच नदी काठच्या...
मूळ प्रश्‍नाला सोईस्कर बगल !जागतिक भूक निर्देशांकातील आकडेवारीनुसार १०७...
संकट अस्मानी आणि सुलतानीहीयावर्षाच्या खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तिन्ही...