agriculture news in marathi agrowon special article on VERY LOW PRICE OF MARIGOLD DURING FESTIVAL SEASON | Agrowon

शेतकऱ्यांच्या कष्टाचे झाले निर्माल्य

डॉ. नागेश टेकाळे
गुरुवार, 22 ऑक्टोबर 2020

कोरोना संक्रमणाचा हा काळ, टाळेबंदीमुळे मंदिरे बंद, सार्वजनिक नवरात्र उत्सव बंद, सणावाराला घराला झेंडूचे तोरण लावण्यास सुद्धा लोकांची तयारी नाही. अशा परिस्थितीत फुलाला उठाव कसा असणार? नवरात्र, दसरा, दिवाळी समोर ठेवून राज्यातील शेतकऱ्यांनी त्यांची शिवारे झेंडूने फुलवली, अपार कष्ट केले पण पदरात काहीही पडले नाही. 

रिमझिम पाऊस, थेंब पाकळीवर पडला
ओघळून जाताना सुगंध बरोबर घेऊन गेला
फूल हसले आणि म्हणाले, 
‘‘याच साठी तर केला होता अट्टाहास’’

 पावसाचे आणि फुलाचे हे असे सुगंधाचे नाते मराठी साहित्यात अनेक ठिकाणी आढळते. नवरात्रीचा पूर्वसंध्येचा दिवस. मित्राचा दूरध्वनी आला, सर! दादर फूल मार्केटमध्ये झेंडूच्या फुलांचे डोंगर तयार झाले आहेत, हजारो किलो फुले रस्त्याच्या कडेला टाकून दिले जात आहेत. गावाकडून येणाऱ्या फुलांच्या टेम्पोना व्यापारी हात सुद्धा लावत नाहीत. माझ्या समोरच्या टीव्हीवरच्या एका वाहिनीवर तेच दृश्य दाखवत होते. मन विषन्न झाले. झेंडू पावसात भिजला आणि डोळे अश्रुनी भिजले, फरक एवढाच होता की शेतामधील घामाचे शहराच्या कचऱ्यात रुपांतर झाले होते आणि शेतकऱ्यांचे न दिसणारे कष्ट आणि दुःख पाहून अश्रू व्याकूळ होऊन ओघळत होते.
नवरात्रीच्या पूर्वसंध्येला अवघ्या महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढले. शेतामधील उभ्या पिकाने हार न मानता ताठपणा दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, पण फुलशेतीला ते जमले नाही. झेंडू ज्या उमेदीने मालकासाठी फुलला होता तो त्याच्या डोळ्यासमोर पूर्णपणे भिजून गेला. नवरात्रीत दोन पैसे तरी भाव येईल म्हणून शेतकऱ्यांनी त्या अवस्थेत त्याची तोड केली, माल मुंबईला पाठवला आणि शहरातील नागरिकांनी केलेल्या घरगुती कचऱ्याच्या डोंगराला पिवळा रंग देण्याचे काम या फुलांनी केले. प्रत्येक क्रेटसाठी ८० रूपये याप्रमाणे गाडीसाठी शेतकऱ्यांनी साधारण २० हजार रुपये केलेला वाहतूक खर्च पूर्ण वाया गेला. भाडे तर निघाले नाहीच याउलट पुन्हा फुलशेती करण्याची उभारी खचून गेली. नवरात्रीत प्रतिदिन लाखो रुपयांची उलाढाल करणाऱ्या झेंडूला यावर्षी कोरोना संसर्गाच्या भीतीपोटी ग्राहक हात लावण्यास तयार नाही. ग्राहकांचा प्रतिसाद नसल्यामुळे फूल व्यापाऱ्यांची कोंडी झाली आणि शेतकऱ्यांच्या कष्टाचे निर्माल्य झाले आहे. आज हा हजारो किलो झेंडू महानगरपालिकेतर्फे धारावी येथे खतनिर्मितीसाठी पाठवण्यात आला. या प्रसंगांमधून आपण शिकावे ही अपेक्षा असते, अनुभव हाच खरा गुरू असतो, ''पुढच्याच ठेच मागचा शहाणा'' हे सर्व वाचावयास चांगले वाटते पण प्रत्यक्षात राबविणे सर्वांनाच कठीण जाते मग आमचा भाबडा शेतकरी त्यास अपवाद कसा? कोरोना संक्रमणाचा हा काळ, टाळेबंदीमुळे मंदिरे बंद, सार्वजनिक नवरात्र उत्सव बंद, सणावाराला घराला झेंडूचे तोरण लावण्यास सुद्धा लोकांची तयारी नाही. अशा परिस्थितीत फुलाला उठाव कसा असणार? नवरात्र, दसरा, दिवाळी समोर ठेवून सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांसह राज्यभरातील शेतकऱ्यांनी त्यांची शिवारे झेंडूने फुलवली, अपार कष्ट केले पण पदरात काहीही पडले नाही. माणसाचे अनुभवविश्व समसमान नसते. तो यश आणि अपयश या दोन्हींपासून सारखाच शिकत नाही. मानवी मेंदू काही अनुभवापासून अधिक शिकतो आणि काहीपासून अजिबात नाही. परिस्थिती जेव्हा हाताबाहेर जाते तेव्हा माणूस अधिक निराश होतो. हे संशोधनातून सिद्ध झाले आहे म्हणूनच यापुढे फूल उत्पादक शेतकऱ्यांनी निराश न होता निसर्गाला सामोरे जाताना सावध पावले उचलणे गरजेचे आहे. 

शेती मग ती कोणतीही असो, एकाच उद्देशावर म्हणजे ''शेत ते बाजार'' अशी न ठेवता बहुउद्देशीय असावी. इंडोनेशियाच्या ''बाली'' बेटाला मी दोन वर्षांपूर्वी भेट दिली होती, तेथील फुलशेती मी पाहिली. बालीला मोठमोठी मंदिरे आहेत. मात्र, आतमध्ये मुर्तीपूजा न होता पंचमहाभूतांची म्हणजे निसर्गाची पूजा होते. मंदिरामध्ये फुलांचा वापर होतो. बाली हे पर्यटन स्थळ असल्यामुळे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी येथे फुलांची मुक्त उधळण होते. अनेक शेतकरी, पर्यटकांना त्यांची फुलशेती दाखवण्यास घेऊन जातात. अर्थार्जनाचा हा एक मार्ग आहे. येथील अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंटमध्ये प्रवेशद्वारावर, पायऱ्यांवर फुलांची आकर्षक मांडणी असते. फुलांचे निर्माल्य होऊ नये, वर्षभर भाव कायम रहावेत, समान भावाचा सर्वांना फायदा व्हावा म्हणून फूल उत्पादक शेतकरी फुलशेतीची विभागणी करतात. यावर्षी ज्याने फुलशेती केली तो पुढील वर्षी फुलांऐवजी दुसरे पीक घेतो. बाली हे जरी हिंदू बेट असले तरी पर्यटकांसाठी येथे मोठ्या प्रमाणावर मांसाहार उपलब्ध आहे. शेतकऱ्यांचा कुक्कुटपालन व्यवसाय सुद्धा आहे. कोंबड्यांना लागणाऱ्या धान्य खाद्यात फुलांच्या पाकळ्या वाळवून त्यांच्या लहान गोळ्या करून मिसळल्या जातात यामुळे अंड्यामध्ये पिवळा भाग जास्त उठावदार होतो, तेथील लोकांची तशी श्रद्धा आहे. यापासून आपणांस कितीतरी शिकता येण्यासारखे आहे. 

शेतकऱ्यांनी स्वतः त्यांच्या फुलशेतीवर गटांमार्फत नियंत्रण ठेवावे, या क्षेत्रांमधील एखाद्या शेती व्यावसायिकाबरोबर करार करून जागेवरच फूल विक्री करावी अथवा शीतगृहात साठवणूक करावी. आज हे तंत्रज्ञान खूपच विकसित झाले आहे. फुलांचे निर्माल्य आणि सेंद्रिय खत याचा विचार करता तसा फारसा फायदा नसतो. वजनही नगण्य असते. घरगुती बागेसाठी माती भुसभुशीत करण्यासाठी हे योग्य असते. फुलांच्या निर्माल्याचे आणि त्यामधील रंगद्रव्यांचे यापेक्षाही वेगळे काय करता येऊ शकेल, यावर संशोधन आणि कौशल्य विकास अपेक्षित आहे. मंदिरे, सार्वजनिक उत्सव, घरगुती वापर याशिवाय पर्यटन, हॉटेल व्यवसाय अशा ठिकाणीसुद्धा फुलांचा वापर वाढावयास हवा. उमललेले फुल मग ते झेंडू असो अथवा इतर कुठलेही त्यांचा सहवास नैराश्यवाद कमी करतो आणि सकारात्मकता वाढवतो. निर्मल्यामधूनही फुले पुन्हा उमलली जातात. म्हणून खचून न जाता आपण आशावादी असावे लागते.

डॉ. नागेश टेकाळे : ९८६९६१२५३१
(लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)


इतर संपादकीय
भार व्यवस्थापनाचे बळीजालना जिल्ह्यातील पळसखेडा पिंपळे येथील तिघे...
सहकारी अंकेक्षण कालबाह्य ठरतेय काय? ‘हिशेबांच्या पुस्तकाचे बुद्धिकौशल्याने सखोल...
ऊस उत्पादकांनो, समजून घ्या ‘एफआरपी‘चे...राज्यातील साखर उद्योगातील सर्व घटक ‘एफआरपी‘भोवती...
देर आए दुरुस्त आएजीआय (जिओग्राफिकल इंडिकेशन) अर्थात ‘भौगोलिक...
शाश्‍वत सेंद्रिय शेतीविश्‍वजगभरातील १८६ देशांतून एकूण ७१.५ दशलक्ष हेक्टर...
‘विजे’खालचा अंधारकृषिदराने वीजपुरवठ्याची मागणी करणाऱ्या जालना...
विजेखालचा अंधारषिदराने वीजपुरवठ्याची मागणी करणाऱ्या जालना...
मेळघाटातील आदिवासी बांधवांची दिवाळीनुकताच १४ नोव्हेंबर २०२० रोजी लक्ष्मीपूजन या...
शेतीला आधार हवा सर्वंकष विम्याचाराज्यातील अनेक भागांत परतीच्या तुफान...
‘दान समृद्धीचे पडो कष्टाच्या पदरी’दिवाळी सणास सुरुवात होऊन दोन दिवस झाले आहेत. अजून...
आरआरसी’ म्हणजे काय रे भाऊ...?राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर...
रब्बी पीकविमादेखील असतो ना भाऊ!रब्बी हंगामासाठी पीककर्ज असते, हे जसे राज्यातील...
शास्त्रशुद्ध अभ्यासातून वाढवूया देशी...देशी गाईंमध्ये दुष्काळी आणि टंचाईच्या काळात तग...
शेतकरी हित सर्वप्रथमराज्यात मागील दोन दशकांपासून कापसाचे संकरित बीटी...
देशी गोवंश दुर्लक्षितच!आपल्या देशात सण आणि महोत्सव साजरे करताना आपण...
आपत्तीतील शेती ः आदर्श इंडोनेशियाचा! ऑक्टोबरमध्ये मनमुराद कोसळलेल्या पावसामुळे ...
पुट ऑप्शन ः चांगला पर्यायकोणत्याही शेतीमालाचे दर हे पेरणी करताना अधिक...
दुसरी लाट, दिवाळी अन् दुर्लक्षइटली, स्पेन, इंग्लंड, नेदरलॅंड आदी युरोपियन...
शेत-शिवारामधील हुंदकेपंधरा ऑक्टोबर ची सकाळ. सोलापूर जवळच्या एका लहान...
सुपीक माती तिथेच शेती अन्नधान्याबरोबर कापूस उत्पादकतेत पीछाडीवर...