शेतात कारळे अन् बांधावर हवेत शमी-आपटा

आजही मला या नवरात्री आणि दसऱ्याच्या निमित्ताने माझ्या शेतकरी मित्रांना एक नम्रपणे आवाहन करावे वाटते, की तुमच्या शेतात पुढील वर्षीच्या नवरात्रीच्या माळेसाठी मूठभर तरी का‍रळे पेरा, आहारात त्याचा समावेश करा. त्याचप्रमाणे बांधावरच्या एका सुरक्षित कोपऱ्यात एक आपटा आणि शमी वृक्ष जरूर लावा.
संपादकीय.
संपादकीय.

आज विजयादशमी. नवरात्रीचे नऊ दिवस पडणारा मुसळधार पाऊस, अचानक येणारा महापूर शेतातील पिकांचे होते ते नव्हते करून गेला. तर दुसरीकडे निळ्या आकाशाकडे निस्तेज डोळ्याने पाहणारा मराठवाड्यातील शेतकरी आहे. निसर्गाचे हे दोन भिन्न रूप एकाच वेळी पाहायवयास मिळताहेत. या वेळचे नवरात्र आणि दसरा पाहताना मला माझ्या शालेय जीवनामधील पर्यावरणप्रेमी निसर्ग उत्सव आजही आठवतात. नवरात्रास सुरवात झाली, की घटामधील माती, त्यात अंकुरलेले जोडगहू, देवीला वाहिलेल्या नऊ दिवसांच्या नऊ कारळांच्या फुलांच्या माळा, उपवासाला शेतातील भगर, राजगिरा, घरचाच गूळ शेंगदाणे, दसऱ्याला बांधावर हमखास भेटणारा आपटा आणि त्यासोबतच असणारी त्याची बहीण शमीवृक्ष. केवढे महत्त्व होते त्या कारळाच्या पिवळ्या फुलांचे, आपट्याच्या पानाचे आणि शमीचे सुद्धा. पहिल्या माळेला आम्ही मित्र शेतात ही पिवळी फुले आणण्यास जात असू. पूर्वी जवळपास प्रत्येकांच्या शेतात कारळे आणि जवस हे असायचेच. नवरात्रात फुललेली ती पिवळी शेते पाहिली की मन हरकून जात असे. 

मध्य प्रदेशात सर्वत्र फुलणारी पिवळी मोहरी आणि आपल्याकडचे पिवळ्या जर्द फुलांचे कारळे यांची जणू या दिवसात निसर्ग दिवाळीच असे. मोहरीला व्यापारी महत्त्व प्राप्त झाले म्हणून आजही ती मध्य प्रदेश आणि काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते. मात्र, ताटामध्ये शिळ्या भाकरीसोबत कोपऱ्याला चटणीसारखे विसावलेल्या कारळाला संकरित पिकांनी आमच्या शेतातून कायमचे घालवून टाकले आहे. आज मला हे पीक आदिवासी भागातच कुठेतरी आढळते. घटाला आता झेंडू आणि विड्याच्या पानाच्या माळा दिसतात, तोही केवळ एक सोपस्कार म्हणून. आजही मला आठवते कारळाची फुले आणावयास आम्ही शेतात गेलो की शेतकरी त्यांच्या शेतात आग्रहाने बोलावून लहान पाटीभर फुले आम्हाला देत आणि म्हणत, ‘‘पोरा! आमच्या या फुलांची माळ आज घटाला घाल, आमच्या शेताला बरकत येईल.’’

खरंच बरकत येते का? एका प्रयोगात मी पहिल्या माळेला कारळाची फुले तोडलेल्या त्या झाडाला नंतर त्यापेक्षाही जास्त फुले लागलेली पाहिली होती. वनस्पतीला तुम्ही प्रेमाने मागितले की ती तुम्हाला भरभरुन देते. मात्र. ओरबडले की मिटून जाते. पांरपरिक शेतीत प्रेम होते, रासायनिक संकरित शेतीत फक्त ओरबाडणेच दिसते. घटामधील जोडगहू याचमुळे गेला. पूर्वी नवरात्रीत पडणाऱ्या रिमझिम पावसात शेतात पारंपरिक पिके फुललेली असायची. आता नवरात्रीत मुसळधार पाऊस पडत असून शेतात जमीनदोस्त होणारी पिकांची वाणं आहेत. शेतीची ही शोकांतिका श्रावणामधील विविध सणांबरोबर गणेशोत्सव, नवरात्र आणि दसरा यांनीही पाहिली आणि यापुढेही पाहणार आहेत. अंगणामध्ये आणि शेतात विहिरीजवळ लावलेला झेंडू आम्हाला दसऱ्‍याच्या माळेपुरताच माहीत होता. झेंडू आणि कारळ्याच्या फुलाभोवती फिरणाऱ्‍या मधमाश्या, भुंगे आता अदृश्य आहेत तेव्हा ही देशी वाण आता दिसणार कशी? 

दसरा आला की मला आमच्या शेताच्या बांधावरच्या आपटा आणि शमीच्या लहान वृक्षांची आज प्रकर्षाने आठवण होते. प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरचे हे दोन वृक्ष त्याचे राखणदार होते. दसऱ्‍याच्या दिवशी आम्ही शेतात जाऊन शमीची आणि आपट्याची थोडी पाने घेऊन येत असू. शमीच्या झाडावर अज्ञातवासात असताना पांडवानी शस्त्रे लपवून ठेवली होती. या वृक्षाखालची मूठभर माती घरी आणावी, तुळशीमध्ये, परसबागी टाकावी. त्याने घर आणि अन्न सुरक्षा मिळते असा तो चांगला समज होता. आता आम्हाला दोन रुपये किलोमध्ये सहज अन्न सुरक्षा मिळते मग शमीची काय गरज. आमच्या शेतामधील गडी त्याच्या हाताने आम्हाला या दोन वृक्षाची अगदी मोजकीच पाने देत असे. कारण, त्या दोन्हीही झाडावर छोट्या पक्ष्यांची घरटी असत आणि हेच ते छोटे जीव आमच्या शेतामधील पिकांचे किडीपासून रक्षण करत असतं. आज आम्ही शेताबरोबर बांधही निर्मळ केले आहेत. म्हणूनच लष्करी अळ्या भरलेल्या मक्याकडे जाताना आमच्याकडे पाहून हसत आहेत.

आज शमीवृक्ष पंचक्रोशीत कुठेतरी एखादा दिसतो आणि आपटाही तसाच. अदिवासी भागामधील जंगलात आपटा मुबलक आढळतो पण जेव्हा या वृक्षाच्या मोठमोठ्या फांद्या दसऱ्‍याच्या दिवशी बाजारात ढिगाऱ्‍याच्या स्वरूपात येतात तेव्हा मनस्वी वेदना होतात. पांरपरिक देशी वृक्षाच्या अज्ञानामुळे आज बाभळीची पाने शमी आणि बागेतील कांचन आपटा म्हणून आपल्या घरी येत आहे. सणामागचे विज्ञान आज आम्ही पूर्ण विसरलो आहोत.

१७३० मध्ये राजस्थानात खेजरी या गावामधील ३६३ शेतकऱ्‍यांनी त्यांच्या शेताचे रक्षण करणाऱ्‍या हजारो शमी वृक्षांना महाराज अभयसिंह यांच्या सेनापतीच्या धारधार कुऱ्‍हाडीचे बळी व्हावे लागले. अमृतदेवी या शेतकरी महिलेने तिच्या तीन लहान मुलीसह शमीला मारलेली मिठी रक्ताने माखली गेली. वृक्षासाठी २०० वर्षांपूर्वी केवढा हा त्याग होता. आज हा उपयुक्त वृक्ष आमच्या बांधावरुन असा नकळत नष्ट होऊन जाणे वेदनादायी आहे. आजही मला या नवरात्रीची आणि दसऱ्याच्या निमित्ताने माझ्या शेतकरी मित्रांना एक नम्रपणे आवाहन करावे वाटते, की तुमच्या शेतात पुढील वर्षीच्या नवरात्रीच्या माळेसाठी मूठभर तरी का‍रळे पेरा, आहारात त्याचा समावेश करा. त्याचप्रमाणे बांधावरच्या एका सुरक्षित कोपाऱ्यात एक आपटा आणि शमी वृक्ष जरूर लावा. गांडिव धनुष्याने अर्जुनाने ज्या असत्याचा पराभव केला ते धनुष्य त्याने या शमीच्या गर्द पानामध्येच लपविले होते. या धनुष्याची आठवण आणि बांधावरचा शमी, आपट्याचा शीतल सहवास तुमचे जीवन नक्कीच जास्त सकारात्मक करेल, याची मला खात्री आहे.

डॉ. नागेश टेकाळे : ९८६९६१२५३१ (लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com