agriculture news in marathi agrowon special article on water crises. | Agrowon

जलसंकट दूर करण्यासाठी...

प्रदीप जोशी
शनिवार, 14 मार्च 2020

जगात यापुढे महायुद्ध झालेच तर ते सत्तेसाठी न होता पाण्यासाठी होईल, पर्यावरणाच्या जाणकारांकडून अशी शक्यता आज वर्तवली जात आहे. एका बाजूला लोकसंख्या वाढते आहे, दुसऱ्या बाजूला पाण्याचे स्रोत कमी होत चालले आहेत. वृक्षवाढीसाठी जर आपण सतर्क राहिलो नाही, तर पाण्याविना तडफडून मरण जवळ करावे लागेल. हे केवळ भाकीत नाही तर वास्तवतेचे चित्र आहे. सर्वांनाच शहाणपण कधी सुचणार, हा प्रश्न आहे. 
 

भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. केवळ मानवच नव्हे तर पशुपक्षीदेखील आज पाणीटंचाईपुढे हतबल होताना दिसत आहेत. खरंच पाण्याची समस्या बिकट होत चालली आहे. शहरीकरण, औद्योगिकीकरण, भूजल पातळीतील घसरण, पावसाचे घटते प्रमाण, रासायनिक खते, कीडनाशके यामुळे झालेल्या प्रदूषणाचा विचार केला तर जलसंकटाची व्याप्ती आपल्या लक्षात येईल. पाणी ही नैसर्गिक देणगी आहे, ज्यायोगे सजीव आपले अस्तित्व टिकवून आहेत. पृथ्वीचा विचार केला तर भूभाग जास्त व जलभाग कमी आहे. एकूण पाणीसाठ्यापैकी ९७ टक्के पाणी सागरात आहे. हे पाणी दैनंदिन वापर व शेतीसाठी उपयुक्त नाही. मानवाला उपयोगी पडणारा पाणीसाठा फार थोडा आहे. देशातील नद्यांची संख्या दोन हजाराच्या आसपास आहे. राज्याचा विचार केला तर आजही ४० हजार खेडी उन्हाळ्यात पाण्याच्या विवंचनेत असतात. आज शहरीकरण जलद गतीने होत आहे. तेथे पाण्याची प्रचंड मागणी आहे. त्यामुळे आता पाण्याचे सुयोग्य नियोजन करण्याची वेळ आली आहे. धरणातील पाणी शेती व वीजनिर्मिती यासाठीच खर्ची पडते. पृथ्वीच्या तापमानात वाढ झाल्याने हिमपर्वत वितळण्याचे प्रमाण वाढले आहे. आज सांडपाण्यात घातक रसायने सोडली जात आहेत. नदी, नाले यातील पाणी दूषित होत आहे. पाण्याचा अनियंत्रित वापर आपणास संकटात लोटल्याशिवाय राहणार नाही. 

शेती व्यवसाय तर आज अनियमित पावसामुळे बेभरवशाचा झाला आहे. राज्याचा विचार केला तर फक्त १५ ते १८ टक्के शेती बागायती आहे. पूर्वी ६० ते १०० फुटांवर कूपनलिकांना पाणी लागत होते. आज ४०० ते ५०० फुटांपर्यंत गेले तरी पाण्याचा स्रोत भेटत नाही. त्याचा परिणाम म्हणून ओढे, नदी, नाले, कूपनलिका कोरड्या ठणठणीत पडलेल्या पहावयास मिळतात. भूजल पातळी घटण्याची अनेक कारणे आहेत. पाण्याची मागणी वाढल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा उपसा होत आहे. त्या तुलनेत पुनर्भरण होत नाही. वृक्षलागवड म्हणावी तेवढी नाही. वृक्षतोड मात्र बेसुमार आहे. वापर केलेल्या प्लॅस्टिक पिशव्या मातीतच राहतात. त्याचे विघटन होत नाही. त्यामुळे जमिनीत पाणी जिरण्यात अडचणी येतात.

जलसंकट वाढत चालल्याने शुद्ध स्वच्छ पाणी मिळतच नाही. पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणावर होत आहे. जमीन व वने यांचे प्रमाण योग्य असायला हवे. भूजल पुनर्भरणाची प्रक्रिया ही नैसर्गिक आहे. ती खंडित झाली तर पाणी साठा कमी होतो. त्यासाठी वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन, वृक्षसंगोपन याकडे लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. केवळ झाडे लावा; झाडे जगवा, एक तरी लावू तरू; वृक्षतोड दूर करू, या घोषणा कामाच्या नाहीत?
पाणी संकटावर मात करण्यासाठी शिवकालीन पाणी योजना, घराच्या छतावरील पाणी जमिनीत पुन्हा जिरविणे, सांडपाण्याच्या शुद्धीकरणानंतर त्याचा पुनर्वापर करणे, शोषखड्डे निर्मिती करणे, शेततळी निर्माण करणे, वनराई बंधारे बांधणे, प्रवाहित पाणी बांध घालून अडविणे यांसारख्या उपाययोजना राबवाव्या लागतील. या सर्व उपाययोजना करीत असताना लोकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. पाणी संकटाला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले पाहिजे. आज आपण विविध दिन व सप्ताह साजरे करतो. त्यातून लोकजागृती होण्याची गरज आहे.

पृथ्वीतलावर जल, अन्न, सुभाषित ही तीन रत्ने आहेत. पाणी मौल्यवान असल्याने ते रत्नतुल्य समजले आहे. आपल्या राज्यात प्रामुख्याने नैऋत्य व ईशान्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो. राज्यात तापी नर्मदा या पश्चिम वाहिनी तर कृष्णा, गोदावरी, भीमा, वैनगंगा या पूर्व वहिनी नद्या आहेत. राज्यात लघू, मध्यम, मोठ्या जलसिंचन प्रकल्पांची संख्या २४७५ च्या आसपास आहे. मॉन्सून पर्जन्य हा आपला जलसंपत्तीचा एकमेव स्रोत आहे. कोकण किनारपट्टीवर चांगला पाऊस पडतो तर महाराष्ट्र व विदर्भ अत्यल्प पावसाचा भाग म्हणून ओळखला जातो. देशाच्या तुलनेत २९ टक्के वापरायोग्य पाणी महाराष्ट्रात आहे. असे असले तरी त्याचे योग्य नियोजन व व्यवस्थापन होत नसल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. टँकरने पाणी पुरवणे, जनावरांच्या छावण्या उघडणे, अशा उपाययोजना करण्याची वेळ राज्यावर नेहमीच येते. या योजना तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात.
आज ग्रामीण भागातील चित्र पाहिले तर चार ते पाच किलोमीटर अंतरावर लोकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. पाण्याच्या बाबतीत आपणास गावे स्वयंपूर्ण करता आली नाहीत. ताकारी, टेंभू, आरफळ, म्हैसाळ पाणी योजना सत्ता प्रस्थापित करण्यासाठी उपयोगी पडल्या. लोकांच्या पाणी समस्या मात्र आजही तशाच आहेत. पीक पद्धतीतदेखील बदल करण्याची गरज आहे. पाणलोट क्षेत्र विकासाच्या माध्यमातून राळेगणसिद्धी, शिवणी, निधळ या गावांनी पाणी समस्येवर कायमचा तोडगा काढला. धुळे जिल्ह्याने जलसंधारणाच्या माध्यमातून जलव्यवस्थापन केले. काही ठिकाणी ‘रुफ वाटर हार्वेस्टिंग’ ही संकल्पना राबवली गेली. पिण्याचा पाण्याच्या प्रवाहात लोकांना कोणतेही धार्मिक विधी करण्यापासून परावृत्त करावे. शेतीसाठी ठिबक, तुषार, सूक्ष्म जलसिंचन योजना उपलब्ध करून द्यायला हव्यात. पाण्याचा काटकसरीने वापर होण्यासाठी घरगुती नळांना मीटर बसवावेत. नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रात आता त्याची कार्यवाही सुरू झालेली आहे.

पाणी समस्येवर आजच आपण उपाययोजना केली नाही तर वालुकामय प्रदेशासारखी आपली अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही. कोणत्याही प्रदेशावर सत्ता स्थापन करण्यासाठी आता महायुद्धे होणार नाहीत तर पाण्याच्या उपलब्धतेसाठी ती जगाच्या पातळीवर होतील. त्यामुळे पाण्यासाठी सतर्क राहण्याची गरज आहे. 

प्रदीप जोशी  : ९८८११५७७०९
(लेखक ज्येष्ठ मुक्त पत्रकार आहेत.)


इतर संपादकीय
‘रेपो रेट’शी आपला काय संबंध?भारतीय रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) ऑगस्ट,...
दूध दराच्या दुखण्यावरील इलाजहल्लीच झालेल्या दोन आंदोलनात दूध दराच्या दोन...
दूध दराचे दुखणेइतर व्यवसाय व दूध व्यवसायातील फरक हा की कारखाने...
शेती शाश्वत अन् आश्वासकही!चार महिन्यांपासून देशभर सुरु असलेले लॉकडाउन आता...
उद्दिष्ट - मुदतवाढीत अडकवू नका मका...‘‘आ धी नोंदणी केल्यानंतर ११ जुलैला एसएमएस...
रेशीम शेतीला संजीवनीकोरोना लॉकडाउनचा फटका दुग्धव्यवसाय, कोंबडीपालन...
नव्या शिक्षणाची मांडणी शरद जोशींच्या...शरद जोशी जे म्हणतात ते महत्वाचे आहे की...
शरद जोशींचे शिक्षण स्वातंत्र्यशरद जोशींचे तत्वज्ञान एका शब्दात सांगायचे म्हटले...
बदलत्या व्यापार समिकरणांचा अन्वयार्थशेती क्षेत्रात नुकत्याच आम्ही काही सुधारणा केल्या...
अभियान नको, योजना हवीकेंद्र सरकारने आत्मनिर्भर योजनेंतर्गत शेतमाल...
आता हवी भरपाईची हमी चालू खरीप हंगामातील पीकविमा भरण्यासाठीची काल...
शेतीचा गाडा रुळावर कसा आणणार?   कोरोना महामारी संपूर्ण जगाला नुकसानकारक...
शेतकरी संघटनांना ‘संघटीत’ कसे करावे?  एकत्रीकरणाचा लाभ काय?  मतभेद बाजुला सारुन...
इंडो-डच प्रकल्प ठरावा वरदान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर जवळपास तीन महिने...
पीककर्ज प्रक्रिया वेळखाऊ अन्...नेकनूर (ता. जि. बीड) गावचे शेतकरी संदिपान मस्के...
वॉटर बॅंकेद्वारे साधू जल समृद्धी! सोलापूर जिल्ह्यातील कृषिभूषण शेतकरी अंकुश पडवळे...
ऊर्ध्व शेतीचे प्रयोग वाढले पाहिजेतएकविसाव्या शतकाच्या आरंभापासूनच शेती व्यवहार...
कापूस विकासाची खीळ काढावाढलेला उत्पादन खर्च आणि कमी दरामुळे मागील अनेक...
दिलासादायक नवनीत   दूध दर पडले, यावर आंदोलन भडकले की...
कोरोना नंतरचे शेळी-मेंढी-कुक्कुटपालन  फक्त कोरोना विषाणूलाच आपल्या स्वतःमध्ये बदल...