पाणथळ जागा जैवविविधतेचा खजिना

गेल्या २४ वर्षापासून २ फेब्रुवारी हा ‘पाणथळ भूमी संरक्षण आणि संवर्धन’ दिवस म्हणून जागतिक स्तरावर साजरा केला जातो. या वर्षीचे घोषवाक्य ‘पाणथळ भूमी आणि जैवविविधता’ असे आहे. याला धरूनच सर्व राष्ट्रांनी पाणथळ जागांमधील जैवविविधता, त्यांची सध्याची परिस्थिती, विकासाचे त्यावर होणारे परिणाम आणि या भूमीमधील जैवविविधतेचे संवर्धन आणि संरक्षण कसे यशस्वी करता येईल, यावर काम करणे अपेक्षित आहे.
agrowon editorial article
agrowon editorial article

दोन फेब्रुवारी १९७१ या दिवशी इराण या देशामधील ‘रामसर’ या शहरात काही मोजक्या पर्यावरण तज्ज्ञांची बैठक होऊन त्यामध्ये जगामधील पाणथळ जागा आणि त्याच्या सद्यस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली गेली. त्याचबरोबर त्यांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कसे प्रयत्न करता येतील, लोकांचा या प्रक्रियेमध्ये सकारात्मक सहभाग कसा वाढवता येईल यासंबंधी मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमावली ठरविण्यात आली. ही बैठक रामसर शहरात झाली म्हणून ‘रामसर करारनामा’ या नावाने ती ओळखली जाते. या करारनाम्यामधील मार्गदर्शक तत्त्वे प्रत्येक राष्ट्राने स्वीकारून त्याला मान्यता देण्यासाठी १९९७ साल उजाडले. गेल्या २४ वर्षापासून २ फेब्रुवारी हा पाणथळ भूमी संरक्षण आणि संवर्धन दिवस म्हणून जागतिक स्तरावर साजरा होत आहे. यामध्ये शासन, पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, विद्यार्थी, शिक्षक, प्रसिद्धी माध्यमे आणि नागरी संस्थांचा सर्व स्तरावर सहभाग असतो.

निसर्गचक्रामध्ये अनेक परिसंस्था कार्यरत असतात. या परिसंस्थांची स्वत:ची एक जैवविविधता असते. नदी, जंगल, पठार, खाडी या अशा काही परिसंस्थांची जैवविविधता आज जेवढी धोक्याच्या पातळीला आलेली आहे, त्यापेक्षाही बिकट अवस्था पाणथळ जागांची आहे. भूपृष्ठावर असलेले उथळ पाणी ही पाणथळ जागांची व्याख्या आणि तिला पूरक असलेली पाणथळ भूमी आपल्याकडे शोधणे आज अतिशय कठिण झाले आहे. पाणथळ भूमीची जैवविविधता अतिशय संवेदनशील असते. त्यामुळेच वातावरण बदल आणि मानवी विकासाच्या प्रक्रियेत तिच्या जैवविविधतेच्या सातत्याने बदल होत असतो. पाणथळ भूमीत वाढणाऱ्‍या वनस्पती आणि त्यांच्या आधाराने जगणारे जलचर या परिसंस्थेशिवाय इतर ठिकाणी वाढू शकत नाहीत. समुद्रालगत असणाऱ्या पाणथळ जागा माशांच्या प्रजोत्पादनाचे मुख्य केंद्र असतात. समुद्रामधील मासेमारी सध्या झपाट्याने कमी होत आहे. त्याला मुख्य कारण म्हणजे नजीकच्या पाणथळ जागांचा झालेला ऱ्हास हे होय. खारफुटी ही वनस्पती खाडी परिसंस्थेमधील एक महत्त्वाचा घटक आहे. पाणथळ भूमीमधील या घटकाची आज मोठ्या प्रमाणावर तोड होत आहे, म्हणूनच भविष्यात त्सुनामीसारखी संकटे, समुद्राच्या पाण्याची वाढत जाणारी पातळी यास कसे सामोरे जायचे यावर मंथन होणे आवश्यक आहे.

पाणथळ भूमीमधील जैवविविधता नष्ट होण्याचे मुख्य कारण म्हणजे औद्योगिक वसाहती आणि मनुष्य वस्तीमधून येणारे सांडपाणी हेदेखील आहे. यावर आपणास अजूनही पूर्ण नियंत्रण मिळवता आलेले नाही. अनेक पाणथळ भूमीच्या किनाऱ्यावर रासायनिक शेती केली जाते. त्यामुळे या खतांचे अंश पाण्यात उतरतात आणि जैवविविधता धोक्यात येते. पाणथळ भूमीमधील जैवविविधतेमुळेच लाखो स्थलांतरित पक्षी हजारो मैलांचा प्रवास करून तेथे येतात. मात्र, याच पाणथळ भूमीमध्ये मानवी हस्तक्षेप वाढू लागला की तेथील अन्नसाखळी प्रदूषित होऊ लागली आहे आणि याचा स्थलांतरित पक्ष्यांच्या खाद्यावर परिणाम होतोय. नोव्हेंबर २०१९ च्या दुसऱ्‍या आठवड्यात राजस्थानमधील ‘सांभार’ सरोवर या पाणथळ भूमीत १८ हजार पक्ष्यांचे एका आठवड्यात झालेल्या मृत्यूचे कारण हा अन्नसाखळी प्रदूषण हेच आहे. पाणथळ भूमीत सांडपाणी मिसळल्यामुळे तेथील वनस्पतींच्या जैवविविधतेवर परिणाम होतो आणि त्यामुळेच जलपर्णीसारखी वेगाने वाढणारी वनस्पती तो संपूर्ण भाग अल्पावधीत व्यापून टाकते. आशिया आणि आफ्रिका खंडामधील अनेक पाणथळ जागा या जलपर्णी वनस्पतीमुळे आज नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. पाणथळ भूमींचे दलदलीत रुपांतर झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर मिथेन वायूची निर्मिती होते. वातावरणामधील वाढत्या उष्णतेस हा हरितगृह वायू जबाबदार आहे. म्हणूनच या नष्ट होत असणाऱ्या पाणथळ क्षेत्राचे संवर्धन होणे गरजेचे आहे. पाणथळ जागा हा पडणारा पाऊस आणि नद्यांच्या पुराचे पाणी अडवतात. त्यांच्या ऱ्हासामुळेच श्रीनगर (२०१४) आणि चेन्नई (२०१५) मध्ये अचानक आलेल्या महापुरामुळे प्रचंड वित्तीय हानी झाली होती, याचा विसर पडता कामा नये. 

पूर्वी गाव तेथे पाणवठा म्हणजेच पाणथळ जागा होती. आमचे शालेय जीवन पाणथळ म्हणजे पांदीच्या पाण्यामधून वाट काढत घर आणि शाळा या मार्गावरच गेले. दोन्हीही बाजूला घनदाट वृक्षराजी, थंड सावली, पक्ष्यांचा किलबिलाट, यामुळे उन्हाळ्यातही गप्पा मारत चालताना आठ-दहा कि.मी. कसे संपते कळतसुद्धा नव्हते. चालताना प्रत्येक थांब्यावर तुडुंब भरलेल्या विहिरी आणि पाटाचे वाहते पाणी ही असे. या सर्व पाणथळ जागा शिवारांची तहान भागवत असते. पंचक्रोशीमधील सर्व गावे या सर्व पांदणीच्या मार्गानेच जोडलेली असत. विकासाच्या वादळात पांदण रस्ते हरवले आणि पाणथळ जागाही. पांदणीचे पक्के रस्ते झाले आणि त्यावर बैलगाड्यांऐवजी मोटारसायकली, चारचाकी वाहने धुरळा उडवू लागली. वृक्ष आणि गायरानांच्या जागी बंगले तयार झाले. विहिरी आटल्या आणि हातात विकतच्या पाण्याच्या बाटल्या दिसू लागल्या. पूर्वी महाराष्ट्रात लाखाच्या वर पाणथळ जागा होत्या. आता सुदृढ अवस्थेत १०० सुद्धा नाहीत. पाणथळीबरोबर तेथील जैवविविधता गेली, बगळे, बदके, करकोचे कुठे गेले माहित नाही. आम्ही जे प्रत्यक्ष पाहिले ते सर्व मुले आज पुस्तकात पहात आहेत. ग्रामीण निसर्गाची ही शोकांतिका आहे. 

विस्तीर्ण पसरलेली आणि जैवविविधतेने समृद्ध असलेली पाणथळ भूमी ही रोजगार निर्मितीबरोबर आपणास अन्नसुरक्षासुद्धा देते हे आम्ही विसरलो आहोत. आफ्रिका खंडामधील ‘व्हिक्टोरिया’ तलाव आणि आपल्या देशामधील ओरिसा राज्यामध्ये असलेला ‘चिलका’ सरोवर ही याची उत्कृष्ट उदाहरणे आहेत. म्हणूनच या वर्षीच्या २ फेब्रुवारीच्या पाणथळ भूमीचे घोषवाक्य ‘पाणथळ भूमी आणि जैवविविधता’ हे आपण सर्वांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे.

डॉ. नागेश टेकाळे ः ९८६९६१२५३१ (लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com