श्रमशक्तीच्या जागरातून घडवूया समृद्ध भारत

पालकांना या ठिकाणी नम्र विनंती आहे, जर आपल्या बाळाने आपल्या स्वतःच्या आयुष्याचे ओझे स्वतः वाहून न्यावे, असे वाटत असेल तर त्याला अति सुखसोयी देऊ नका. आज देशात संस्कार, श्रम आणि विचार यावर वेळीच अन् व्यापक काम व्हायला पाहिजे. असे झाले नाही तर समाजाची अवस्था आणखी वाईट होऊ शकते.
संपादकीय.
संपादकीय.

कितीही प्रगती झाली तरी मानवी जीवन, निसर्ग आणि समस्या यांचे नाते खूप जवळचे आहे. त्यामुळे प्रत्येक काळात समस्या आणि त्यावर उपाययोजना करून त्यातून मार्ग काढणारे महापुरुष हा प्रवास नित्य चालू आहे. इतिहासात याचे अनेक दाखले मिळतात. अशा प्रकारच्या उपाय योजना कार्यान्वित करण्यासाठी तरुण तसेच सर्व समाज तयार असायला हवा. बऱ्याच अंशी आपला रोख हा सरकार, शासन यांनी आपल्यासाठी काही तरी करावे, असा असतो, पण बारकाईने विचार केला तर शासन, प्रशासन, कायदा, पोलिस यंत्रणा, न्यायव्यवस्था यांची भूमिका ही नियमांचा भंग होत असलेल्या ठिकाणी योग्य ती कारवाई करणे ही आहे. याला काही अपवाददेखील आहेत. तरीही समाजाची एकंदर जीवनमानाची गुणवत्ता ही समाजातील प्रमुख घटक म्हणजे नागरिक यांच्यावरच अवलंबून असते. समाजशील नागरिक हे वाचन, चिंतन आणि योग्य मार्गाने केलेले श्रम यातूनच घडत असतो. त्यासाठी देव, धर्म, तत्त्वज्ञान यांच्या बरोबरीनेच विज्ञान, व्यवसाय, अर्थशास्त्र, कायदा यांचाही अभ्यास समाजाने करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

मी कनिष्ठ महाविद्यालयात शिकत असल्यापासून एक विचार सतत माझ्या मनात येत आहे की आपल्या देशातील शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांचे प्रमाण खूप प्रचंड आहे. परंतु कार्यरत असणारी शिक्षण व्यवस्था पाहिली तर विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील खूप मोठा काळ हा फक्त पुस्तकी ज्ञान घेण्यात जात आहे. दरम्यानच्या काळात विद्यार्थ्यांचे आरोग्य हा नाजूक मुद्दा होत चालला आहे. या सर्वाला कारण म्हणजे जीवनातील श्रमाची कमतरता. केवळ महाविद्यालयातील विद्यार्थीच नव्हे तर आपल्या देशातील मोठे मनुष्यबळ हे रिकामटेकडे झालेले आहे. याचाच परिणाम म्हणून भारताचा सामाजिक आनंद निष्कर्षामध्ये जगात खूप खालचा क्रमांक लागत आहे. अशा प्रकारच्या गोष्टीवर अजूनही आपले लक्ष्य जात नाही. बऱ्याचदा लोकांची संख्या ही निवडणुकीपुरतीच गांभीर्याने विचारात घेतली जाते. या सर्व गोष्टींसाठी राजकारणी लोकच जबाबदार आहेत असे म्हणता येणार नाही. कारण त्यांनी राजकारण पूर्ण वेळ स्वीकारले असल्याने ते त्यांच्या पद्धतीने देशाची सेवा करतच आहेत. पण आपण अर्ध वेळ तरी काय करायचे हे आपणास माहीत नसताना पूर्ण वेळ कार्यकर्ता (फुकटचा) होण्यात आणि पुन्हा आयुष्यभर रडण्यात धन्यता मानत आहोत त्याचे काय? 

स्वातंत्र्यपूर्व काळातील लोकांचे उच्च शिक्षण आणि त्यानंतरचे अलीकडच्या काळातील शिक्षण यामध्ये बरीच तफावत जाणवते. अशावेळी शिक्षण हे फक्त पदवीपुरते मर्यादित न राहता ते जीवन साधनेचा भाग बनून आपल्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळी उंची देणारे सिद्ध व्हावे. अशा विकसित व्यक्तिमत्त्वामध्ये श्रम आणि बुद्धी या दोहोंच्या विकासाला चालना दिली जावी. आता जी लोकं ७५ ते ८० वर्षे वयाची आहेत त्यांच्या ठिकाणी शरीर आणि बुद्धी या दोहोंचा विकास झाला असल्याचे दिसून येते. परंतु अलीकडच्या काळात पाहिले तर श्रमाचे काम हे अपमानकारक किंवा कमीपणाचे वाटू लागले आहे. त्यातूनच उच्च पद आणि गलेलठ्ठ पगार यांची एक लाटच समाजात निर्माण झाली. त्याचा परिणाम म्हणून काही शेकडो पदे ही आमच्या लाखो तरुणांची स्वप्ने झाली. काहींची स्वप्ने पूर्ण झाली आणि काही जीवनाच्या वाटेवरून घसरून बाजूला पडली गेली. अनेकांची तरुण वये निघून गेली. 

आपल्या समाजाची आणखी एक रीत यानिमित्ताने येथे मांडू वाटते की नंबर एकचा खांद्यावर आणि दोनचा पायाखाली. ही मानसिकता बदलावी लागेल. जो उमेदवार निवड प्रक्रियेतून बाहेर पडतो त्याला त्याच्या पात्रतेनुसार दुसरीकडे संधी मिळायला हवी. त्याचप्रमाणे मोठे स्वप्न पाहणे, त्यासाठी सर्वस्व पणाला लावणे हे जितके गरजेचे आहे तेवढंच हट्टीपणा न करता वास्तवाला सामोरे जाण्याची ताकद आपल्या अंगी तयार ठेवणे हीदेखील आजची गरज आहे. सुधारणेच्या नावाखाली ऐशोआराम चालला आहे. पालक आम्हाला जे कष्ट पडले ते आमच्या मुलांना पडू नयेत म्हणून खूप कमी वयात सुखसोयी प्रदान करतात आणि याचा परिणाम म्हणून अनेक मुलांची आयुष्ये उमलण्याआधीच कोमेजतात. कारण आचार्य चाणक्यदेखील सांगतात, ‘‘की विद्यार्थिदशेतील अतिसुख विद्यार्थ्याला अभ्यासापासून दूर नेते. त्याचबरोबर शारीरिक कष्टाप्रती आपली बदलती भूमिका मुलांना श्रम संस्कारापासून बाजूला नेते.’’ पालकांना याठिकाणी नम्र विनंती आहे, जर आपल्या बाळाने आपल्या स्वतःच्या आयुष्याचे ओझे स्वतः वाहून न्यावे असे वाटत असेल तर त्याला अति सुखसोयी देऊ नका. आज देशात संस्कार, श्रम आणि विचार यावर वेळीच अन् व्यापक काम व्हायला पाहिजे. असे झाले नाही तर समाजाची अवस्था आणखी वाईट होऊ शकते. 

स्पर्धेच्या माध्यमातून विकास करणे हा निसर्गनियम आहे. परंतु मागे पडत असताना दुसऱ्याला ठेच लावून पाडणे हा प्रकार सर्रास घडत आहे. ज्यामध्ये अनेक आयुष्ये खराब होत आहेत. आणि असे नाही की शेतकरी किंवा ग्रामीण भागातील लोकच यात सहभागी आहेत. खरं तर यात ज्यांना आपण समाजाचे रचनाकर्ते म्हणतो असे नेते, प्रशासकीय अधिकारी, पुढच्या पिढ्यांचे निर्माणकर्ते शिक्षक, प्राध्यापक अशा सर्व वर्गातील लोक या द्वेषरूपी रोगास बळी पडलेले दिसतात. अशा वेळी या विज्ञानसंपन्न समाजात स्पर्धेबरोबरच सहकार्यदेखील वाढायला हवे. आज जरी प्रगती दिसत असली तरी त्यामागे परस्पर सहकार्य हाच मूलमंत्र आहे. तेव्हा यासाठी प्रत्येकाच्या श्रमाचा पुरस्कार करणारी समाज व्यवस्था निर्माण व्हायला हवी. ही काही सरकारी आदेशाने होणारी बाब नसून प्रत्येकाने आपल्या अवतीभवती आणि आपल्या स्वतःच्या आयुष्यात श्रमशक्तीचा जागर करून समृद्ध-संतुलित भारत निर्माण करण्याचा संकल्प करूया. जेथे शेतकरी, कामगार ते इस्त्रोमधील संशोधक या सर्वांच्या श्रमाचा, बुद्धीचा आदर केला जाईल!                    :     

योगेश शेटे ः ७७५५९९८२७७

 (लेखक शेती प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com