गोसमृद्धीची अग्निपरीक्षा

आजपासून पुण्यात ‘जागतिक गो परिषदे’ला सुरवात होणार आहे. ही परिषद तीन दिवस चालेल. ‘जगाची गाय आणि आमची साथ’ संपूर्ण स्वरूपात कळावी, गोसंवर्धनाचा नेमका अर्थ कळताना, गोविकासातील अडथळे दूर करावेत आणि गोविज्ञानाचा जागर घडावा याचसाठी जागतिक गोपरिषदेचा अट्टहास...
agrowon editorial article
agrowon editorial article

तीन दिवस पुणे ‘गो'' रंगात सजणार आहे. गाय आणि गोमहोत्म्य याचा सार्थ अभिमान असणाऱ्या भारतीयांना विस्तृत माहिती, संपर्क स्थळे, विचारधन, साहित्य आणि मंथनाची संधी ‘जागतिक गो परिषदे’मुळे लाभणार आहे. गायीबाबत पहिल्यांदाच गोविकासक चमू निर्माण करून परस्पर समन्वयातून योग्य दिशेने गोवंश विकास करण्याचा प्रयत्न होणार आहे. गाय निर्माण कशी झाली? हा पहिला प्रश्‍न असला तरी त्याचे उत्तर आज विज्ञानयुगात शोधणे गरजेचे आहे. संस्कृतीतील गाय रंजक कथांनी सजलेली आहे आणि त्यात गोभक्तांनी अनेक उपकथानक विषद केले आहेत. मात्र, आज अस्तित्वात असलेली, सांभाळली जात असणारी, प्रत्यक्ष स्वरूपात उभी असलेली गाय हे पूर्ण सत्य आहे. 

उपयुक्ततेच्या निकषांवर मानवाने गाय समृद्ध केली आणि जगात गायीचे स्थान पशुवंशात सर्वोच्च दिसून येते. केवळ दूध देते म्हणून भारताबाहेर गाय विकसित झाली असली तरी आपल्या देशात गायीची उपयुक्तता दुधासह किती तरी अधिक गुणातून स्वीकारली गेली आहे. सेंद्रिय शेतीच्या संदर्भाने भारतीय गाय गेल्या ८-१० वर्षात दसपटीने अधिक उपयुक्ततेची ठरली आहे. एकट्या दुग्ध उपयुक्ततेचा विचार केला तर प्रमाण आणि प्रत यात गायीबाबत स्पष्टता महत्त्वाची ठरते. जगात विकसित झालेल्या गोवंशाचे दूध उत्पादन प्रमाण दर दिवशी शंभरी पार करत आहे आणि हा विकास ४० ते ५० वर्षांत संशोधकांना साधने शक्‍य झाले आहे, तर त्याची प्रचिती समृद्ध गोप्रक्षेत्रावर पशुपालकांना दिसून येत आहे. मात्र भारतीय गाय दूध समृद्धीसाठी प्रमाणाबाबत कोसो दूर आहे. 

दुधाची प्रत ए-1 आणि ए-2 अशा प्रकारात वर्गीकृत असल्याने जगाच्या अतिउच्च प्रमाणात दूध देणाऱ्या गायींना भारतीय पशुपालकांना अजिबात पसंती नसून आपला ए-2 गोवंश दुधाचा वारसा वृद्धिंगत होण्यासाठी कायम प्रयत्न केले जात आहेत. गोवंशाचा खरा संघर्ष याच मुद्यावर अडला असून संशोधक-पशुपालक गो-विज्ञान यांची मांडणी योग्य प्रकारे होणे गरजेचे आहे. गोवंशास भारतात दिले जाणारे महत्त्व वृषभशक्ती, गोमूत्र, गोमय, पहिले दूध (चीक), वासरे, वार, शिंगे, खूर अशा अनेक प्रकारे मोठे आहे. मात्र यापैकी अनेक बाबी जगात भारताबाहेर फार गांभीर्याने उपयुक्ततेसाठी विचारात घेतल्या जात नाहीत. गोविज्ञान अनुसंधान केंद्राने मिळवलेले गोमूत्र पेटंट आणि याच अनुषंगाने सुरू असलेले संशोधन जगात नामांकित ठरले आहे, ही बाब भारतीय गोवंशासाठी मोठे यश आहे. 

गोसंवर्धनात गायींच्या मोजक्‍याच जाती जगात विकसित करण्यात आल्या आहेत. या गोविकासात पशुपालकांच्या संघटना आणि त्यांचे कार्य यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. गाय विकसित करण्यात संघटनांनी संशोधन -शासनाकडे केलेला आग्रही पाठपुरावा सातत्याने सुफळ ठरला आहे. अशा प्रकारची चळवळ, संघटन, सहकारी शक्ती भारतात दिसून न आल्याने भारतीय गोवंशाचा संपूर्ण विकास झालेला नाही. मुळात भारतीय गोवंशाच्या अधिकृत नोंदणी झालेल्या ४८ पशू जाती आणि त्यात नित्याने पडत जाणारी भर हा चिंतनाचा विषय आहे. भूभागाची नैसर्गिक विविधता, पर्यावरणाचा ठिकठिकाणी असमान प्रभाव, पशुअनुवंशाची गुणवैविध्ये अशा कारणांमुळे गोवंश विविधता भारतात आढळून येते. शुद्ध वंशाची प्रत्येक गाय माझ्या गोठ्यात हवीच, असा दुराग्रह आणि डझनभर गोवंश जातीचे गोठे अशी मानसिकता भारतात शुद्ध गोवंश विकासास मारक ठरली आहे. 

गोवंश पशुजातीबाबत पूर्ण साशंकता असणारी पिढी भारतात फार मोठ्या संख्येने दिसून येते. वंशरहित गोवंशाचा डेपो, अशी जगाला ओळख देणाऱ्या भारतात देशी गाय असा उल्लेख पदोपदी करत गोविज्ञानापासून असे पशुधन दूर राहिले आहे, असा गोवंश आर्थिकदृष्ट्या नुकसानकारक, उपलब्ध साधनांवर ताण आणणारा आणि सामान्य शेतकऱ्यांना न परवडणारा ठरला आहे. ‘ज्याच्या घरी गाय, तिथे विठ्ठलाचे पाय’ अशी साद भावनिक समाधान पुरविते. मात्र, आपली गाय आर्थिकदृष्ट्या सक्षम का नाही याचे उत्तर सापडत नाही. गाय फायदेशीर असा दावा सहज होताना दिसत नाही, म्हणूनच जागतिक गोपरिषदेचे महत्त्व अधोरेखित होते. गाय कशासाठी? गायीसाठी विज्ञान काय? गोसमृद्धी कुठे दडली आहे? अशा अनेक प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे गोपरिषदेत मिळू शकतील. 

प्रदर्शनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र सर्वंकष माहिती गायीबाबत पुरवण्याची जबाबदारी गोपरिषदेने घेतली आहे. गोविज्ञान हाच केंद्रबिंदू मानून प्रत्येक उपक्रम परिषदेत नियोजित करण्यात आला आहे. परिषदेत सादर होणारी माहिती पुढील शंभर वर्षात घडवावयाच्या गोसमृद्धीसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. मात्र या परिषदेत सहभाग डोळसपणे असावा, अशी भूमिका प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे. नवीन पशुसंवर्धन तंत्रज्ञानात कृत्रिम रेतन, लिंगनिहाय रेतमात्रा वापर, गर्भप्रत्यारोपण असे प्रयोग राबविले जात असताना जगातली गाय समर्थपणे पुढे जात आहे. मात्र अशा तंत्रज्ञानात भारतीय गोवंशाचा विकास कसा घडू शकेल याचा विचार होणे महत्त्वाचे आहे.

जनुक अभियांत्रिकीची फळे विदेशी गोवंशास लाभली असली तरी देशी गोवंश या विषयापासून दूर आहे. खरे तर नोंदी हा सोपा सहभाग पशुसंवर्धनात भारतीय गोवंशास आजही लाभत नसल्याने भारतीय गोवंशाची विकास गती अतिशय मंद आहे.  आपली गाय जगासारखी विकसित व्हावी आणि तिची सर्व क्षमता आर्थिक दृष्टीने फायद्याची ठरावी यामुळेच भारतात गोपरिषद आयोजित करणे उचित ठरते. देशात झालेल्या विसाव्या पशुगणनेत भारतीय गोवंशाचे संख्यात्मक चित्र स्पष्ट झाले आहे.

गोपरिषदेमुळे भारतात शासन, सहकार, पशुसंघ या यंत्रणांना प्रेरणा मिळू शकेल. गोसंवर्धनाबाबत शास्त्रीय, तांत्रिक, विज्ञानविषयक माहिती उपलब्ध होणार असल्यामुळे पशुपालकांना मोठी संधी लाभणार आहे. विज्ञान युगातली गाय भावना, परंपरा, संस्कृती किंवा वारसा यांना छेद देणारी आणि अंगीकृत गुणवैशिष्ट्यांची सगळी ओंजळभर क्षमता पुरविणारी असावी, अशी अपेक्षा करणाऱ्या सर्वांसाठी गोपरिषद सुवर्णसंधी पुरवू शकेल. मात्र गोभक्तीचा अंध गजर करणाऱ्या संधीसाधूंना वगळणे हे मोठे आव्हानही पेलावे लागेल. गोपालनातील चुका टाळण्यासाठी आणि आधुनिक युगात गोवंश शाश्‍वत फायद्याचा ठरण्यासाठी परिषदेतील सहभाग मोलाचा ठरेल. समुद्र मंथनातून मिळालेल्या रत्नापैकी ‘गोरत्न'' विज्ञानयुगात वैचारिकदृष्ट्या सजण्यासाठी समन्वय, शिफारशी, चर्चासत्र, विचार देणारी गोपरिषद यशस्वी करण्यासाठी शुभेच्छा!

डॉ. नितीन मार्कंडेय : ९४२२६५७२५१ (लेखक परभणी येथील पशुविज्ञान महाविद्यालयात प्राध्यापक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com