agriculture news in marathi agrowon special article on world environment day | Agrowon

पर्यावरण संवर्धन ही सामुहिक जबाबदारी

डॉ. नितीन उबाळे
शुक्रवार, 5 जून 2020

१९७४ पासून आपण ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिवस साजरा करीत आहोत. या वर्षी संयुक्त राष्ट्र संघाने हा दिवस "टाइम फॉर नेचर" ह्या संकल्पनेस अनुसरून साजरा करावयाचे ठरविले आहे. पर्यावरणास पोषक सुविधा निर्माण करून त्याद्वारे पृथ्वीचे रक्षण व मानवी विकास साधण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर आपण कोठे आहोत, याचा घेतलेला हा आढावा...

आपणास दैनंदिन जीवनात आवश्यक असलेली हवा, पाणी आणि अन्न याचा प्रमुख स्रोत असलेल्या पर्यावरणाची काळजी घेणे सर्वांनीच गरजेचे मानले पाहिजे. या निमित्ताने मानवी जीवनास आवश्यक असलेल्या पाणी व नैसर्गिक जैव विविधतेच्या जगभरातील स्थितीचा आढावा देखील घेणे गरजेचे आहे. २०२० या वर्षात आपणास जैव विविधतेचा ऱ्हास रोखणे व संवर्धनाकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे बनले आहे. ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया देशातील वणवे असो कि पूर्व आफ्रिकेतील टोळधाडीचे संकट या घटनांमधून निसर्ग व मानवांमधील संघर्ष सातत्याने समोर आला आहे. मात्र अशा घटनांमधून निसर्ग आपणास काही संदेश देऊ पाहत आहे, हे मात्र नक्की!

जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफच्या २०१९ मधील संयुक्त अहवालानुसार जगभरात जवळपास २२० कोटी लोकांना शुद्ध सुरक्षित पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे जागतिक पाणी समस्येवर कृती करणे अधिक गरजेचे आहे. या समस्येमुळे जगभरातील जल आणि पर्यावरण अभ्यासकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. २०३० सालापर्यंत सर्वांसाठी पाणी आणि स्वच्छतेच्या सुविधा पुरविण्याचे उद्धिष्ट साध्य करावयाचे आहे. जर आपण जागतिक तापमानवाढ औद्योगिकपूर्व पातळीपेक्षा १.५ अंश सेल्सियसपर्यंत मर्यादित ठेवण्यात यशस्वी झालो तर हवामानाद्वारे प्रेरित पाण्याचा ताण ५० टक्क्यापर्यंत कमी करू शकतो. संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस अँटोनिओ गटर्रस यांनी आवाहन केले आहे कि, पाण्याची वस्तुस्थिती ध्यानात घेता चेतावणी देणे आवश्यक आहे. पण भीतीमुळे काम पूर्ण होणार नाही. हवामानातील बदल भयानक आणि त्रासदायक वाटू शकतात. परंतु 'पाण्याचा अपव्यय टाळा' हे एक सोपे पाऊल आपण ताबडतोब उचलू शकतो. ज्यामुळे परिस्थिती बदलण्यास नक्कीच मदत होईल. आज पाण्याच्या वापराबाबतीत अधिक जबाबदारीने वागण्याची गरज निर्माण झाली आहे.

वने व जैव विविधता हे पर्यावरणातील महत्वाचे घटक असून त्यांची जपणूक करायला हवी. मानवाच्या दैनंदिन अन्न, निवारा, वस्त्र आणि औषधीय गरजांकरिता सुमारे ४० हजार वनस्पती व प्राण्यांच्या प्रजातीचा वापर केला जातो. आज जागतिक जैव विविधतेच्या ऱ्हासाचा विचार करता बेसुमार जंगलतोड हे प्रमुख कारण आढळते. जगाच्या एकूण भूभागापैकी जवळपास ३१ टक्के क्षेत्र हे जंगलाने व्यापले आहे. जगाच्या निम्म्याहून अधिक जंगलांचे क्षेत्र ब्राझील, रशिया, कॅनडा, अमेरिका आणि चीन या देशांमध्ये आढळते. यामध्ये भुपृष्टीय वनस्पती व प्राणी यांचा अधिवास प्रामुख्याने आढळतो. संयुक्त राष्ट्राने २०११ ते २०२० हे दशक जैवविविधता जागृती व संवर्धनासाठी जाहीर केले होते. जागतिक वनांच्या स्थितीचा अहवाल नुकताच प्रकाशित झाला. वाढती जंगलतोड आणि औद्योगिकरण यामुळे जैव विविधतेवर संकट आले आहे. ही धोक्याची घंटा मानव केव्हा ऐकणार हा प्रश्न सातत्याने चर्चिला जातोय. १९९० पासून जवळपास ४२० दशलक्ष हेक्टर वन क्षेत्र संपुष्ठात आले आहे. २०१५ ते २०२० या कालावधीत प्रति वर्ष १० दशलक्ष हेक्टर क्षेत्राची जंगलतोड झाल्याचे एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. जवळपास १०० दशलक्ष वन क्षेत्रावर जंगलातील वणवे, रोग, किडी, दुष्काळ आणि प्रतिकूल हवामान बदलाच्या घटना यांचा परिणाम झाला आहे.

जंगलतोडीसोबतच दुसरे प्रमुख कारण म्हणजे शेती क्षेत्राचा वाढता विस्तार. वन जमिनींचे शेतीमध्ये रूपांतर करण्याचे प्रमाणही जंगलाचे तुकडे व जैव विविधतेचा ऱ्हास होण्यास कारणीभूत आहे. व्यावसायिक शेती मधील जनावरे पालन, सोयाबीन लागवड आणि पामतेलाची शेती यामुळे उष्ण कटिबंधातील ४० टक्के जंगलतोड झाल्याचे २००० ते २०१० या काळात आढळून आले आहे. १९९० च्या तुलनेत जंगलतोड क्षेत्रामध्ये घट झाल्याचे आढळून येत आहे.

टोळधाडीचे संकट मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे आफ्रिका खंडातील बऱ्याच देशांच्या अन्न सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिला आहे. यात दिवसेंदिवस वाढ होत राहणार आहे. यातच भरीस भर म्हणून आज जगभर कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. २०१६ मध्ये संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण कार्यक्रमाद्वारे येणाऱ्या काळात प्राण्यांकडून मानवास होणारे रोग हा महत्वाचा विषय असणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. आज विषाणूजन्य रोगांचा जो प्रसार आपण पाहतोय हा मानवी हस्तक्षेपाचा परिपाक म्हणावा लागेल. एकीकडे सर्वांगीण मानवी प्रगतीच्या चर्चा तर दुसरीकडे महासत्ता बनण्याची सर्वच राष्ट्रांची स्वप्ने व त्यातून निर्माण झालेले व्यापार युद्ध याबाबत कधीतरी चिंतन करावे लागणार आहे. नुकतेच कोरोनाच्या संकट काळात जगभरातील बऱ्याच राष्ट्रांनी टाळेबंदी (लॉक डाउन) जाहीर केल्याने निसर्गातील प्रदूषण पातळीची चर्चा रंगू लागली. उदाहरण दाखल आपण दिल्लीचा विचार केला असता या काळात दिल्लीतील प्रदूषण पातळी खूप कमी झाल्याचे दिसून आले. बऱ्याच शहरात पक्ष्यांचा स्वच्छंद विहार व आवाज यांची अनुभूती देखील लोकांना आली.

उत्तम मानवी आरोग्य आणि जैवविविधतेसाठी पर्यावरणाची गुणवत्ता राखणे व संवर्धन करणे आवश्यक आहे. येणाऱ्या काळात हवामान बदलांच्या अनुषंगाने धोरण निश्चिती करताना धोरण कर्त्यांनी 'पाणी, वने आणि अन्न सुरक्षितता' हा विषय विकास कृती आराखड्याच्या केंद्रस्थानी ठेवावा. पर्यावरणातील हवामान बदलाच्या उपाय योजनांवर बऱ्याच विकसित देशांनी भरीव तरतूद केली आहे. तर दुसरीकडे अमेरिकेने मात्र गेल्या अर्थ संकल्पात कपात करून हवामान बदलाच्या संशोधन व उपाय योजनांना खीळ घालण्याचे काम केले. हे चित्र निराशाजनक आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धन ही सर्वच राष्ट्रांची सामूहिक जबाबदारी आहे. येणाऱ्या काळात पर्यावरण संवर्धनाचा साकल्याने विचार करणे गरजेचे आहे अन्यथा निसर्ग व मानवातील संघर्ष आणखी तीव्र होत जाणार हे मात्र नक्की!

डॉ. नितीन उबाळे
- ९९७५६७८१७५
(लेखक पारुल विद्यापीठ, वडोदरा (गुजरात) येथे सहाय्यक प्राध्यापक आहेत)


इतर अॅग्रो विशेष
कृषी आयुक्त दिवसेंची बदली, गायकवाड...मुंबई : राज्य सरकारने शनिवारी महत्त्वपूर्ण...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांना आरोपी नव्हे...पुणे : राज्यात खते, बियाणे, कीटकनाशकांची विक्री...
आनंदाची पातळी बदलतेय उत्पन्नांनुसारआजच्या जगामध्ये सामाजिक आर्थिक निकषांमध्ये वेगाने...
शेती क्षेत्रातील बदल टप्याटप्याने...नागपूर ः शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कृषी...
राज्यात कृषी सेवा केंद्रांचा बंद सुरूपुणेः सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
औरंगाबाद जिल्ह्यातील थेट शेतमाल विक्री...औरंगाबाद : कोरोना संकटामुळे शेतकरी ते ग्राहक...
रुतलेले अर्थचक्राने विकासालाही ‘ब्रेक’''मूडी'' या पतमानांकन संस्थेने अलीकडेच आपला अहवाल...
बेलखेडा होणार संत्रा उत्पादक गावरिसोड, जि. वाशीम ः तालुक्यातील दोन हजार लोकसंख्या...
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात...सोलापूर ः  आषाढी यात्रेच्या कालावधीसाठी श्री...
बियाणे प्रमाणीकरण यंत्रणेचा कारभार...नागपूर ः ‘शुध्द बिजापोटी फळे रसाळ गोमटी’ असे...
राज्यात पावसाचा कमी अधिक जोर पुणे : राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज वादळी...पुणे : कोकणात अनेक ठिकाणी पावसाचा मुसळधार पाऊस...
‘रायरेश्‍वर ’ गटाचा; सेंद्रिय हळदीचा...नाटंबी (ता. भोर, जि. पुणे ) येथील श्री. रायरेश्वर...
दुग्धप्रक्रिया उद्योगातून कमावला...सांगली येथील माळी कुटुंबीय गेल्या काही...
ग्लायफोसेटच्या थेट वापरावर बंदीच्या...पुणे: अलीकडील वर्षांत सातत्याने चर्चेत असलेल्या...
कृषी पायाभूत सुविधांसाठी एक लाख कोटींचा...नवी दिल्ली: केंद्र सरकारने शेतमाल काढणीपश्‍चात...
अजून एक `लातूर पॅटर्न’कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर एप्रिल, मे, जून...
सत्त्वयुक्त उत्पादनांची हवी कृषी...माणसाच्या उपभोगासाठी उपयुक्त असलेली जैवविविधता...
सिंधुदुर्गात मुसळधार सुरूच, पुरस्थिती...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच...
कोल्हापुरातील छोटे प्रकल्प भरू लागलेकोल्हापूर :  जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस...