agriculture news in marathi, agrowon special article on world meteorological day | Agrowon

आदित्यात् जायते वृष्टि:

डॉ. रंजन केळकर  
शनिवार, 23 मार्च 2019

जागतिक हवामानशास्त्रीय संस्थेच्या स्थापनेचं (२३ मार्च १९५०) संस्मरण म्हणून २३ मार्च हा दिवस ‘जागतिक हवामानशास्त्र दिन’ म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी त्यासाठी एक नवीन विषय निवडला जातो. या वर्षीचा विषय आहे ‘‘सूर्य, पृथ्वी आणि हवामान.’’ या तिन्‍हींचा एकमेकांशी असलेल्या संबंधाचा घेतलेला हा वेध...
 

जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती, लोकसंख्या, भाषा अशा विविध बाबींत ते सगळेच निराळे आहेत. प्रत्येक देशाची आपली वैशिष्ट्यं आहेत आणि प्रत्येकानं आपल्या सीमा आखलेल्या आहेत, ज्यांचं कोणी उल्लंघन करू शकत नाही. पण पृथ्वीभोवतीचं वातावरण त्या सर्व देशांना जोडणारा एक नैसर्गिक दुवा आहे. वातावरण चंचल असतं. त्यातील वारे इकडून तिकडे सतत वाहत असतात आणि देशांच्या भौगोलिक सीमा ते सहज ओलांडतात. म्हणून कोणत्याही देशाला त्याच्या हवामानावर मालकी हक्क गाजवता येत नाही. हवामानाचा अभ्यास करायचा असेल तर जगातील सर्व देशांना एकत्र येऊन तो करावा लागतो. या उद्देशानं संयुक्त राष्ट्र संघटनेनं २३ मार्च १९५० रोजी एक कायमस्वरूपी यंत्रणा उभारली, जिला ‘जागतिक हवामानशास्त्रीय संस्था’ असं नाव दिलं गेलं आणि तिचं मुख्यालय जिनेव्हा इथं स्थापन केलं गेलं. भारत तेव्हापासून या संस्थेचा सदस्य आहे आणि तिच्या कार्यात तो नेहमीच सहभागी राहिला आहे. जागतिक हवामानशास्त्रीय संस्थेच्या स्थापनेचं संस्मरण म्हणून २३ मार्च हा दिवस ‘जागतिक हवामानशास्त्र दिन’ म्हणून साजरा केला जातो. दर वर्षी त्यासाठी एक नवीन विषय निवडला जातो. या वर्षीचा विषय आहे “सूर्य, पृथ्वी आणि हवामान.” 

आपण आकाशाकडे रात्री पाहिलं तर आपल्याला असंख्य लुकलुकणारे तारे दिसतात. पण सूर्य हा असा एक तारा आहे जो आपल्याला दिवसा दिसतो, कारण तो पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे. सूर्य आपल्याला त्याची उष्णता आणि प्रकाश देतो. पृथ्वीवरचं सगळं जीवन, आणि विशेषतः पृथ्वीचं हवामान, सूर्याशी निगडित आहे. पूर्वीच्या काळी अशी समजूत होती की, पृथ्वी अचल आहे आणि सूर्य तिच्याभोवती फिरतो. म्हणून सूर्योदय आणि सूर्यास्त असे शब्द प्रचलित झाले आणि अजूनही ते आपण वापरतो. पण वास्तव हे आहे की, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, ती स्वतःच्या अक्षाभोवतीही फिरते, आणि तो अक्ष काहीसा झुकलेला आहे. या तीन कारणांमुळं आपण पृथ्वीवर दिवस व रात्र, उन्हाळा व हिवाळा आणि हवामानातील दैनंदिन परिवर्तन अनुभवतो. 

सूर्याचं तापमान सुमारे ६००० अंश सेल्सिअस आहे, पण त्याची ऊर्जा पृथ्वीपर्यंत येता येता बरीच घटते आणि पृथ्वीचं तापमान फक्त १४ अंश सेल्सिअस एवढंच राहतं. अर्थात हे सरासरी तापमान आहे. पृथ्वीवरील विभिन्न प्रदेशांवर विभिन्न ऋतूंत तापमान याहून खूपच कमी किंवा अधिक असू शकतं. पृथ्वीचं तापमान आटोक्यात राहणं सर्व सजिवांसाठी व मानवासाठी, त्याचप्रमाणं सर्व वनस्पतींसाठी व पिकांसाठी, अतिशय महत्त्वाचं आहे. हे तापमान आटोक्यात राहावं म्हणून सूर्यापासून जी काही ऊर्जा पृथ्वीला प्राप्त होते ती तिला अवकाशात परत सोडावी लागते. ही नैसर्गिक प्रक्रिया अव्याहतपणे सुरू असते आणि तिला ऊर्जेचं संतुलन म्हणतात. 

आता कल्पना करा की, सूर्यापासून मिळालेली सगळी ऊर्जा पृथ्वीनं परत केली नाही, आणि हे संतुलन बिघडलं, तर काय होईल? अर्थातच पृथ्वी तापेल. नेमकं तेच आताच्या काळात घडत आहे. त्यालाच ‘ग्लोबल वॉर्मिंग’ म्हणतात, किंवा वैश्विक तापमान वाढ जी आपण हल्ली अनुभवत आहोत. यामागं एकच प्रमुख कारण आहे की, पृथ्वीचं वातावरण अनेक प्रकारच्या वायूंचं एक मिश्रण असून त्यांच्यात काही वायू असे आहेत जे ऊर्जा शोषून घेतात. या वायूंनी जितकी उष्णता शोषली तितकी जर त्यांनी परत केली तर पृथ्वीचं सरासरी तापमान कायम राहील. अठराव्या शतकापर्यंत हे असंच होत असे. पण मध्यंतरी जगात जी औद्योगिक क्रांती झाली आणि मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण आलं, तेव्हापासून वातावरणातील कार्बनडाय ऑक्साइडचं प्रमाण सातत्यानं वाढत गेलं आहे. कार्बनडाय ऑक्साइड वायू वातावरणात अतिशय सूक्ष्म प्रमाणात असतो, पण त्याची उष्णता शोषून घ्यायची क्षमता फार मोठी आहे. जोपर्यंत कार्बनडाय ऑक्साइडच्या उत्सर्जनावर आळा घातला जात नाही तोपर्यंत पृथ्वीचं तापमान भविष्यात वाढतच जायची शक्यता आहे. ही सर्वांसाठी एक चिंतेची बाब आहे आणि जगातील शास्त्रज्ञ आणि राष्ट्रप्रमुख या समस्येवर विचार करत आले आहेत. पेट्रोल आणि खनिज तेलांचा इंधनासाठी, वाहनं चालविण्यासाठी आणि विद्युत निर्मितीसाठी सध्या होत असलेला उपयोग हळूहळू कमी करून त्याऐवजी सौर आणि पवन ऊर्जेचा उपयोग करणं हा एक उपाय आहे. भारतात सौर ऊर्जेच्या वापरासाठी प्रचंड वाव आहे, कारण आपला देश उष्ण कटिबंधात मोडतो आणि आपल्याकडे मॉन्सूनचे महिने वगळता नेहमीच भरपूर सूर्यप्रकाश उपलब्ध असतो. भारताला निसर्गानं दिलेलं हे वरदान आहे. मॉन्सूनच्या कालावधीत सूर्यप्रकाश कमी मिळत असला तरी त्याची भरपाई म्हणून मॉन्सूनचे जोरदार वारे वाहतात, ज्यांचा उपयोग पवनचक्क्या चालविण्यासाठी करता येतो. 

सारांश हा की, वैश्विक तापमान वाढ आणि त्यामुळं घडत असलेल्या हवामान बदलामुळं आपण गांगरून न जाता त्याचा सामना करायचा प्रयत्न केला पाहिजे. भारतीय हवामानशास्त्र विभाग म्हणजेच ‘आयएमडी’च्या लोगोमध्ये ‘‘आदित्यात् जायते वृष्टि:’’ हे एक संस्कृत वाक्य आहे. हे प्राचीन काळचं भारतीय विज्ञान केवळ तीन शब्दांत एक प्रगल्भ सत्य उलगडतं. त्याचा सोपा अर्थ असा आहे, की सूर्य हा पर्जन्याचा जनक आहे. पण त्यात आपल्यासाठी एक भरीव आश्वासन आहे, की जोपर्यंत सूर्य आहे, तोपर्यंत पृथ्वीवर पाऊस पडत राहील हे नक्की! म्हणून कोणी जर असं भविष्य वर्तवलं, की यापुढं पर्जन्यमानात सातत्यानं घट होत राहील किंवा वारंवार दुष्काळ पडतील, तर त्याला प्राचीन किंवा आधुनिक विज्ञानाचा आधार नाही, हे आपण लक्षात घ्यावं.

डॉ. रंजन केळकर : ९८५०१८३४७५
(लेखक ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ आहेत.)



इतर अॅग्रो विशेष
राज्यासह देशात शिवजयंती उत्साहात साजरीपुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी...
शिवरायांची भविष्यवेधी ध्येयधोरणेछत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने रयतेचा राजा...
आपणच आपला करावा उद्धारशेती फायद्याची करायची असेल, तर शेतकऱ्यांनी एकत्र...
हवामानबदलाशी लढण्यासाठी एक हजार कोटी...पुणे ः जागतिक हवामानबदलाची समस्या संपूर्ण जगासमोर...
राज्यात उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : राज्यात कमाल तापमानात मोठी वाढ झाल्याने...
कापसाचे ६४७ कोटींचे चुकारे थकीतअमरावती ः बाजारात दर कोसळल्याने महाराष्ट्र राज्य...
‘पणन’ची कापूस खरेदी उच्चांकी दिशेनेऔरंगाबाद : महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन...
शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीत ८५ स्वराज्यरथ...पुणे : ‘‘पुण्यात शिवजयंती महोत्सव समितीतर्फे आज...
सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षकाची...औरंगाबाद शहरापासून सुमारे बारा किलोमीटरवर...
कापूस उद्योगाचे चीनमध्ये पाच हजार कोटी...जळगाव ः देशातील सूत व कापूस गाठींचा मोठा खरेदीदार...
हमीदराने खरेदीसाठी तुरीचे संपूर्ण...वाशीम ः तुरीचे स्वतंत्रपणे पीक घेण्याची पद्धत...
पंधरा लाख कापूस गाठींची खानदेशातील...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
शेतीमाल निर्यातवाढीसाठी सुकाणू समितीची...पुणे : राज्य सरकारने स्वतंत्र कृषी निर्यात धोरण...
बियाणे परवान्यासाठी केंद्रीय पद्धती...नवी दिल्ली: केंद्र सरकार सुधारित बियाणे विधेयक...
शिवनेरीवर उद्या शिवजयंती सोहळापुणे: छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या ३९० व्या...
चीनला होणाऱ्या कोळंबी निर्यातीला फटकानवी दिल्ली: चीनमध्ये कोरोना विषाणूने थैमान...
कापूस, मक्यावरील अळी नियंत्रणाचे काम...अकोला ः नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कापूस,...
किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाजपुणे : राज्यात कमाल व किमान तापमानात सातत्याने...
'सोया’ पदार्थांना मिळवली ग्राहकांकडून...अमरावती जिल्ह्यातील दुर्गम अंजनसिंगी (ता. धामणगाव...
दर्जेदार फरसबीचे वर्षभर उत्पादनकमी कालावधीतील पिके वर्षभर टप्प्याटप्प्याने...