दूरचे महासागर आणि आपले हवामान

कोणत्याही ठिकाणचे हवामान कधीच पूर्णपणे स्वतंत्र नसते. जागतिक हवामानाशी तसेच महासागरांच्या हालचालींशी त्याचा निकटचा संबंध असतो. या गोष्टीची आपल्याला विशेष जाणीव व्हावी, हे यंदाच्या जागतिक हवामान दिनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
agrowon editorial article
agrowon editorial article

भारतीय शेती मोठ्या प्रमाणात हवामानावर अवलंबून आहे, हे नव्याने सांगायची गरज नाही. शेतकऱ्यांना ते माहीत आहे. पेरणीपासून ते कापणीपर्यंत पिकाच्या वाढीच्या प्रत्येक अवस्थेत ते हवामानाचा विचार करत असतात. दुसऱ्या देशात काय परिस्थिती आहे, किंवा दूरवरच्या महासागरांवर काय घडत असेल, याच्याशी त्यांचे फारसे देणेघेणे नसते. पृथ्वीचा ७० टक्के पृष्ठभाग समुद्राच्या पाण्याने व्यापलेला आहे आणि केवळ ३० टक्के जमीन आहे. समुद्राचे पाणी सूर्याकडून मिळणारी उष्णता शोषून घेते. समुद्रातील प्रचंड प्रवाह ती उष्णता पृथ्वीवर सर्वत्र पसरवण्याचे काम करतात. सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन होत राहते. हे बाष्प वर जाऊन हवेच्या प्रवाहांबरोबर वाहत जाते. त्याचे ढग बनतात आणि जमिनीवर पाऊस पडतो. अशा प्रकारे समुद्र आणि वातावरण एकत्रितपणे काम करून पृथ्वीच्या विविध प्रदेशांवर उष्णता आणि पाणी घेऊन जातात. म्हणून स्थानिक हवामानाचा अंदाज देतानासुद्धा हवामानशास्त्रज्ञ दूरवरच्या घटना लक्षात घेत असतात. 

चक्री वादळे अत्यंत विनाशकारी अशी चक्री वादळे जमिनीवर निर्माण होत नाहीत. कारण त्यांना शक्तिशाली बनवणारी ऊर्जा केवळ समुद्र पुरवू शकतो. विशेषतः जेव्हा समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान २७ अंश सेल्सिअस किंवा त्याहून जास्त वाढते तेव्हा त्यांची निर्मिती होते. सुरुवातीस एक कमी दाबाचे क्षेत्र बनते आणि मग ते हळूहळू तीव्र होत जाऊन रुद्र रूप धारण करते. भारतीय प्रायद्वीपच्या पूर्वेकडे बंगालचा उपसागर आहे आणि पश्चिमेकडे अरबी समुद्र आहे. भारताच्या दक्षिणेकडे विशाल हिंद महासागर आहे. बंगालच्या उपसागरावर जी चक्री वादळे उद्भवतात ती कधी कधी तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा किंवा पश्चिम बंगाल राज्यांच्या किनाऱ्यांपर्यंत पोहोचतात, ही चक्री वादळे किनारा ओलांडताना शेतीचे आणि मालमत्तेचे प्रचंड नुकसान होते. अलीकडच्या काळात मात्र चक्री वादळांचे पूर्वानुमान अगदी अचूकपणे दिले जात असल्यामुळे किनाऱ्यावरील लोकांना सुरक्षित स्थळी आधीच हालवणे आणि मनुष्यहानी टाळणे आता शक्य झाले आहे. बंगालच्या उपसागरावरील चक्री वादळे महाराष्ट्रापर्यंत पोहोचू शकत नाहीत. अरबी समुद्रावर उद्भवलेली चक्री वादळे बहुधा पश्चिमेकडे ओमान देशाकडे जातात, पण क्वचितपणे ती काहीसा वळसा घेऊन महाराष्ट्र किंवा गुजरातचे किनारे ओलांडतात. ‘निसर्ग’ चक्री वादळाने कोकण किनारा ओलांडून मध्य महाराष्ट्रात प्रवेश केला होता. 

मॉन्सून मॉन्सूनच्या प्रक्रियेत सबंध आशिया खंड आणि हिंद महासागर भाग घेत असतात. बदलणाऱ्या ऋतूबरोबर जमिनीचे आणि समुद्राचे तापमान बदलत असते. उन्हाळ्यात जमीन खूप तापते पण त्या मानाने हिंद महासागर थंड असतो. उलट हिवाळ्यात जमीन थंड होते तसा समुद्र लवकर थंड होत नाही. तापमानाच्या या विषमतेमुळे उन्हाळ्यात हिंद महासागरावरील वारे जमिनीकडे वाहतात आणि भारतावर बाष्प, ढग व पाऊस घेऊन येतात, ज्याला आपण नैऋत्य मॉन्सून म्हणतो. हिवाळ्यात वाऱ्यांची दिशा पालटते आणि पाऊस थांबतो. विशाल हिंद महासागराचे तापमान सर्वत्र सारखे नसते. त्याच्या तापमानातील तफावतीचा आणि उतारचढावाचा भारतीय मॉन्सूनच्या पावसावर चांगला किंवा विपरीत प्रभाव पडू शकतो. म्हणून हवामानशास्त्रज्ञ त्यावर कायम लक्ष ठेवून असतात.  भारतीय मॉन्सूनचा संबंध केवळ आपल्या जवळच्या हिंद महासागराशी आहे, असे नाही. त्याचा संबंध दूरवरच्या प्रशांत महासागरावरील हालचालींशीही आहे ज्या ‘एल निनो’ आणि ‘ला निना’ या नावांनी ओळखल्या जातात. प्रशांत महासागर अतिशय विस्तीर्ण आहे. दर दोनतीन वर्षांनी त्याच्या पूर्वेकडच्या भागाचे तापमान सरासरीपेक्षा जास्त वाढते. त्या परिस्थितीला ‘एल निनो’ असे नाव आहे. विशेष हे की, प्रशांत महासागर भारताहून खूप दूर असला तरी ‘एल निनो’चा परिणाम भारतीय मॉन्सूनच्या पावसावर होऊ शकतो आणि तो अनेकदा विपरीत असतो. त्यामुळे भारतीय मॉन्सूनच्या पर्जन्यमानाचे दीर्घ अवधी पूर्वानुमान जाहीर करताना हवामानशास्त्रज्ञ ‘एल निनो’ची परिस्थिती विशेषकरून लक्षात घेतात. याउलट ‘ला निना’ म्हणजे तापमान सरासरीहून कमी होणे, जे भारतीय मॉन्सूनसाठी लाभदायक ठरते. अशी परिस्थिती मागच्या वर्षी होती आणि मॉन्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा ९ टक्के अधिक पडला होता. महाराष्ट्रातही सर्वत्र भरपूर पाऊस झाला होता.  

समुद्राचे निरीक्षण हवामानाच्या अचूक अंदाजांसाठी वेधशाळांनी केलेल्या नोंदींप्रमाणेच महासागरांवरील परिस्थितीची माहिती मिळवणे महत्त्वाचे आहे. भारतीय बनावटीचा इन्सॅट-३ डी उपग्रह हिंद महासागरावर अहोरात्र नजर ठेवून असतो. त्याव्यतिरिक्त ‘डेटा बॉइज’ नावाची काही यंत्रे असतात जी समुद्रावर नेमलेल्या जागी तरंगत ठेवली जातात. त्यावरील स्वयंचलित उपकरणे समुद्राची माहिती उपग्रहाद्वारे हवामानशास्त्रज्ञांना पोहचवतात. भारताची स्वतःची अशी अनेक यंत्रे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावर कार्यरत आहेत. त्याशिवाय भारताचे दुसऱ्या प्रकारचे ‘डेटा बॉइज’ आहेत जे एका ठिकाणी स्थित नसून समुद्री प्रवाहांबरोबर वाहत जाताजाता नोंदी करत राहतात. वैश्विक तापमान वाढीचा समुद्रावर दोन प्रकारे परिणाम होत आहे. एक तर समुद्राचे तापमान वाढत चालले आहे आणि दुसरे म्हणजे समुद्राच्या पातळीत वाढ होत आहे. समुद्राचे तापमान वाढल्याने चक्री वादळांच्या संख्येत किंवा तीव्रतेत वाढ होण्याची शक्यता आहे. आणि समुद्राच्या वाढत्या पातळीचा किनारपट्टीला धोका आहे. या दोन्ही बाबींवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे.  दर वर्षी २३ मार्च रोजी जिनेव्हा येथील संयुक्त राष्ट्रांची हवामानशास्त्र संस्था जागतिक हवामानशास्त्र दिन पाळत असते. हवामानाच्या विविध पैलूंविषयी जागरूकता वाढवणे हा त्यामागचा हेतू आहे. हवामानाच्या माहितीची नोंद करण्यात आणि तिची अन्य देशांबरोबर देवाणघेवाण करण्यात भारताचा मोठा सहभाग आहे. हवामानाबरोबर समुद्राची माहिती मिळवणे हे आता अगत्याचे बनले आहे. समुद्र आपल्याला दिसत नाही किंवा तो आपल्यापासून खूप दूर आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. 

- डॉ. रंजन केळकर - 9850183475 (लेखक ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ आहेत)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com