त्रस्त शेतकरी वाटणार ३ मेपासून मोफत दूध

त्रस्त शेतकरी वाटणार ३ मेपासून मोफत दूध
त्रस्त शेतकरी वाटणार ३ मेपासून मोफत दूध

नगर/औरंगाबाद  : गतवर्षी शेतकरी संपानंतर सरकारने दुधाला किमान २७ रुपये दर देण्याचे जाहीर केले होते. सध्या मात्र दुधाला केवळ सोळा ते आठरा रुपये दर मिळत आहे. सरकार दूध उत्पादकांची हेळसांड करत आहे. मातीमोल दराने दूध विकण्यापेक्षा ‘फुकट दिलेलं बरं’ अशी भावना ठेवून ३ मेपासून लोकांना पहिल्या टप्प्यात दहा हजार लिटर दूध देण्याची मोहीम सुरू केली जाणार आहे.

लाखगंगा (ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) येथे शनिवारी (ता. २१) ग्रामसभा घेऊन जवळपास चार गावांतील शेतकरी निर्णय घेणार आहेत. राज्यभरातील शेतकऱ्यांनाही मोफत दूध देण्याचे अवाहन केले जाणार आहे. दूध व्यवसायाबाबत केवळ सरकारच्या चुकीच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी हा असा निर्णय घेतला जात आहे.

शेतीमाल, दुधाला दर मिळत नसल्याने गतवर्षी १ जूनपासून शेतकऱ्यांनी संप पुकारला होता. इतिहासात पहिल्यांदाच असा संप झाला. पुणतांबा (ता. राहाता) येथून त्याची सुरवात झाल्यानंतर राज्यभरात संपाची तीव्रता वाढली आणि सरकारला झुकावे लागले. त्यानंतर वारंवार झालेल्या बैठकीत शेतीमालाला हमीदर आणि ३.५ फॅट व २८ अंश असलेल्या दुधाला किमान २७ रुपये प्रतिलिटर दर देण्याचे सरकारने अश्‍वासन दिले होते. मात्र काही काळातच सरकारला अश्‍वासनाचा विसर पडला.

सध्या दूध उत्पादकांची आवस्था वाईट आहे. २७ रुपयांएेवजी अवघा सोळा ते आठरा रुपये प्रतिलिटरला दर मिळत असल्याने सध्या दूध व्यवसाय तोट्यात आहे.  ‘‘जास्तीचे दूध असल्यामुळे दर कमी आहेत’’ असे सरकारकडून सांगितले जात आहे. बहुतांश शेतकरी शेतीला दूध व्यवसायाची जोड देत असून, अनेकांचे संसार दूध व्यवसायावर अवलंबून आहेत. सरकार मात्र दूध व्यवसायाबाबत नकारात्मक आहे.

सध्याचा दर परवडत नाही अन्‌ सरकारही दर देत नसल्याने ‘विकण्यापेक्षा फुकट देऊ’ या निर्णयापर्यंत शेतकरी आले आहेत. त्यासाठी नगर जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या लाखगंगा (ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) येथे औरंबागाबाद जिल्ह्यामधील शेतकरी नेते धनंजय धोर्डे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी (ता. २१) ग्रामसभा घेऊन ३ मेपासून दूध लोकांना फुकट देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. परिसरातील झोनगाव, बाभूळगाव, पुरणगाव व अन्य गावांतील शेतकरी ग्रामसभेला असतील. सुरवातीच्या टप्प्यात चार-पाच गावांतील शेतकरी दररोज साधारण दहा हजार लिटर दूध मोफत वाटतील.

राज्यभरातील शेतकऱ्यांना विनंती करणार पुणतांब्यापासून सुरू केलेल्या शेतकरी संपाप्रमाणे सरकारच्या भूमिकेचा निषेध करत मोफत दूध देण्याच्या मोहिमेत राज्यातील शेतकरी सहभागी व्हावेत, यासाठी धोर्डेपाटील यांच्यासह लाखगंगा व परिसरातील गावाचे दूध उत्पादक शेतकरी विनंती करणार आहेत. दुधाचे दर कमी करता, दुधापासून तयार केलेल्या दुग्धजन्य पदार्थांचे दर कसे कमी होत नाहीत. शेतकऱ्यांकडून कमी दरात घेता आणि लोकांनी मात्र तिप्पट दराने विकता, याचा सरकारला शेतकऱ्यांनी जाब विचारावा, असे अवाहन करत सोशल मीडियाचीही मदत घेतली जाणार आहे.

गतवर्षी सरकारने दुधाला सत्तावीस रुपये दर देण्याचे अश्‍वासन दिले, मात्र पाळले नाही. सध्या दूध व्यवसायिकांची आवस्था गंभीर असताना सरकार जाणीवपूर्वक लक्ष देत नाही. विरोधातील लोकही बोलत नाहीत. दूध संघाचे आणि सरकारचे साटेलोटे असल्याची शंका येते. मातीमोल दराने विकण्यापेक्षा फुकट दिलेले बरे, म्हणून दूध मोफत देण्याचा निर्णय घेत आहोत. - धनंजय धोर्डे, शेतकरी नेते, औरंगाबाद.

दूध संघ आणि शासन मिळून दूध उत्पादकांची लूट करीत आहेत. मागच्या आंदोलनापासून आजवर दहा ते बारा रुपयाने दुधाचे दर घसरले. तशीही आर्थिक अडचण येतेच त्यामुळे प्रसंगी ३ मे पासून संघ वा डेअरीला फूकट दूध घालण्याचाही निर्णय उत्पादक शेतकरी घेऊ शकतात.  - धनंजय धोर्डे, शेतकरी नेते.

काय करायचं या विवंचनेत सारेच दूध उत्पादक होते. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी शनिवारी (ता.२१) ग्रामसभेतून निर्णय घेतला जाईल. तो एकच विषय या ग्रामसभेच्या अजेंड्यावर आहे. सर्वसहमतीने निर्णय घेतला जाईल.  - दिगंबर तुरकने, सरपंच लाखगंगा, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद. 

दुभती पाच जनावरं होती. आता एकच ठेवलं आहे. खर्च आणि उत्पन्नाचा मेळ बसत नसल्याने इच्छा असूनही शेतीला पूरक दुग्ध व्यवसाय बंद करावा लागला.  रमेश गोर्डे, शेतकरी देवगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद. 

आमच्या गावातील चार दूध उत्पादक जाफराबादला दूध घालतात. १६ ते १८ रुपयांपर्यंतचे दर मिळतात. परवडत नाही, त्यामुळे आर्थिक अडचण कायम असते.  - बबन थुट्‌टे, शेतकरी नळविहिरा, ता. जाफ्राबाद, जि. जालना.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com