धुळ्यात सव्वा लाख हेक्‍टरवर रब्बी पेरणीचा अंदाज

रब्बी पेरणी तयारी
रब्बी पेरणी तयारी

धुळे : जिल्ह्यात एक लाख २० हजार हेक्‍टरवर रब्बी हंगामातील विविध पिकांची पेरणी होईल, असा अंदाज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने बियाणे, खतांचे नियोजन सुरू झाले आहे.

अजूून पावसाळा सुरू आहे. या महिनाअखेरपर्यंत किती पाऊस पडतो, यावरूनही नियोजनात बदल केला जाऊ शकतो. पण यंदा जिल्ह्यात ज्वारीची पेरणी अधिक होईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे यांनी सांगितले.

धुळे जिल्ह्यात पावसाचे प्रमाण फारसे नाही. अलीकडेच साक्री व धुळे तालुक्‍यांतील काही गावांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला. परंतु दुसऱ्या बाजूला न्याहळोद, कापडणे, तापी आदी परिसरांत दुष्काळी स्थिती आहे. या गावांमधील शेतकऱ्यांनी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी अलीकडेच जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

शिंदखेडा तालुक्‍यातही तापीकाठ वगळता इतर भागांत समाधानकारक स्थिती नाही. उडीद, मुगाचे क्षेत्र रिकामे होत आले आहे. काही ठिकाणी उडदाची काढणी सुरू असून, तीदेखील या आठवड्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होईल. हे सर्व चित्र लक्षात घेता रब्बीचे नियोजन करण्यात येत आहे.

पाऊस आला तर ज्वारीचे क्षेत्र हमखास वाढेल, त्यादृष्टीने बियाण्याची जादा मागणी करण्याचे नियोजनही आहे. जिल्ह्यात शिरपूर तालुक्‍यासह तापीकाठावरील गावांमध्ये रब्बी हंगाम बऱ्यापैकी राहू शकतो. शिरपुरातील सातपुडा पर्वतालगत सिंचनासाठी कूपनलिका व विहिरींना बऱ्यापैकी पाणी उपलब्ध होऊ शकेल. परंतु शिंदखेडा तालुक्‍याचा पूर्व-पश्‍चिम भाग, धुळे तालुक्‍याचा पश्‍चिम व पूर्व भाग या भागांत रब्बीची पेरणी अपेक्षित प्रमाणात होणार नाही, अशी माहिती मिळाली.

हंगामासाठी खतांची गरजही असणार आहे. त्यात सर्वाधिक मागणी युरियाला असू शकते. एकूण दीड लाख मेट्रिक टन खतांची गरज भासू शकते. त्यात युरियाची ६० हजार, पोटॅशची २० हजार, सिंगल सुपर फॉस्फेटची २५ हजार, डीएपीची १० हजार टन गरज भासू शकते. यादृष्टीने मागणी नोंदविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

महाबीजसह खाजगी बियाणे उत्पादक संस्थांकडे बियाणे मागणीसंबंधीची कार्यवाही धुळे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने केली आहे. त्यात गव्हाचे २० हजार, ज्वारीचे दोन हजार, हरभऱ्याचे १२ हजार, मक्‍याचे पाच हजार क्विंटल बियाणे आवश्‍यक असणार आहेत, असे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com