हवाई हल्ले यशस्वी; हवाई दलाकडून पुरावे सादर

हवाई हल्ले यशस्वी; हवाई दलाकडून पुरावे सादर
हवाई हल्ले यशस्वी; हवाई दलाकडून पुरावे सादर

नवी दिल्ली : बालाकोटमध्ये दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर केलेल्या हल्ल्याचे पुरावे हवाई दलाने बुधवारी (ता.६) केंद्र सरकारकडे सुपूर्त केले. या वेळी वापरण्यात आलेल्या ८० टक्के बॉम्बनी अचूक लक्ष्यभेद केल्याचे हवाईदलाने आपल्या अहवालात म्हटले आहे. भारताने केलेल्या कारवाईनंतर बालाकोटमधील तळ जसेच्या तसे असल्याची चार मार्च रोजी काढलेली उपग्रह छायाचित्रे काही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी प्रसिद्ध केली होती. परदेशी खासगी उपग्रहांच्या साह्याने काढलेल्या छायाचित्रांच्या आधारे हा दावा करण्यात आला होता. त्यानंतर काही वेळातच हवाई दलाने जैशे महंमदच्या अड्ड्यांवरील हल्ल्याचा उपग्रह छायाचित्रांसह अहवाल सरकारला सादर केला. या अहवालात १२ छायाचित्रे असल्याचे सांगितले जाते. काही प्रसारमध्यमांनी त्या अहवालातील छायाचित्रेही प्रसिद्ध केली. हवाई हल्ल्यांत दहशतवाद्यांच्या तळाचे प्रचंड नुकसान झाल्याचे छायाचित्रांमधून स्पष्ट होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. जैशे महंमदची प्रशिक्षण केंद्रे उद्‌वस्त झाल्याचे हवाई दलाने म्हटले आहे. या प्रशिक्षण केंद्रांच्या इमारतीवरच क्षेपणास्त्रे डागली आहेत. ज्या इमारतींवर हल्ले झाले तेथे काळ्या रंगाची चार छिद्रे दिसत असल्याचे अहवालात म्हटल्याचे समजते. भारतीय हवाई दलाने २६ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानातील बालकोटमध्ये केलेल्या हल्ल्यांत वापरलेल्या ८० टक्के बॉम्बनी अचूक लक्ष्यभेद केला, असे हवाई दलाने आपल्या अहवालात म्हटले आहे. या बॉम्ब हल्ल्यामध्ये झाडे आणि जंगलाचा भाग वगळता फार काही नुकसान झाले नाही असा पाकिस्तानचा दावा आहे. जर नुकसान झाले नाही मग पाकिस्तानी फायटर विमानांनी भारतीय हद्दीत घुसून प्रतिहल्ल्याचा प्रयत्न का केला ? असा प्रश्न हवाई दल प्रमुखांनी काल विचारला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हवाईदलाच्या मिराज २००० विमानांतून इस्रायली बनावटीचे स्पाइस २००० बॉम्ब टाकण्यात आले. हे बॉम्ब टार्गेट असलेल्या इमारतीचे छप्पर तोडून आत पडले आणि आतमध्ये त्याचा स्फोट झाला. त्यामुळे जे काही नुकसान झाले ते आतमध्ये झाले आहे असे सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com