पवार साहेबांना होणाऱ्या त्रासाच्या उद्विग्नतेतून राजीनामा : अजित पवार

अजित पवार
अजित पवार

मुंबई  : राज्य बँक प्रकरणात शरद पवार यांचा काडीचाही संबंध नाही. तरीही त्यांच्यावर ईडीने गुन्हे दाखल केल्याच्या बातम्या आल्या. साहेबांमुळे मी उपमुख्यमंत्रीपदापर्यंत पोचलो, आपल्यामुळे त्यांचे नाव येते हे पाहून मी व्यथित झालो, या सर्व उद्विग्नतेतून मी साहेबांना न सांगता सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (ता. २८) स्पष्ट केले. या वेळी अजित पवार कमालीचे भावूक झाले होते, त्यांना अश्रूही अनावर झाल्याचे दिसून आले. 

शुक्रवारी (ता.२७) आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर अजित पवार यांनी शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पत्रकार परिषदेत राजीनाम्यामागची सविस्तर भूमिका स्पष्ट केली. पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील, जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते. 

राजीनाम्यामागची कारणमीमांसा करताना अजित पवार म्हणाले, ‘‘आम्ही सर्वजण महाराष्ट्र राज्य बँकेत संचालक म्हणून कार्यरत होतो. आमचे संचालक मंडळ बिनविरोध निवडून आले होते. सर्वच पक्षाचे प्रतिनिधी, सहकारी त्या मंडळात होते. त्या संचालक मंडळावर कारवाई करण्यात आली. तो त्यावेळचा निर्णय होता. त्याची चौकशी सुरू आहे. यासंदर्भात सहकार मंत्र्यांनी बँकेत १ हजार ८८ कोटी रुपयांची अनियमितता झाली, अशी माहिती विधिमंडळात दिली. त्याचीही कागदपत्रे माझ्याकडे आहेत. असे असतानाही एका जनहित याचिकेतून बँकेत २५ हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप झाला. त्या बँकेत साडेबारा हजार कोटींच्या ठेवी आहेत. अशा बँकेत २५ हजार कोटींचा भ्रष्टाचार कसा होऊ शकतो, असा सवालही त्यांनी केला. सध्या राज्य बँक नफ्यात आहे, घोटाळा झाल्यावर बँकेला कधी नफा होतो का? आमच्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत.’’ चौकशी होत असते, पण हे २०११ चे प्रकरण आणि ते आता निवडणुकीच्याच तोंडावर कसे पुढे आले? असे सवालही त्यांनी केले. 

‘‘गेली ३० वर्षे मी राजकारणात आहे. अडचणीच्या काळात साखर कारखाने, सूतगिरण्या सुरू ठेवण्यासाठी त्यांना चाकोरीबाहेर जाऊन मदत करावी लागते. तेच आम्ही केले. तसेच जे कर्ज आम्ही दिले ते फेडलेले आहे. सध्या भाजप सरकारनेही गेल्या काही दिवसांत चार कारखान्यांना मदत केली, खरे तर त्यांना कोणतीही मदत करता येत नव्हती. या कारखान्यांना ही मदत करण्यात आली, तो सरकारचा अधिकार आहे. राज्य सरकारने चाकोरीबाहेर जाऊन यांना मदत केली. अर्थसंकल्पातून याची तरतूद केली. अशाप्रकारे कारखान्यांना मदत करावी लागते,’’ अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली.

‘‘याप्रकरणात ईडीने शरद पवार यांचे नाव अशासाठी दिले की अजित पवार संचालक म्हणून कार्यरत होते. माझे आणि शरद पवार यांचे नाते असल्याने ईडीने त्यांचे नाव या प्रकरणात आणले. या सगळ्यामुळे मी खूप अस्वस्थ झालो. पवारांवर गुन्हा दाखल केल्याने मी व्यथित झालो म्हणूनच राजीनामा दिला. त्याचबरोबर यात माझे नाव नसते तर छातीठोकपणे सांगतो, हे प्रकरणच पुढे आले नसते,’’ असा दावाही अजित पवार यांनी केला.

‘नेते, कार्यकर्त्यांची माफी मागतो’ माझ्या सदसद्विवेक बुद्धीला स्मरून राजीनामा दिला. कोणाशाही संपर्क केला नाही, त्यामुळे आमचे नेते, कार्यकर्ते, हितचिंतक असतील, या सर्वांना वेदना झाल्या. त्यांना मी न सांगता हा निर्णय घेतला, त्याबद्दल मी माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. मी शक्यतो सर्व गोष्टी पवार साहेबांना सांगत असतो. मात्र, त्यांना या वयात त्रास झाल्याने मी कुणालाही न सांगता राजीनाम्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मी माझा फोन बंद करून ठेवला आणि मुंबईतच नातेवाइकांकडे गेलो, असे अजित पवार म्हणाले. 

चिंता करण्याचे कारण नाही : शरद पवार राजीनाम्यानंतर 'नॉट रिचेबल' राहिलेले अजित पवार अखेर काल दुपारी एकच्या सुमाराला मुंबईत शरद पवार यांना त्यांच्या निवासस्थानी भेटले. या वेळी खासदार सुप्रिया सुळे, अजितदादांचे चिरंजीव पार्थ व मोठे बंधू श्रीनिवास पवार हेही उपस्थित होते. या सर्वांमध्ये सुमारे तास दीडतास चर्चा झाली. मात्र, या चर्चेत नेमके काय झाले, हे सांगण्यास दोघांनीही नकार दिला. त्यानंतर शरद पवार पत्रकारांना सामोरे गेले. ते म्हणाले, की अजित पवार हे स्पष्ट बोलणारे नेते आहेत. ते कधी हातचे राखून बोलत नाहीत. त्यामुळे काय झाले? कसे झाले? त्यांच्या मनात काय आहे? हे सगळे तुम्ही त्यांच्याच तोंडून ऐका,'' असे सांगत 'चिंता करण्याचे कारण नाही,' असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com