अकोला, बुलडाण्यात प्रचार फोडणार घाम

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अकोला : लोकसभा निवडणुकीसाठी वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच १८ एप्रिलला मतदान होत आहे. यासाठी मंगळवारपर्यंत (ता. २६) उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे. या वेळी सर्वांनाच लोकसभा निवडणुकीचा प्रचार करताना घाम फुटेल एवढे नक्की.

याचे एक कारण वाढते तापमान आणि दुसरे म्हणजे अंतर्गत गटतटांची मनधरणी करणे हे होय! अकोल्यात २०१४ मधील लोकसभा निवडणुकीसारखीच लढत पुन्हा होऊ घातली आहे. प्रमुख उमेदवार संजय धोत्रे (भाजप) आणि हिदायत पटेल (काँग्रेस) हे गेल्या वेळी एकमेकांसमोर उभे ठाकले होते. परिस्थितीत या वेळीदेखील फारसा फरक पडण्यासारखे चित्र सध्या नाही.

धोत्रे यांच्यासाठी परिस्थिती तितकी कठीण नाही. काँग्रेसने पटेल यांना उमेदवारी दिल्याने मत विभाजनाचा लाभ धोत्रे उचण्याची शक्यता आहे. त्यांना भाजपमधील पालकमंत्र्यांचा गट तसेच शिवसेना मनापासून कितपत मदत करते यावर बरेच अवलंबून आहे. येथील पालकमंत्री डॉ. रणजित पाटील व खासदार धोत्रे गटातील धुसफूस आजवर अनेक वेळा उघड झाली.

जिल्ह्यात पालकमंत्र्यांना मानणारा एक मोठा गट भाजपमध्ये आहे. हा गट आपल्यासाठी कामाला लावण्यास धोत्रे यांना कसरत करावी लागेल. उमेदवारी अर्ज दाखल करेपर्यंत भाजपमधील हा दुसरा गट कुठेही सक्रिय दिसलेला नाही. काँग्रेसचीही अशीच स्थिती आहे. नवीन चेहऱ्याला संधी मिळेल, अशी अपेक्षा अनेकांना लागून होती; पण काँग्रेसने कुठलेही धाडस केलेले नाही. आता उमेदवारी तर दिली; परंतु येत्या काळात निवडणुकीचा प्रचार असेल किंवा मतदान असेल, यासाठी काँग्रेसमधील दुखावलेले तसेच राष्ट्रवादी काँग्रेसची फळी कितपत मदतीला येते निकालानंतरच स्पष्ट होईल. या ठिकाणी आंबेडकर यांचीही भूमिका महत्त्वाची आहे. राज्यभर गाजावाजा झालेली त्यांची बहुजन वंचित आघाडी काही चमत्कार घडवेल काय, हे निकालापर्यंत गुलदस्त्यात राहणार आहे. 

बुलडाण्यात शिवसेनेचे प्रतापराव जाधव व राष्ट्रवादीचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यात २००९ मधील निवडणुकीसारखी लढत आहे. तेव्हा शिंगणे यांचा निसटता पराभव झाला होता. परंतु दरम्यानच्या काळात परिस्थितीत बदलली आहे. जाधव यांच्याबाबत जिल्ह्यात समाधानकारक अशी परिस्थिती नाही. शिवसेनेचा एक गट नाराज आहे. हा गट डोकेदुखी ठरू शकतो.

शिंगणे यांनाही निवडणुकीत मोठी शक्ती पणाला लावावी लागणार आहे.  त्यांचा दांडगा वैयक्तिक जनसंपर्क ही जमेची बाजू आहे. परंतु विजयासाठी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांची मदत महत्त्वाची ठरणार आहे. सोबत बहुजन वंचित आघाडीचा उमेदवार मतांचे विभाजन कसे करतो यावरही जाधव, शिंगणे यांच्या विजयाचे गणित अवलंबून आहे. अंतर्गत कुरघोडींना लगाम लावताना तसेच गावोगावी प्रचार करताना वाढलेल्या ४० अंश सेल्सिअसपर्यंतच्या तापमानामुळे या उमेदवारांना ‘घाम’ फुटेल हे नक्की.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com