अकोला-खंडवा रेल्वे मार्गातून अकोल्याला ३१ कोटींची रॉयल्टी

अकोला जिल्ह्यातील शेततळी
अकोला जिल्ह्यातील शेततळी

अकोला   ः जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या अकोला-खंडवा रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरण कामासाठी अाजूबाजूच्या भागातून गौणखनिज उपलब्ध करून देण्यात अाले. यातून ३१ कोटी रुपयांचे स्वामित्वधन (रॉयल्टी) जिल्ह्याच्या तिजोरीत जमा झाले अाहे. यासोबतच जलसंधारणाची कामे केल्याने पहिल्याच वर्षात काेट्यवधी लिटर पाणी जमिनीत जिरवता अाले. काम पूर्ण होईपर्यंत अाणखी १५ कोटी रुपये स्वामित्वधनापोटी जिल्‍ह्याला मिळू शकतात, अशी माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी अतुल दौड यांनी दिली.

अकोला ते खंडवा या रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणाचे काम अकोला ते अकोट दरम्यान सुरू अाहे. यासाठी रेल्वे विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे गौणखनिजाबाबत विनंती केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी अास्तीककुमार पांडेय यांनी या लोहमार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामाला जलसंधारणाच्या कामांची सांगड घालत गौणखनिज देण्याचे मान्य करण्याची सूचना केली. यानुसार अकोट तालुक्यात ९ ठिकाणी गौणखनिज काढण्याची परवानगी दिली गेली.

या कामातून रेल्वेला एकीकडे गौणखनिज जवळच उपलब्ध होत होते तर दुसरीकडे दोन ते सहा एकर क्षेत्राची भव्य शेततळी अाकाराला येत होती. एका ठिकाणी खार नाल्याचे पाच किलोमीटरपर्यंत खोलीकरण व रुंदीकरण झाले. जलसंधारणाची सांगड घालून दिलेल्या परवानगी व्यतिरिक्त अकोट तालुक्यातील किनखेड, देवरी व दहिखेळ फुटकळ तसेच अकोला तालुक्यातील शिलोडा, खेकडी, धामना, दहिखेळ फुटकळ, हिंगणा तामसवाडी, कासली खुर्द या ठिकाणांहून सुद्धा गौणखनिज उत्खननास परवानगी देण्यात अाली होती.

त्यामुळे रेल्वेच्या संपूर्ण कामामध्ये ऑगस्ट २०१७ ते ऑगस्ट २०१८ या एका वर्षात जिल्ह्याला ३१ कोटी रुपये स्वामित्वधना पोटी मिळाले. सद्यस्थितीत हे काम प्रगतिपथावर असल्याने अजूनही जिल्ह्याला किमान १५ कोटी रुपये स्वामित्वधन मिळू शकते, असेही श्री. दौड म्हणाले.

या ठिकाणी तयार झाले शेततळे  : कालवाडी - ६ एकर, वणी वारुळा - २.५ एकर, बळेगाव - २.५ एकर, बळेगाव - २ एकर, तरोडा -४ एकर, करोडी -४ एकर, दनोरी - ४ एकर, देवरी - ३ एकर, खार नाला खोलीकरण व रुंदीकरण - ५ किलोमीटर.   हे झाले फायदे...

  • मोफत शेततळे, खोदतळे, गावतलाव खोलीकरण व नाला खोलीकरण झाल्यामुळे जलसंधारणाच्या कामांकरिता लागणारा खर्च वाचला.    
  • जलसंधारणाची कामे झालेल्या आजूबाजूच्या परिसरातील भूजल पातळी वाढीला मदत.
  • लोहमार्गाच्या कामाकरिता गौणखनिज लगतच्या क्षेत्रात उपलब्ध झाले.
  • गौणखनिजाचे स्वामीत्वधनसुद्धा शासनास प्राप्त झाले.
  • प्रामुख्याने खारपाण पट्ट्यात ही कामे झाली आहेत. यामुळे पाणी साठवण्यास मोठी मदत झाली.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com