अकोला, बुलडाण्यातील उमेदवार कोट्यधीश

अकोला, बुलडाण्यातील उमेदवार कोट्यधीश
अकोला, बुलडाण्यातील उमेदवार कोट्यधीश

अकाेला : विकासाच्या बाबतीत कमालीचा मागासलेपणा असलेल्या अकोला, बुलडाणा जिल्ह्यात लोकप्रतिनिधी मात्र आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. यात सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही आघाडीवर आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यात उमेदवारांनी आपली संपत्ती उघड केली आहे. यातून त्यांची श्रीमंती समोर आली. सामान्य जनतेत हा चर्चेचा विषय झाला आहे.

अकोला लोकसभा मतदार संघातील उमेदवार विद्यमान खासदार संजय धोत्रे हे सुमारे सहा कोटी ९२ लाखांच्या संपत्तीचे मालक आहेत. बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार ॲड. प्रकाश आंबेडकर हे पाच कोटींचे धनी आहेत. येथील तिसरे उमेदवार काँग्रेसचे हिदायत पटेल हे या दोघांच्या तुलनेने ‘गरीब’ आहेत. पटेल यांच्या कुटुंबाकडे एक कोटी ८९ लाखांची संपत्ती आहे.

सन २०१४ च्या निवडणुकीत संजय धाेत्रे यांच्याकडे चार कोटी ८५ लाखांची संपत्ती होती. त्यात पाच वर्षात दोन कोटींपेक्षा अधिक वाढ झाली. आंबेडकर यांची संपत्ती एक कोटी ४४ लाखांनी, तर पटेल यांची संपत्ती ६३ लाखांची वाढली आहे.

बुलडाण्यात जाधव, शिंगणे करोडपती

बुलडाणा लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार आणि यावेळचे शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या कुटुंबाची संपत्ती ११ कोटी २६ लाख आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार डाॅ.राजेंद्र शिंगणे यांची संपत्ती साडे नऊ कोटींपेक्षा जास्त आहे. दोघांनीही अर्जांसोबत आपल्याकडील रोख रक्कम, बँकेच्या ठेवी, शेअर्स, जडजवाहीर, शेती, प्लॉट, फ्लॅट यांच्या विवरणासह कर्जाची माहिती दिली आहे.

शेतीच्या बाबतीत डॉ. शिंगणे हे जाधव यांच्यापेक्षा आघाडीवर आहेत. त्यांच्याकडे येळगाव, वाघजाळ, बाळसमुद्र, शेंदूर्जन याठिकाणी शेती आहे. जाधव यांच्याकडे मेहकर, लोणार, खामगाव, मादणी, अंजनी बुद्रूक, शेगाव, म्हैसपूर (अकोला) याठिकाणी शेतजमिनी आहेत. एकूणच अकोला आणि बुलडाणा या दोन्ही जिल्ह्यातील लाखों लोकसंख्या गोरगरीब असली, तरी त्यांचे उमेदवार कोट्याधीश आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com