माउलींच्या समाधी सोहळ्याने गहिवरली अलंकापुरी...

माउलींच्या समाधी सोहळ्याने गहिवरली अलंकापुरी...
माउलींच्या समाधी सोहळ्याने गहिवरली अलंकापुरी...

आळंदी, जि. पुणे ः समाधी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट...वीणा मंडपातील समाधी प्रसंगाचे कीर्तन...टाळ मृदंगाचा टिपेला पोचलेला गजर...माउलीऽ माउलीऽऽचा जयघोष...अशा वातावरणात बुधवारी (ता.५) दुपारी सव्वाबारा वाजता माउलींच्या संजीवन समाधीवर हजारो वैष्णवांनी तुळशीच्या मंजिरी आणि फुलांची उधळण करत ७२३ वा संजीवन समाधी दिन साजरा केला. माउलींच्या समाधी प्रसंगाच्या ७२३ वर्षांपूर्वीच्या आठवणीचे वर्णन कीर्तनातून ऐकताना उपस्थित वारकऱ्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. या भावनिक सोहळ्यामुळे अवघी अलंकापुरी गहिवरली...

समाधी घेतली आळंदी भोवती शोभे सिद्ध मांदी सन्मुख पुढे अजानवृक्ष देव येती तेथे साक्ष कीर्तन गजरी नाम घोष चराचरी ऐसा सोहळा आनंद, हीच भावना अवघ्या आळंदीत होती. निमित्त होते माउलींच्या संजीवन समाधी दिनाचे. बुधवारी कार्तिक वद्य त्रयोदशी असल्याने शहरात सर्वत्र माउलींच्या समाधी प्रसंगाचे कीर्तन सुरू होते. देऊळवाड्यात वारकऱ्यांची गर्दी होती. महाद्वारात दहाच्या सुमारास हैबतबाबांच्या वतीने गणेशानंद पुणेकर यांचे कीर्तन, तर साडेदहा वाजता वीणा मंडपात नामदेव महाराजांचे वंशज केशव महाराज नामदास यांचे माउलींच्या समाधी प्रसंगाचे कीर्तन सुरू झाले. समाधीप्रसंग जवळ आल्याने पावणेबाराला दर्शनबारी बंद करण्यात आली. पुजारी व स्वकामच्या स्वयंसेवकांनी मुख्य समाधी गाभारा स्वच्छ करून घेतला. राजाभाऊ चौधरी व मुरलीधर प्रसादे यांच्यासह ब्रह्मवृंदांनी मंत्रघोषात समाधी सजविण्यास सुरवात केली. संपूर्ण देऊळवाडा भरून गेला होता. दरम्यान, वीणा मंडपातील केशव महाराज नामदास यांनी कीर्तनात ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले। उद्धाराया आले दिनजन।। असे म्हणत समाधिप्रसंगाचे वर्णन करण्यास सुरवात केली. मंदिरात कीर्तन सुरू असताना वीणा मंडपातील नामदास महाराजांनी संत नामदेव महाराजांच्या पादुका हातात घेऊन बारा वाजता समाधीजवळ स्थानापन्न केल्या. या वेळी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ऍड. विकास ढगे यांनी पादुकांची विधिवत पूजा केली. या वेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, विश्वस्त अभय टिळक, योगेश देसाई, अजित कुलकर्णी, बाळासाहेब आरफळकर, राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, रामभाऊ चोपदार, पिंपरीच्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त चंद्रकांत अलसटवार, पोलिस निरीक्षक रवींद्र चौधर, फौजदार दत्तात्रेय शिंदे, नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर, यात्रा समितीचे सभापती पारूबाई तापकीर, राम गावडे उपस्थित होते. दरम्यानच्या काळात वीणा मंडपातील नामदास महाराजांनी कीर्तनातून नामा म्हणे संत झाले कासावीस। लाविती पदर डोळियांसी।। असे सांगताच वारकऱ्यांना अश्रू दाटून आले. समाधी प्रसंगाच्या आठवणीने डोळ्यांच्या कडा पाणावल्या. नामदेव महाराजांच्या पादुका पूजनानंतर दुपारी सव्वाबारा वाजता भाविकांनी घंटानाद करून हातातील तुळशीच्या मंजिरी आणि फुलांची मुक्त उधळण करीत पुंडलिकाऽ वरदेऽऽ हरिऽऽऽ विठ्ठल ऽऽऽऽ आणि माउलीनामाचा धावा केला. त्यानंतर माउलींची आरती झाली. महाराजांच्या पादुका डोक्‍यावर घेत नामदास महाराज यांनी मंदिर प्रदक्षिणा केली. त्यानंतर वारकऱ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. आळंदी-देहू परिसर समितीकडून सोहळा साजरा देवस्थानच्या विश्वस्तांच्या हस्ते नामदास कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला. आळंदी-देहू परिसर विकास समितीच्या वतीने इंद्रायणीतीरी समाधी दिन सोहळा साजरा करण्यात आला. शहरात ठिकठिकाणी फडांवरही संजीवन समाधी दिनाच्या निमित्त कीर्तनसेवा झाली. समाधी दिन स्मरण सोहळ्यानंतर वारकऱ्यांना समाधी दर्शनासाठी सोडण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com