माउलींच्या समाधीदिनी अलंकापुरी गहिवरली

माउलींच्या समाधीदिनी अलंकापुरी गहिवरली
माउलींच्या समाधीदिनी अलंकापुरी गहिवरली

आळंदी, जि. पुणे  : समाधी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट, वीणा मंडपातील समाधी प्रसंगाचे रंगलेले कीर्तन, टाळ मृदंगाचा टिपेला पोचलेला गजर अन्‌ माऊली नामाचा अखंड जयघोष, अशा भारलेल्या वातावरणात सोमवारी (ता.२५) दुपारी सव्वाबारा वाजता माउलींच्या समाधीवर हजारो वैष्णवांनी तुळशीच्या मंजिऱ्या आणि फुलांची मुक्त उधळण करीत माउलींचा ७२४ वा संजीवन समाधी दिन साजरा केला. संत नामदेवांचे अठराव्या वंशजांच्या सुश्राव्य वाणीतून माउलींच्या समाधी प्रसंगाच्या आठवणीचे वर्णन ऐकताना अवघी अलंकापुरी गहिवरली.

नामा म्हणे संत कासावीस सारे ।  लाविती पदर डोळियांसी ।। 

हीच भावना अवघ्या आळंदीत होती. निमित्त होते माउलींच्या संजीवन समाधी दिनाचे. कार्तिक वद्य त्रयोदशी असल्याने शहरात सकाळपासूनच सगळीकडे फडांमधून माउलींच्या समाधी प्रसंगाचे कीर्तन चालू होते. दहाच्या सुमारास महाद्वारात हैबतबाबांच्या वतीने संदीप पळसे यांचे कीर्तन तर साडेदहा वाजता वीणा मंडपात नामदेव महाराजांचे वंशज भावार्थ महाराज नामदास यांचे माउलींच्या समाधी प्रसंगाचे कीर्तन सुरू झाले. 

दरम्यान, वीणा मंडपातील भावार्थ महाराज नामदास यांनी कीर्तनात ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धाराया आले दिनजन, असे म्हणत समाधीप्रसंगाचे वर्णन करण्यास सुरुवात केली. मंदिरात कीर्तन चालू असतानाच समाधीची सजावट चालू असतानाच वीणामंडपातील नामदास महाराजांनी संत नामदेव महाराजांच्या पादुका हातात घेऊन समाधीजवळ नेऊन बारा वाजता स्थानापन्न केल्या. 

दरम्यानच्या काळात वीणा मंडपातील नामदास महाराजांनी आपल्या कीर्तनातून ‘‘फेडिली डोळ्यांची अत्यंत पारणी, आता ऐसे कोणी सखे नाही’’, असे कीर्तनात सांगताच उपस्थित भाविकांचे अश्रू दाटून आले. माउलींचा समाधीप्रसंग जवळ येऊन ठेपला होता.

नामदेव महाराजांच्या पादुकांचे पूजनानंतर दुपारी सव्वाबारा वाजता भाविकांनी घंटानाद करून हातातील तुळशीच्या मंजिऱ्या आणि फुलांची मुक्त उधळण करत ‘‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’’ आणि माउलीनामाचा धावा केला. समाधीदिन स्मरण सोहळ्यानंतर भाविकांसाठी समाधी दर्शन सुरू करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com