शेतकरी सन्मान निधी योजनेच्या दोन वर्षपूर्तीच्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या
ताज्या घडामोडी
गहू संशोधनात सर्वांचाच वाटा ः डाॅ. ढवण
येथील गहू संशोधन केंद्रास डॉ. बोरलॉग व डॉ. स्वामिनाथन या दोन्ही जागतिक कीर्तीच्या शास्त्रज्ञांनी येथे भेट देऊन येथील केंद्राचे काम अनुभवलेले आहे.
नाशिक : येथील गहू संशोधन केंद्रास डॉ. बोरलॉग व डॉ. स्वामिनाथन या दोन्ही जागतिक कीर्तीच्या शास्त्रज्ञांनी येथे भेट देऊन येथील केंद्राचे काम अनुभवलेले आहे. त्यामुळे हे केंद्र गहू संशोधन संबंधी महत्त्वपूर्ण आहे. शेतकऱ्यांसाठी उपयुक्त गहू वाणांच्या संदर्भात झालेल्या संशोधनात वरिष्ठ शास्त्रज्ञांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांचाच मोलाचा वाटा आहे, असे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक ढवण म्हणाले.
निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्राला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी नुकतीच भेट दिली. त्या वेळी बोलताना त्यांनी हरितक्रांतीचे जनक व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामिनाथन आणि नोबेल पारितोषिक विजेते कृषी शास्त्रज्ञ डॉ. नॉर्मन बोरलॉग यांच्याबरोबर विद्यार्थिदशेत असताना झालेल्या भेटींना उजाळा दिला.
भेटीदरम्यान झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. सुरेश दोडके यांनी कुलगुरूंचे स्वागत करून प्रास्ताविक केले. सन १९३२ पासून या संशोधन केंद्रावर झालेल्या संशोधन कार्याचा लेखाजोखा मांडला. त्यांनी संशोधन केंद्र आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनविण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांविषयी माहिती दिली.
संशोधन केंद्रावरील शास्त्रज्ञ डॉ. बबनराव इल्हे, डॉ. उदय काचोळे, डॉ. भानुदास गमे, डॉ. योगेश पाटील, डॉ. संजीवकुमार वाडीले, श्री. भालचंद्र म्हस्के यांनी कुलगुरूंना विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या गहू पिकावरील प्रयोगांची माहिती दिली.
प्रक्षेत्र भेटीवेळी कुलगुरूंनी गव्हावरील प्रयोगांचे तसेच गहू व कांदा बीजोत्पादन क्षेत्राची पाहणी करून महत्त्वाच्या सूचना केल्या. त्यानंतर केंद्रावरील जिवाणू खते आणि जैविक कीटकनाशके निर्मिती प्रयोगशाळा तसेच बियाणे विक्री केंद्रास त्यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रीतम शिंदे यांनी, तर डॉ. योगेश पाटील यांच्या आभार मानले.
- 1 of 1055
- ››