राज्यातील दूध संघ अनुदान योजनेतून बाहेर

सरकारने आणलेली अनुदान योजना क्रांतिकारी स्वरूपाची आहे. योजनेला आमचा अजिबात विरोध नाही. मात्र, शेतकऱ्यांची देणी आम्हाला चुकवावीच लागतात. त्यामुळे ३० ऑक्टोबरपर्यंतचे अनुदान मिळाले तर एक नोव्हेंबरपासूनची बिले आम्ही २५ रुपये दरानेच अदा करू. मात्र, थकीत अनुदान दिले नाही तर एक नोव्हेंबरपासून २० रुपये दराने बिले काढली जातील. पाच रुपये अनुदान आल्यानंतर वाढीव दर दिले जातील. - दशरथ माने, अध्यक्ष, सोनाई दूध उद्योग
दूध
दूध

पुणे : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये वाढीव अनुदान देण्याच्या योजनेतून खासगी व सहकारी संघांनी एक डिसेंबरपासून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. थकीत अनुदान मिळेपर्यंत २० रुपये प्रतिलिटरनेच दूध खरेदी होत राहील, असेही दूध उद्योजकांनी घोषित केले आहे.  राज्यातील संघ व दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून सर्वात जास्त दूध खरेदी करणाऱ्या सोनाई दूध उद्योग समूहाचे अध्यक्ष दशरथ माने म्हणाले की, आम्ही राजकारणी नसून उद्योजक आहोत. आम्हाला केवळ शेतकरी सांभाळायचा आहे. त्यामुळे राज्य शासनाने मंजूर केलेले अनुदान तातडीने अदा केले तरच शेतकऱ्यांपर्यंत जाणार आहे. अनुदान कशासाठी अडविले हे आम्हाला माहिती नाही. मात्र त्यामुळे शेतकऱ्यांना चारा, पाणी, गोळीपेंड, उसाचे वाढे यासाठी होणाऱ्या खर्चाचा ताळमेळ लावता येत नाही. शेतकऱ्यांना आणखी संकटात टाकू नये. ‘‘अनुदान योजना सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी दाखविलेले धाडस कौतुकास्पद आहे. त्यामुळेच एक ऑगस्ट ते ३० ऑक्टोबर असे ९० दिवस शेतकऱ्यांना अनुदान जाहीर झाले. मात्र, यातील केवळ ४० दिवसांची अनुदान मिळाले असून ५० दिवसांचे अनुदान थकल्याने संपूर्ण शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे,’’ असेही श्री. माने यांनी स्पष्ट केले.  योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात पुन्हा एक नोव्हेंबर ते ३० जानेवारी या दरम्यान पाच रुपये अनुदान जाहीर झाले आहे. सरकारची ही भूमिका दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे. मात्र, थकीत अनुदान दिल्याशिवाय दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी दुग्ध उद्योगाला करता येत नाही, असे उद्योग सूत्रांचे म्हणणे आहे.  चितळे डेअरीचे संचालक श्रीपाद चितळे म्हणाले, की शेतकऱ्यांना प्रतिलिटर २५ रुपये दूधदर देण्यासाठी शासनाच्या पाच रुपये अनुदान योजनेत आम्ही सर्व खासगी व सहकारी दूध उद्योग सहभागी झालो. मात्र, अनुदान वेळेत न दिल्याने सर्व उद्योग संकटात आला. त्यामुळे तूर्त आम्ही २० रुपये लिटर दर देण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या बैठकीत घेतला आहे. पाच रुपये वाढीव दर हा अनुदान मिळाल्यानंतर दिला जाईल. एक डिसेंबरपासून मात्र अनुदानाबाबत शासनाने त्यांच्याच स्तरावर व्यवस्था करून घ्यावी. आम्ही फक्त शेतकऱ्यांचा मात्र डाटा पुरविणार आहोत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com