भाजीपाला शेतीतून पेलल्या साऱ्या जबाबदाऱ्या..

Nandutai harvest the brinjal crop by estimating the market
Nandutai harvest the brinjal crop by estimating the market

लग्नानंतर अवघ्या तीन वर्षातच पतीच्या निधनामुळे नंदाताईंसमोर दोन चिमुकल्या मुलींसोबत आयुष्य जगण्याचे आव्हान होते. आधी एकत्रित कुटुंबात व सासरकडून मिळालेल्या पाच एकर शेतीमध्ये कष्ट करत त्यांनी हे आव्हान पेलले. पारंपरिक पिकांऐवजी भाजीपाला लागवडीतून आर्थिक भरभराट साधली. आज त्यांना बाजारपेठेत ‘कारलीवाल्या नंदाताई’ म्हणून ओळख झाली आहे. वंडली (जि. चंद्रपूर) येथील शंकर पिंपळशेंडे यांच्याशी नंदाताईंचे १९९३ मध्ये लग्न झाले. या एकत्रित कुटुंबात तब्बल १२ जणांचा समावेश होता. शेतीही एकत्रित होती. पती शंकर हे कुटुंबाचा दूध व्यवसाय सांभाळत. मात्र, डिसेंबर १९९७ मध्ये अचानक त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे नंदाताईंवर जणू आभाळच कोसळले. त्या वेळी त्यांच्या दोन्ही मुली अनुक्रमे दोन वर्षे व सहा महिने अशा होत्या. थोडे दुःख कमी झाल्यानंतर दुसऱ्या लग्नासाठी त्यांना आग्रह झाला. मात्र, त्यांनी आपल्या दोन चिमुकल्या मुलींकडे पाहून निर्धाराने नाकारला. पतीच्या मृत्यूनंतर १२ वर्ष सासरी एकत्रित कुटुंबात राहिल्या. मात्र, एकत्रित कुटुंबापासून विभक्‍त होण्याचा निर्णय घेतला. सुरवातीच्या नकारानंतर सासऱ्यांसह सर्वांनी स्वीकारला. नंदाताईंना राहण्यासाठी एक गोठा आणि पाच एकर शेती नावे करून दिली. तब्बल तीन वर्ष त्यांनी मुलींसह गोठ्यातच घालविली. परिस्थितीशी केले दोन हात

  • आपत्ती आल्या की मनुष्य अधिक काटक होत जातो. पाच एकर शेतीमध्ये पहिली पाच- सहा वर्ष कापूस लागवड करत.  
  • सिंचन सुविधेअभावी कोरडवाहू क्षेत्रातून कापसाचे सरासरी दहा क्‍विंटलपर्यंत उत्पादन मिळे. सिंचनासाठी त्यांनी बोअरवेल घेतली. त्याला मुबलक पाणी लागले. आता संपूर्ण शिवार ठिबकखाली आणले आहे. सिंचनाची सोय झाल्यावरही कापूस लागवडीवर त्यांचा भर होता. मात्र, २०१७-१८ मध्ये गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे पीक काढून टाकावे लागले.  
  • कापूस शेतीत श्रम आणि उत्पादन खर्च अधिक होतो, हेही त्यांच्या अनुभवावरून कळले होते. कमी कालावधीच्या पिकाच्या लागवडीकडे त्या वळल्या.
  • भाजीपाला विक्रीसाठी १६-१७ कि.मी. पायपीट

  • २०१५-१६ पासून नंदाताईंनी सरासरी दहा गुंठे क्षेत्रावर टोमॅटो, वांगी, चवळी, मेथी, मिरची, वाल शेंग या प्रकारचा विविध प्रकारचा भाजीपाला त्या घेऊ लागल्या. या भाजीपाल्याची विक्री स्वतःच गल्लोगल्ली फिरून करत.  
  • अगदी सात कि.मी. अंतरावर चंद्रपूरमध्ये भाज्यांची विक्री करत फिरत. वाहनाची सोय नसल्याने सकाळी सात वाजता घरातून चालत चंद्रपूरमध्ये पोचत. तिथे गल्लोगल्ली बारापर्यंत भाजीपाला विकायचा आणि त्यानंतर गावात पायीच परतायचे. असा सोळा सतरा कि.मी.चा पायी फेरा होत असे. त्यांचा तब्बल सात वर्षे नित्यक्रम झाला होता.
  • भाजीपाला लागवड क्षेत्रात केली वाढ

  • हळूहळू भाजीपाल्याखालील क्षेत्र वाढवत नेले. आता कारली दोन एकर तर उर्वरित क्षेत्रात कोबी, ब्रोकोली, मिरची, वांगी, टोमॅटो, चवळी, काशी टोमॅटो, पालक, मेथी, कोथींबीर, वाल शेंगा अशा एकूण चार एकरमध्ये भाजीपाला लागवड केली जाते. क्षेत्र वाढल्याने उत्पादन वाढले आहे. आता थेट विक्री शक्‍य होत नाही. मजुरामार्फत तोडणी करून, रोज सकाळी चंद्रपूरच्या बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवतात.
  • कारलीवाल्या नंदाताई

  • कारली लागवड ही दोन एकर क्षेत्रावर असल्याने हंगामामध्ये प्रति दिन सुमारे ४ ते ५ क्विंटल उत्पादन होते.  
  • चंद्रपूरच्या बाजारामध्ये कारल्याची मोठी आवक त्यांची असते. व्यापाऱ्यांसह सर्वांच्या दृष्टीने त्यांची ओळख ‘कारलीवाल्या नंदाताई’ अशी झाली आहे.  
  • कारल्याला सरासरी १८ ते २५ रुपये प्रति किलो असा दर मिळतो. कारल्याच्या व्यवस्थापनावर २ लाख २१ हजार रुपयांचा खर्च झाला. विक्रीतून ४ लाख २० हजार रुपये मिळाले असले तरी खर्च वजा जाता निव्वळ नफा २ लाख रुपये मिळाल्याचे नंदाताई सांगतात.
  • भाजीपाल्याचा ताळेबंद

  • टोमॅटोच्या एकरी व्यवस्थापनावर सरासरी ५० हजार रुपयांचा खर्च होतो. दररोज सरासरी एक क्‍विंटल टोमॅटोची विक्री केली जाते. सद्यस्थितीत टोमॅटोला सरासरी पाच रुपये किलोचा दर मिळतो. तरीसुद्धा रोजच्या रोज ताजा पैसा हाती येत असल्यामुळे पारंपरिक पिकांपेक्षा भाजीपाला पिके माझ्यासाठी फायद्याची ठरत असल्याचे नंदाताई सांगतात.  
  •  वेंडलीवरून भाजीपाल्याची वाहतूक चंद्रपूर बाजारात करतात. त्यामध्ये शेतीमालाच्या प्रमाणात २०० ते ५०० रुपये पर्यंत खर्च होतो. भाजीपाला शेतीमध्ये भाज्यांची चोरी होते. ते टाळण्यासाठी चार एकर संपूर्ण क्षेत्राला तारेचे कुंपण केले आहे. त्यावर सुमारे तीन लाख रुपयांचा खर्च झाला.
  • मुलींना उच्चशिक्षित केले...

  • पती माघारी दोन लहान मुलींची जबाबदारी नंदाताईंनी समर्थपणे पेलली. शेतीतील उत्पन्नावरच दोन्ही मुलींना उच्चशिक्षित केले. त्यातील सुवर्णा ही खासगी महाविद्यालयात शिकविते. तिचे लग्नही शेतीच्या उत्पन्नावरच पार पाडले. दुसरी मुलगी सुरेखा वाणिज्य शाखेत शिकत असून, गावात पार्टटाइम कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणूनही सेवा देते. दोन्ही मुलींना स्वतःच्या पायावर उभे केल्याचे समाधान नंदाताई व्यक्त करतात.
  • अभ्यास दौऱ्याने दिले नव्या गोष्टी करण्याचे बळ

  • शेतीमध्ये कर्तृत्वशीलतेचा आदर्श सांगणाऱ्या नंदाताईंना कृषी विभागानेही बळ दिले. विदेशी भाजीपाला लागवड, शेडनेड, मधुमक्षिका पालन, सीताफळ प्रक्रिया, संत्रा, पेरू लागवड अशा विविध व्यावसायिक शेतीपद्धती पाहण्यासाठी बुलडाणा येथील अभ्यास दौऱ्यावर गावातील पाच महिलांसोबत नंदाताईंनाही पाठवले होते.  
  • अभ्यास दौऱ्यामध्ये अनेक गोष्टी पाहिल्या. त्या आपल्या शेतामध्ये राबवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी चार एकराला ठिबक केले. विदेशी भाज्यांमध्ये ब्रोकोलीची लागवड त्या अर्धा एकर क्षेत्रामध्ये करतात. त्याच्या व्यवस्थापनासाठी सुमारे चार हजार खर्च होतो, तर सरासरी पाच क्विंटल उत्पादन मिळते. ब्रोकोलीला प्रति किलो सरासरी ५० रुपये असा दर मिळतो. भाजीपाला पीकातून आर्थिक सक्षमतेचा पल्ला गाठला आहे. त्यात उपविभागीय कृषी अधिकारी दत्ता काळे, मंडळ कृषी अधिकारी भास्कर गायकवाड, कृषी सहायक जयश्री खिल्लारी यांची अनेक प्रकारे मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले.
  • सर्वांसाठी प्रेरणादायक

  • अवघ्या तीन वर्षानंतर पतीच्या निधनाची आपत्ती कोसळल्यानंतरही आपल्या कष्ट आणि नियोजनातून शेती उत्पादनक्षम केली. दोन्ही मुलींचे शिक्षण, एकीचे लग्न अशा जबाबदाऱ्याही समर्थपणे निभावल्या आहेत. त्यांचा हा कणखर आणि लढवय्या बाणा निश्‍चितच विदर्भातील निराशेच्या गर्तेत असलेल्या अन्य शेतकऱ्यांना बळ देणारा ठरू शकतो.
  • संपर्कःनंदा पिंपळशेंडे, ९७६७३६७७५३, ८६०५५५०९१०

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com