कोल्हापुरात सर्व नद्या पात्राबाहेर; ५२ बंधारे पाण्याखाली

पाऊस
पाऊस

कोल्हापूर: धरणक्षेत्रात पाऊस सुरूच असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत शुक्रवारी (ता.६) दुपारपर्यंत वाढ सुरूच राहिली. राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा बंद झाला आहे. ४ खुल्या दरवाज्यांमधून ७११२, कोयनेचे दरवाजे १० फुटांवरून साडेपाच फुटांवर करण्यात आले आहेत. त्यामधून ४९८०४; तर अलमट्टी धरणामधून १८५००० क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांना दिलासा मिळण्याची शक्यता असल्याची माहिती माहिती पूरनियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस. एम. शिंदे यांनी दिली.  शुक्रवारी सकाळी नऊ वाजता संपलेल्या चोवीस तासांत गगनबावडा तालुक्‍यात सर्वात जास्त १६७.५० मि.मी. पाऊस झाला. पूर्व भाग वगळता जिल्ह्यातील अन्य भागांत पावसाची रिमझिम सुरूच होती. रस्तेही पाण्याखाली जाण्यास सुरवात झाल्याने वाहतूक खोळंबत आहे. शुक्रवारी दुपारपर्यंत विविध बंधाऱ्यांवर पाणी आल्याने ३ राज्यमार्ग व ८ प्रमुख जिल्हा मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. ही माहिती सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने यांनी दिली. चंदगड तालुक्‍यातील कोल्हापूर, परिते, गारगोटी, गडहिंग्लज, कोदाळी, भेडसी ते राज्य हद्दीमध्ये राज्यमार्ग क्रमांक १८९ या मार्गावरील तिलारी घाटामध्ये ३० मीटर लांबीत रस्ता खचल्याने वाहून गेला आहे. गेल्या चार दिवसांपासून धरणक्षेत्रातील जोरदार पावसाने पुन्हा एकदा जिल्ह्याला धडकी भरविली आहे. पूर येऊन गेल्याने कुठेच अडथळा नसल्याने सोडलेले पाणी गतीने नद्यांच्या पात्राबाहेर येत आहे. कृष्णेसह भोगावती पंचगंगा, वारणा, दुधगंगा आदींसह इतर नद्याही पात्राबाहेर पडल्या आहेत. शुक्रवारी दुपारपर्यंत कोल्हापूरच्या पश्‍चिमेकडील भागात पावसाचा जोर कायम होती. राधानगरी धरणक्षेत्रात काहीसा जोर कमी झाल्याने एक स्वयंचलित दरवाजा बंद झाला. ५२ बंधारे पाण्याखाली आहेत. राधानगरी धरणात आजअखेर ८.२७ टीएमसी पाणीसाठा आहे. जंगमहट्टी, घटप्रभा कोदे लघुप्रकल्प, पाटगाव, चिकोत्रा, कासारी व जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. गुरुवारी दुपारी दोन वाजता असणारा ८९,००० ‍क्युसेक पाण्याचा विसर्ग सायंकाळी सहा वाजता ७४,००० ‍क्युसेकवर आणण्यात आला. तो घटवून शुक्रवारी सकाळी सहा वाजता ४०,००० ‍क्युसेकवर आणण्यात आला. यामुळे पुन्हा पाऊस न झाल्यास शनिवारपासून पाणी ओसरण्याची शक्‍यता पाटबंधारे विभागाने व्यक्त केली. धरणक्षेत्रात गेल्या ३ दिवसांत जोरदार पाऊस झाल्याने पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथील पाणीपातळीत गेल्या ३ दिवसांत १३ फुटांनी वाढ झाली. शुक्रवारी ती ३३ फूट इतकी होती. शेतकऱ्यांना धसका शेती सावरत असतानाच आता पुन्हा शेती पाण्याखाली जात आहे. यामुळे नुकसानीची तीव्रता आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. शेतीत पुन्हा पाणी येत असल्याने शेतकामे करणे अशक्‍य बनले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पावसाचा जोर आणखी दोन दिवस राहिल्यास हजारो हेक्‍टर शिवारे पुन्हा एकदा पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त होत आहे. याचा धसका आता शेतकऱ्यांनी घेतला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com