सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षांवर टक्केवारी मागितल्याचा आरोप

नराळे (ता. सांगोला) येथील आरोग्य उपकेंद्राच्या ६५ लाखांच्या वर्कऑर्डरला कार्योत्तर मंजुरी देण्यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी टक्केवारी मागितल्याचा गंभीर आरोप जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसवंर्धन समितीचे सभापती अनिल मोटे यांनी पत्रकार परिषदेत केला.
ZP_Solapur_1.jpg
ZP_Solapur_1.jpg

सोलापूर : नराळे (ता. सांगोला) येथील आरोग्य उपकेंद्राच्या ६५ लाखांच्या वर्कऑर्डरला कार्योत्तर मंजुरी देण्यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी टक्केवारी मागितल्याचा गंभीर आरोप जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसवंर्धन समितीचे सभापती अनिल मोटे यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यावर मोटे यांनी केलेले आरोप खोटे, दिशाभूल करणारे आणि नैराश्यातून केले असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कांबळे यांनी सांगितले. जिल्हा परिषदेतील या दोन पदाधिकाऱ्यांतील वाद चव्हाट्यावर आल्याने राजकीय चर्चा रंगली आहे. श्री. मोटे म्हणाले, ‘‘एकूण तीन उपकेंद्रांच्या बांधकामाची कार्योत्तर मंजुरी होती. त्यापैकी दोन कामांचे ठेकेदार त्यांना भेटल्यानंतर सह्या केल्या. पण माझ्या भागातील कामासाठी ठेकेदार भेटून काम झाले नाही. एका जबाबदार सदस्याने अध्यक्षांची भेट घेतली. त्या वेळी टक्केवारीचा मुद्दा पुढे आला.’’ त्याशिवाय घेरडी ग्रामपंचायतीने व्यापारी गाळे बांधण्यासाठी दाखवलेल्या मिळकत क्रमांक २६ मध्ये एकही इंच जागा नाही. पंधरा दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत घेरडी ग्रामपंचायतीतर्फे बांधण्यात येणाऱ्या व्यापारी गाळ्यास २९ लाख ५५ हजार रुपयांच्या कर्जमंजुरीचा विषय चर्चेसाठी आला होता. त्यावेळी मी स्वत: घेरडीचा रहिवासी आहे, व्यापारी गाळे बांधकामाचा प्रस्ताव परिपूर्ण नसून जागा उपलब्ध नाही, असे सांगितले. तरीही हा विषय येतो आणि त्यावर कार्यवाही होते, याचा अर्थ काय, असाही प्रश्‍न मोटे यांनी उपस्थित केला आहे. 

प्रतिक्रिया... सभापती मोटे यांचे सगळे आरोप खोटे, दिशाभूल करणारे आणि नैराश्यातून केलेले आहेत. सांगोला तालुक्यातील त्यांच्या राजकीय भांडणात त्यांनी मला ओढले आहे. जिल्हा परिषदेसह माझी बदनामी केली आहे. आतापर्यंत मी प्रामाणिकपणे काम केले. कोणाचीही तक्रार नाही. त्यांनी भक्कम पुरावे द्यावेत, मीही दाखवून देतो. - अनिरुद्ध कांबळे, अध्यक्ष, जिल्हा परिषद, सोलापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com