‘एफआरपी’वरील व्याजासाठी कोल्हापुरात ठिय्या

‘एफआरपी’वरील व्याजासाठी कोल्हापुरात ठिय्या
‘एफआरपी’वरील व्याजासाठी कोल्हापुरात ठिय्या

कोल्हापूर : थकीत एफआरपीवरील १५ टक्के व्याज द्यावे, या मागणीसाठी सोमवारी (ता.१६) अंकुश, जय शिवराय किसान संघटनेतर्फे येथील साखर सहसंचालकांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. दुपारी बाराच्या सुमारास या आंदोलनाला सुरुवात झाली. जोपर्यंत व्याज दिले जात नाही, तोपर्यंत कार्यालयातून हटणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला. 

शुगर केन कंट्रोल ऑर्डर १९६६ च्या तरतुदीनुसार मागील हंगामात सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी  ऊस बिले दिली नव्हती. याच कायद्याने मुदतीत बिले न दिल्यास त्यावर १५ टक्के व्याज देणे अनिवार्य आहे. एकाही कारखान्याने शेतकऱ्याला व्याज दिले नाही. त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.

आंदोलकांनी प्रादेशिक साखर सहसंचालक सचिन रावळ यांच्या केबिनबाहेर ठिय्या दिला. घोषणाबाजी केली. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, साखर आयुक्तांनी मागील महिन्यात सर्व साखर कारखान्यांना व्याजाच्या रकमा कळवा, अन्यथा दर पंधरवडा जो एफआरपी रिपोर्ट कारखान्याकडून दिला जातो, त्यातील थकीत रकमेवर सरसकट १५  टक्के प्रमाणे व्याज आकारून त्या रकमेवर नवीन आर.आर.सी केली जाईल,असे नोटीस वजा आदेश दिले होते. 

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी २५ नोव्हेंबरच्या बैठकीत आठ दिवसांत व्याजाच्या रकमा कळवा म्हणून सर्व कारखान्यांना आदेश दिले. त्यानंतर साखर सहसंचालकानी कारखान्यांना पत्रे दिली. मात्र अद्याप त्याचा अहवाल दिला नाही.

बैठकीत ठरल्याप्रमाणे कारखाने वागणार नसतील, तर साखर सह संचालकांनी पंधरवडा अहवालातील थकीत रकमेवर १५ टक्के व्याज आकारणी करून कारखानानिहाय व्याजाची रक्कम व आरआरसी कारवाई प्रस्ताव साखर आयुक्तांना मागील आठवड्यात पाठवावा, असेही ठरले होते. पण साखर सहसंचालक कार्यालयाने ही कारवाई केली नाही. यामुळे आंदोलन करावे लागत आहे. आंदोलनात धनाजी चुडमुंगे, शिवाजी माने, बी. जी. पाटील, आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com