मुंबईवर युतीचेच वर्चस्व; ३० जागांवर यश

मुंबईवर युतीचेच वर्चस्व; ३० जागांवर यश
मुंबईवर युतीचेच वर्चस्व; ३० जागांवर यश

मुंबई ः राज्याच्या उर्वरित भागात शिवसेना-भाजप युतीची पीछेहाट होत असताना मुंबईकरांनी युतीला साथ देत युतीच्या पदरात तब्बल ३० जागा टाकल्या आहेत. आघाडीपेक्षा सहापट जास्त जागा जिंकत युतीने मुंबईवरील वर्चस्व कायम ठेवले आहे. काँग्रेसला चार तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे.

वरळीत शिवसेनेचे उमेदवार आदित्य ठाकरे यांनी निर्विवाद विजय मिळवला असला, तरी मातोश्रीचे अंगण असलेल्या वांद्रे पूर्वमध्ये शिवसेनेचा पराभव झाला आहे. तृप्ती सावंत यांच्या बंडखोरीमुळे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना पराभूत व्हावे लागले. महाडेश्वर यांचा पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप प्रत्येकी तीन जागा जिंकत आघाडीला धोबीपछाड दिला.

विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुतीची संयुक्त प्रचारसभा घेतली होती. या सभेचा युतीला चांगलाच फायदा झाला आहे. दक्षिण मुंबईत सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या भायखळा मतदारसंघात शिवसेनेच्या यामिनी जाधव विजयी झाल्या आहेत. त्यांनी एमआयएमच्या वारिस पठाण यांचा पराभव केला. कुलाब्यात भाजपच्या राहुल नार्वेकर यांनी काँग्रेसच्या भाई जगताप यांचा पराभव करून अपेक्षेप्रमाणे बाजी मारली आहे. दक्षिण मध्य मुंबईत मनसेचे नेते राज ठाकरे यांची होम पिच असलेल्या माहीममध्ये शिवसेनेचा भगवा फडकला आहे. येथे सेनेच्या सदा सरवणकर यांनी मनसेच्या संदीप देशपांडेंचा पराभव केला. धारावीत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, तर अणुशक्तीनगरमध्ये राष्ट्रवादीचे नवाब मलिक निवडून आले आहेत.

उत्तर मध्य मुंबईतील चांदिवलीमध्ये शिवसेनेचे दिलीप लांडे आणि काँग्रेसचे नसीम खान यांच्यात अटीतटीची लढत झाली. या लढतीत लांडे यांनी खान यांच्यावर फक्त ४०० मतांनी मात केली. वांद्रे पूर्वमध्ये शिवसेनेतील बंडखोरीचा लाभ काँग्रेसच्या झिशान सिद्दीकी यांना मिळाला. शिवसेनेची मते विभागली गेल्याने सिद्दीकी यांना विजयाचा गुलाल उधळता आला. 

मालाड पश्चिममध्ये काँग्रेसचे अस्लम शेख व भाजपचे रमेशसिंह ठाकूर यांच्यातील लढत शेवटपर्यंत रंगली. येथे शेवटच्या फेऱ्यामध्ये शेख यांनी ठाकूर यांच्यावर मात केली. मागाठणेमधून मनसेला विजयाची अपेक्षा होती. परंतु, शिवसेनेच्या प्रकाश सुर्वे यांनी मनसेचे नयन कदम यांचे आव्हान परतून लावले. वायव्य मुंबईतील सर्व जागा शिवसेना-भाजप युतीने जिंकल्या आहेत. येथे काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांची डाळ शिजली नाही. 

वर्सोव्यात भाजपच्या भारती लव्हेकर यांनी बंडखोर उमेदवार राजूल पटेल यांचे आव्हान मोडून काढले. तर अंधेरी पूर्वमध्ये शिवसेना व भाजप बंडखोराच्या लढतीत सेनेचे रमेश लटके यांनी बाजी मारली. ईशान्य मुंबईत भाजपला तीन तर शिवसेनेला दोन जागा मिळाल्या. मानखुर्द-शिवाजीनगरमधून समाजवादी पक्षाचे अबू आझमी निवडून आले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com