युती-आघाडीत पक्षांतर्गत संघर्ष, हेवेदावे आणि धुसफुस

युती-आघाडीत पक्षांतर्गत संघर्ष, हेवेदावे आणि धुसफुस
युती-आघाडीत पक्षांतर्गत संघर्ष, हेवेदावे आणि धुसफुस

मुंबई ः लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी आमने-सामने उभी ठाकली असली तरी स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचे मनोमिलन अद्याप झालेले नाही. लोकसभा निवडणुकीकडे जुने राजकीय हिशोब चुकते करण्याची संधी म्हणून कार्यकर्ते, पदाधिकारी पाहत आहेत. नेते आणि पदाधिकाऱ्यांमधील हेवेदावे, शत्रूत्व, धुसफूस व अंतर्गत संघर्षामुळे युती तसेच आघाडीचे उमेदवार बेजार झाले आहेत.

राज्यातील बहुतांश मतदारसंघात युती आणि आघाडीच्या नेत्यांमध्ये विस्तवही जात नाही. त्यामुळे उमेदवारांना प्रतिस्पर्ध्याशी दोन हात करताना स्वपक्षातील विरोधकांकडेही लक्ष ठेवावे लागत आहे. प्रचाराच्या वेळी दिवसभर उमेदवारासोबत आणि प्रचारानंतर प्रतिस्पर्धी उमेदवाराशी हात मिळवणी, असे चित्र सर्रासपणे दिसत आहे. परिणामी आपल्याच ‘राजकीय हितचिंतका’वर लक्ष ठेवण्यावर उमेदवारांची शक्ती खर्च होत आहे. युती आणि आघाडीच्या नेत्यांनी स्थानिक वाद मिटविण्याचे प्रयत्न केले. काही ठिकाणी वाद मिटविताना नेत्यांच्या नाकीनऊ आले तर इतरत्र नेत्यांना हात टेकावे लागले. वर्ध्यात आघाडीचे उमेदवार चारूलता टोकस विरुद्ध काँग्रेस आमदार अमर काळे हा जुना संघर्ष आहे. 

रामटेकमध्ये आघाडीचे उमेदवार किशोर गजभिये यांना स्थानिक नेते नितीन राऊत यांचा विरोध आहे. चंद्रपूरमध्ये केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे एकमेकांशी सख्य नाही. तर आघाडीत उमेदवार सुरेश धानोरकर आणि काँग्रेस कार्यकर्ते असा वाद आहे. धानोरकर हे निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये आले. यवतमाळमध्ये आघाडीचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांना स्वपक्षातील शिवाजीराव मोघे, वसंत पुरके यांचा सामना करावा लागत आहे. तर शिवसेनेत उमेदवार भावना गवळी विरुद्ध राज्यमंत्री संजय राठोड यांच्यातील वाद उफाळून आला आहे. 

अमरावतीमधून शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ हॅटट्रिक साधण्याच्या प्रयत्नात आहेत. येथे आघाडीने आमदार रवि राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांना पाठिंबा दिला आहे. राणा हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे भाजपचा राणांना छुपा पाठिंबा असल्याचा शिवसेनेला संशय आहे. असे असले तरी राणांना काँग्रेसचे स्थानिक नेते संजय खोडके यांचा विरोध सहन करावा लागत आहे. बुलडाण्यात खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर शिवसेनेचे माजी आमदार विजयराज शिंदे नाराज आहेत. नाशिकमध्ये थोड्याफार प्रमाणात हीच स्थिती आहे. शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांच्या विरोधात भाजप नेते माणिकराव कोकाटे दंड थोपटण्याच्या तयारीत आहेत.

दिंडोरीत भाजपने डॉ. भारती पवार यांना आयात करून उमेदवारी दिली. त्यामुळे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण आणि त्यांचे समर्थक संतापले असून चव्हाण यांनी बंडाचा झेंडा हातात घेतला आहे. औरंगाबादमध्ये उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार पक्षावर नाराज आहेत.

भिवंडीत भाजप उमेदवार कपिल पाटील यांना स्थानिक शिवसैनिकांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे. तर काँग्रेस उमेदवार सुरेश टावरे यांना काँग्रेसच्याच विश्वनाथ पाटील यांच्या बंडखोरीचे आव्हान पेलावे लागत आहे. ठाण्यात शिवसेना उमेदवार राजन विचारे यांना भाजप नगरसेकांच्या तर राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांना काँग्रेस नगरसेवकांच्या नाकदुऱ्या काढाव्या लागत आहेत. कोल्हापुरात राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांना काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी आव्हान दिले आहे. पाटील यांनी सर्व ताकद शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या मागे उभी केली आहे. वेगवेगळ्या मतदारसंघातील अशा राजकीय अस्थिरतेमुळे उमेदवार गोंधळात सापडले आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com