agriculture news in Marathi, almatti dam cause for flood, Maharashtra | Agrowon

कर्नाटकच्या हावरेपणामुळेच ‘अलमट्टी’ला बट्टा

मनोज कापडे
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

मुळात १९६५ च्या आधी अलमट्टी धरण बांधताना कर्नाटकने उंचीबाबत महाराष्ट्राला काहीच विचारले नसल्याचे मूळ अभ्यासात आढळून येते. त्यामुळे पूर्वीपासून आपले प्रशासन गाफिल राहिले. पुढे अनेक वर्षानंतर लवादासमोर आम्ही अलमट्टी व पूर याचा संबंध स्पष्ट करण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, अलमट्टीचा फुगवटा कृष्णेच्या पात्रातच राहतो. पुराचे पाणी इतरत्र पसरत नाही, असा दावा कर्नाटकने लवादासमोर केला. यात आमचे ऐकले गेले नाही. उंची वाढली गेली. आमच्या मते अलमट्टीच्या मुळ फुगवट्यावर पुन्हा इकडून महाराष्ट्राने सोडलेल्या पाण्याचाही फुगवटा तयार होतो. यामुळे कृष्णेत एका फुगवट्यावर पुन्हा दुसरा फुगवटा चढून गुंतागुंतीची स्थिती तयार होते. त्यामुळे पूर वहन प्रक्रियेत मोठा अडथळा येतो. मात्र, आता हे सिद्ध करण्यासाठी उपग्रह तंत्राचीच मदत घ्यावी लागेल.
- जलतज्ज्ञ नंदकुमार वडनेरे, सदस्य, कृष्णा पाणी तंटा लवाद

पुणे : कोयना धरणाचा विसर्ग व मुक्त क्षेत्रातील पाऊस यामुळे २०० टीएमसीपेक्षाही जास्त पाणी कृष्णा नदीवाटे शेवटी अलमट्टी धरणातच येण्याची स्थिती असतानाही कर्नाटकने हावरेपणे अलमट्टीतून सतत कमी पाणी सोडले आहे. यामुळेच ‘अलमट्टी’च्या नावाला बट्टा लागतो,’ असे मत जलसंपदा विभागातील उच्चपदस्थांनी व्यक्त केले.

अलमट्टीची क्षमता १२३ टीएमसी (अब्ज घनफूट) आहे. महाराष्ट्रातून कृष्णेचे सर्व पाणी शेवटी अलमट्टीच्याच दिशेने जाणार असते. कोयनेतून सोडले जाणारे पाणी व कोयना ते कोल्हापूर या दरम्यानच्या मुक्त क्षेत्रातील पूर व पावसाचे पाणी यंदा २०० ते २५० टीएमसीच्या आसपास होते. ‘अलमट्टी’च्या क्षमतेपेक्षाही दुप्पट पाणी वरच्या भागात असताना कर्नाटकने अधाशासारखे पाणी अडवून ठेवण्याचा खटाटोप केला, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

 अलमट्टीचा सरासरी विसर्ग कमीच
अलमट्टीमुळे राज्यात पूर येतो की नाही हे स्पष्ट होत नसले तरी धरणात पाणी अडविण्याचा अधाशी प्रयत्न कर्नाटक करीत असल्याचे सिद्ध होते, असे अभियंत्यांचे मत आहे. १ ऑगस्ट ते १० ऑगस्ट या दरम्यान महाराष्ट्रातून अलमट्टीत सरासरी चार लाख ६४ हजार क्युसेक पाणी येत (इनफ्लो) होते. मात्र, अलमट्टीतून विसर्ग (डिस्चार्ज) तीन लाख ९१ हजार क्युसेकचा आहे. कोयना, वारणा या धरण क्षेत्रात ३ ऑगस्टनंतर अतिवृष्टी झाल्याने सांगलीत पूर आला. पाणलोट क्षेत्रात पुराची स्थिती असताना आणि पुढील चोवीस तासात अलमट्टीत प्रतिसेकंदाला पावणेतीन लाख क्युसेक पाणी येईल, हे माहीत असतानाही कर्नाटकने संथ डिस्चार्ज ठेवत आडमुठेपणा केल्याचे महसूल यंत्रणेचे म्हणणे आहे.“अलमट्टीचा विसर्ग पाच लाख २० हजार क्युसेकपर्यंत नेता येईल. तुम्ही विसर्ग तातडीने वाढवा, अशी विनंती महाराष्ट्राकडून कर्नाटक प्रशासनाला केली जात होती. पण चार दिवस अलमट्टीचा विसर्ग साधा चार लाखाच्याही पुढे नेला गेला नाही,” अशी माहिती सूत्रांनी दिली. कोल्हापूर, सांगली पाण्यात गेल्यावर हाहाकार उडाल्यानंतरदेखील अलमट्टीचा विसर्ग कायम ठेवला गेल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते.

विसर्ग साडेपाच लाखांनी हवा होता
राज्याचे माजी जलसंपदा सचिव जलतज्ज्ञ नंदकुमार वडनेरे म्हणाले, “अलमट्टीच्या मूळ फुगवट्यावर पुन्हा आपल्या राज्याचाही फुगवटा चढतो. त्यामुळे पूर वहनात अडथळे येतात. तथापि, याचा उपग्रह तंत्राद्वारेच अभ्यास होऊ शकतो. दुसरे म्हणजे अलमट्टीचे पाणी दोन्ही राज्यांनी समन्वयानेच सोडले पाहिजे. हा समन्वय तांत्रिकच नव्हे तर राजकीय यंत्रणेद्वारेही अत्यावश्यक ठरतो. कृष्णा खोऱ्यातील अतिवृष्टी आणि पुराचे पाणी याचा सतत आढावा घेत अलमट्टीचे विसर्ग ठरवणे योग्य ठरले असते. मात्र, कर्नाटकने हावरटपणे पाणी अडवून ठेवल्यास समस्या उद्भवणारच."
"यंदा अलमट्टीतून साडेपाच लाख क्युसेकने पाणी आधीपासून सोडत राहिले असते तर महाराष्ट्रात पुराचे संकट आले नसते. आरडाओरड झाल्यावर शेवटच्या क्षणी एकदम साडेपाच-सहा लाखांनी जादा पाणी सोडून कर्नाटकने स्वतःही संकट ओढून घेतल्याचे दिसतेय,” असेही वडनेरे यांनी स्पष्ट केले.

अलमट्टीबाबत दोन मतप्रवाह
दरम्यान, कोल्हापूर-सांगलीमधील पूरस्थितीला अलमट्टी जबाबदार आहे की नाही यावरून जलसंपदा विभागाच्या अभियंत्यांमध्येच दोन मतप्रवाह तयार झालेले आहेत. “कर्नाटकचा पाणी हावरेपणा, अलमट्टीतून वेळेत पाणी न सोडणे, अलमट्टीच्या प्रशासनाने महाराष्ट्रातील वेळोवेळीच्या स्थितीचा अभ्यास न करणे व समन्वय न ठेवल्याने त्याचा शेवट महापुराच्या मानवनिर्मित समस्येत होतो,” असे काही निष्णात अभियंते सांगतात. मात्र, दुसऱ्या गटाला हे मान्य नाही. “महापुराला सर्वस्वी अलमट्टी जबाबदार नाहीच. उलट पंचगंगा व कृष्णेच्या संगम भागात पुराच्या पाण्याचे संध भोवरे तयार होतात. त्यामुळे पाणी कुठेही घुसते. या जिल्ह्यांचे आपत्ती व्यवस्थापनही कुचकामी आहे. दुसरे म्हणजे या भागाची भौगोलिक स्थिती अशी आहे की पुराचे पाणी बाहेर पडण्यास वेग मिळत नाही. तिसरे कारण म्हणजे नद्या व उपनद्यांवर झालेली अतिक्रमणे, मूळ नैसर्गिक पात्राचे झालेले आकुंचन, बुजवलेले ओहोळ-ओत-सरळी-छोटे नाले, नदीपात्रांमध्ये झालेले पूल व बांधकामे यात आहेत. चौथे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे सांगली-कोल्हापूरची भौगोलिक स्थिती, अभूतपूर्व पाऊस, सर्व धरणांमधून एकाच वेळी विसर्ग यामुळे  पूरस्थिती आवाक्याबाहेर गेली,” असे ठाम मत जलसंपदा विभागातील एका उच्चपदस्थ सूत्रांनी व्यक्त केले.

अलमट्टीत नेमस्या काय घडामोडी झाल्या

तारीख पाण्याची आवक  पाण्याचा विसर्ग (क्युसेकमध्ये)
५ ऑगस्ट  २.४५ लाख २.९० लाख
६ ऑगस्ट २.७९ लाख ३.१६ लाख
७ ऑगस्ट  ३.६२ लाख  ३.९० लाख
८ ऑगस्ट  ३.६२ लाख ३.९० लाख
९ ऑगस्ट   ३.४९ लाख ३.६४ लाख
१० ऑगस्ट ५.७० लाख  ५.३० लाख
११ ऑगस्ट  ५.४४ लाख ६.०० लाख
१२ ऑगस्ट  ५.४० लाख ६.३० लाख

टीप : “कृष्णा नदी व खोऱ्यातील सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर जिल्ह्यांत पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र व कर्नाटकच्या धरणातील पाणी वाढू शकते,” असा संदेश कर्नाटकला दोन ऑगस्टला देण्यात आला होता. 
 


इतर अॅग्रो विशेष
बदल ठरावेत लाभदायकयवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील हजारो...
हवामान बदल हेच सर्वांत मोठे आव्हानआ ज जगभरात हवामान बदल आणि त्याचे होणारे परिणाम हा...
महिनाभरात पडणार नाशिक विभागातील साखर...नगर ः नगर, नाशिक जिल्ह्यामध्ये यंदा ३२ पैकी केवळ...
महिलांनी मालक बनले पाहिजे ः राज्यपालमुंबई ः महालक्ष्मी सरस प्रदर्शनातून महिलांचे...
कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी...मुंबई ः दोन लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी...
ग्रामीण कुटुंबांचे उत्पन्न का वाढत नाही...पुणे: देशात ५० टक्के रोजगार हा शेतीशी निगडित व...
नागपूर : थंडीची तीव्रता वाढली; अंडी...नागपूर ः थंडीच्या दिवसांत मागणी वाढत अंड्यांचे...
निफाडला २.४ अंश तापमान; राज्य थंडीने...पुणे : उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांच्या...
शेतात नवे प्रयोग करणारे शेतकरी आमचे...मुंबई ः प्रत्यक्ष शेतात राबून नवनवीन प्रयोग...
चिखलदऱ्याच्या स्ट्राॅबेरीला हवाय...अमरावती ः लागवड खर्चाच्या दुप्पट उत्पन्न मिळवून...
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत १८ लाख टन...औरंगाबाद: मराठवाड्यातील औरंगाबाद साखर सहसंचालक...
कमी खर्चातील गांडूळखतनिर्मिती तंत्राचा...अंबेजोगाई (जि. बीड) येथील शिवाजी खोगरे यांनी कमी...
आरोग्यदायी अन्ननिर्मितीबरोबरच जपली...धानोरा- भोगाव (जि. हिंगोली) येथील दादाराव राऊत आठ...
पशुधन विकासाची वसाहत वाटपशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाची...
रस्ते की मृत्यूचे सापळेआपला देश संपूर्ण विश्वात रस्ते अपघातात अव्वल आहे...
फलोत्पादन योजनांमध्ये बदलास केंद्र तयार पुणे: “फलोत्पादनातील उत्पन्नवाढीसाठी सध्याच्या...
शेतीसाठी आवश्‍यक ते सर्वकाही करणार :...माळेगाव, जि. पुणे ः कमी पाणी व कमी जागेत अधिक...
कलिंगड शेती ठरते आहे फायदेशीरअकोला ः मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन परिसरात...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडी पुणे ः राज्यातील थंडीत चढउतार सुरू आहे. मध्य...
हमीभावाच्या संदर्भात वायदे बाजारावरही...लातूर : हमीभावापेक्षा कमी दराने शेतीमाल खरेदी...