हापूसचा हंगाम दोन महिने लांबला; २५ टक्के नुकसानीची शक्यता

मोहराला अनुकूल वातावरण नसल्याने हंगाम दीड महिना पुढे जाईल, असे दिसते. उशिरा मोहर फुटला की फळ उत्पादनाला उशीर होणार आहे. त्यातून अर्थकारण बिघडेल. जानेवारी महिन्यात थंडी एकसारखी पडली, तर पुढे एकदम फळ तयार होणार आहे. यंदा प्रतिकूल वातावरणामुळे फवारण्यांचे गणित बिघडणार आहे. - डॉ. विवेक भिडे,अध्यक्ष, कोकण हापूस आंबा उत्पादक संघ
आंबा कलमांना फुटलेली पालवी
आंबा कलमांना फुटलेली पालवी

रत्नागिरी : प्रतिकूल वातावरणाचा परिणाम संवेदनशील हापूसवर होणार असून, अर्थकारण बिघडणार, हे निश्‍चित झाले आहे. हंगाम दीड ते दोन महिना लांबण्याची चिन्हे असल्याने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे. पावसाचा मुक्काम लांबल्याने ही परिस्थिती ओढवणार असून, उत्पन्नात २५ टक्यांनी घट होईल, अशी भीती बागायतदारांकडून वर्तविली जात आहे.

कोकणात ऑक्टोबर महिन्यात पाऊस जातो. त्यानंतर वापसा यायला लागतो. ऑक्टोबर हिटमुळे जमीन तापते आणि कलमांना ताण मिळतो. या वेळी मतलई वारे सुटतात. वापसा, मतलई वारे आणि थोडी थंडी ही कलमांना मोहर येण्यास अनुकूल परिस्थिती असते. परंतु, यंदा मोहर येण्यास वातावरण प्रतिकूल आहे. पाऊस अजूनही गेलेला नाही, तापमानही अधिक आहे. जोपर्यंत पाऊस थांबत नाही तोपर्यंत मतलई वारे सुरू होणे अशक्य आहे. मोहरास अनुकूल वातावरण नसल्याने हंगाम किमान दीड महिने पुढे जाईल, असे दिसते. उशिरा मोहर आल्याने फळकाढणीसही विलंब होणार आहे. त्यामुळे बागायतदारांचे अर्थकारण बिघडणार आहे. जानेवारी महिन्यात थंडी एकसारखी पडली, तर पुढे एकदम फळ तयार होणार आहेत. एकाचवेळी सर्व ठिकाणचा आंबा बाजारात आला, तर त्याचा दरावर परिणाम होणार आहे.

उत्पादन येण्याची साखळी दरवर्षी पहिल्यांदा देवगड खाडीजवळच हापूस आंबा बाजारात येतो. त्यानंतर राजापूर खाडी, रत्नागिरी खाडी, जयगड खाडी आणि त्यापुढे अन्य खाडीकिनारी परिसरातील आंबा बाजारात येऊ लागतो. यंदा हे चित्र बदलणार आहे. फेब्रुवारी महिन्यात आंबा तयार झाला, तर हंगामातील अर्थकारण चांगल्या पद्धतीने राहते. एप्रिल महिन्यात हापूसच्या बरोबरीने कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, उत्तर भारतातील आंबा बाजारात दाखल होतो. त्यामुळे दरावर परिणाम होणार आहे.

फवारण्यांचे गणित बिघडणार पावसाबरोबरच हिवाळ्यात तापमान स्थिर राहणे आवश्यक आहे. सद्यःस्थितीत मिळणाऱ्या अंदाजावरून यंदा दोन अंश सेल्सिअसने तापमान कमी राहील, अशी शक्यता आहे. तसे झाले तर त्याचा फटका उत्पादनाला बसू शकतो. तसेच, किडींचाही प्रादुर्भाव वाढणार असून, फवारण्यांचा कालावधी कमी करावा लागणार आहे. तुडतुडे, भुरीचे आव्हान बागायतदारांपुढे असणार आहे. दोन फवारणीतील अंतर हे १५ दिवस ते तीन आठवडे असते. परंतु प्रतिकूल हवामानामुळे यंदाच्या वर्षी फवारणीत वाढ होण्याची शक्यता आहे.  

अर्थकारणावर परिणाम बागायतदार हंगामात एक हजार क्रेट आंबा उत्पादन घेत असेल, तर सर्वसाधारणपणे मार्चमध्ये पन्नास क्रेट आंबा मिळतो. यंदाच्या वातावरणामुळे अवघा दहा क्रेटपर्यंतच मिळेल, अशी शक्यता आहे. या कालावधीत बाजारातील पाच ते सहा डझन आंब्याच्या पेटीचा दर चार हजार ते साडेसहा हजार रुपयांपर्यंत राहतो. बाजारात आंब्याची उपलब्धता कमी असल्यामुळे सुरवातीला दर चांगला मिळाला, तरीही अपेक्षित उत्पादन नसल्याने बागायदारांना सुमारे पंचवीस टक्के उत्पन्नावर पाणी सोडावे लागेल. एप्रिल, मे या दोन महिन्यांत सर्वाधिक हापूस बाजारात दाखल होतो. त्याचा दरावर परिणाम होतो. एप्रिल महिन्यात अमेरिका, इंग्लंडसह परदेशी निर्यात सुरू होते. यंदा आंबा उशिरा आल्यामुळे निर्यातीला पुरेसा आंबा उपलब्ध राहील. निर्यात वाढली, तर त्याचा फायदा स्थानिक बाजारातील मालाचे दर स्थिर राहण्यास मदत होईल, अशी अटकळ बांधली जात आहे.

पन्नास कोटींहून अधिक फटका मुंबई मार्केटमध्ये दाखल होणाऱ्या हापूसचा विचार करता फेब्रुवारी महिन्यात सुमारे तीन हजार पेट्या कोकणातून रवाना होतात. त्या वेळी पाच ते सहा डझनाच्या पेटीचा दर ५ ते ६ हजार रुपये राहतो. ऑक्टोबर महिन्यात मोहर न आल्यामुळे फेब्रुवारी महिन्यात मिळणाऱ्या सुमारे तीन ते चार कोटी उत्पन्नावर बागायतदारांना पाणी सोडावे लागणार आहे. गतवर्षी या महिन्यात सरासरी ३० हजार ते ५० हजार पेट्या जात होत्या. त्या वेळी पाच ते सहा डझनच्या पेटीचा दर चार हजार ते पाच हजार रुपये राहतो. नोव्हेंबर महिन्यात व्यवस्थित मोहरास सुरवात झाली, तर मार्च महिन्याच्या अखेरीस आंबा बाजारात येईल. त्यामुळे मार्चच्या सुरवातीच्या उत्पन्नावर बागायतदारांना पाणी सोडावे लागणार आहे. फेब्रुवारी, मार्च या दोन महिन्यांत सुमारे पन्नास ते साठ कोटींचा फटका बसू शकतो, असा अंदाज आहे.

दोनशे कोटींना थेट फटका... रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मिळून सुमारे ९७ हजार हेक्टरवर आंबा लागवड होते. रत्नागिरी जिल्ह्यात ६५ हजार हेक्टर आंबा लागवड असून, ५८ हजार हेक्टर उत्पादनक्षमता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३२,७०० हेक्टरवर लागवड असून, उत्पादनक्षम २५,६०० हेक्टर आहे. हेक्टरी उत्पादन दोन ते अडीच टन आहे. उत्पादनक्षम क्षेत्र ८३ हजार ५०० हेक्टर आहे. रत्नागिरी जिल्ह्यात हंगामात १ लाख २१ हजार मेट्रिक टन, तर सिंधुदुर्गात ५५ हजार मेट्रिक टन असे मिळून सुमारे १ लाख ७१ हजार मेट्रिक टन एवढे उत्पादन मिळते. 

कोकणात आंबा उत्पादनातून वर्षाला सुमारे दोन हजार कोटींची उलाढाल होते. त्यात एकट्या रत्नागिरी जिल्ह्याची उलाढाल सुमारे १२०० कोटी आहे. त्यामध्ये आंबाविक्रीतून ९०० ते १००० कोटी तर आंबा प्रक्रिया उत्पादनातून साधारणपणे दोनशे कोटीवर उलाढाल होते. पावसामुळे ऑक्टोबर महिन्यात मोहर न आल्याने फेब्रुवारीतील उत्पन्नावर बागायतदारांना पाणी सोडावे लागले आहे. नोव्हेंबर महिन्यात व्यवस्थित मोहर आला नाही, तर मार्च महिन्यात सुरवातीला येणाऱ्या उत्पादनालाही फटका बसू शकतो. फेब्रुवारी, मार्चमध्ये एकूण हंगामाच्या १५ ते २० टक्के उलाढाल होते. पावसामुळे हंगाम एक महिना उशिरा सुरू होणार असल्याने सुरवातीच्या टप्प्यात मिळणाऱ्या दोनशे कोटींच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे.  

प्रतिक्रिया हंगामातील ८० दिवस आंबा विक्री झाली, तर त्याचा फायदा बागायतदाराला होतो. मार्च महिन्यात दर वधारलेला असतो, तर तो मे महिन्यात कमी होत जातो. यंदा दर असेल तेव्हा आंबा नाही. तसेच, अन्य राज्यांतील आंबाही त्याचवेळी येणार असल्याने हापूसकडे दुर्लक्ष होईल. आताच्या परिस्थितीत २५ टक्के तोटा निश्‍चित आहे.

- प्रसन्न पेठे, आंबा व्यावसायिक

आंब्याला हमीभाव नाही, त्यामुळे यंदाच्या हंगामात दर किती राहील, हे आताच सांगणे शक्य नाही. एक महिना हंगाम पुढे गेल्याने मार्च ते मे या कालावधीत किंमत किती राहील, यावर सर्व अवलंबून राहणार आहे. महागाई वाढल्याने मजुरीचे दरही वाढत आहेत. खर्च अधिक होणार असून, अपेक्षित उत्पन्नावर परिणाम होणार आहे.

- तुकाराम घवाळी, बागायतदार

ऑक्टोबर महिन्यात जो मोहर येतो त्यातून फेब्रुवारीत आंबा येतो. तो यंदा मिळणे अशक्य आहे. सध्याची प्रतिकूल परिस्थिती पाहता मार्च महिन्याच्या सुरवातीची मार्केटमधील उलाढाल कमी होईल. अखेरीस आंबा अधिक प्रमाणात येण्यास सुरवात होईल. - संजय पानसरे, वाशी मार्केट    सध्याच्या पावसामुळे जमिनीत ओलावा टिकून आहे. आंबा कलमांना पुरेसा ताण बसलेला नाही. सध्याची परिस्थिती पाहता थंडी उशिरा सुरू होईल. सध्या आंबा कलमाच्या जून फांद्यामधून पालवी येण्याचे प्रमाण वाढले आहे. या प्रतिकूल हवामानात करपा रोग आणि तुडतुडे, शेंडा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. यंदा मोहर उशिरा येणार असल्याने मार्चऐवजी १५ एप्रिलनंतर फळे बाजारपेठेत येतील. - योगेश परुळेकर, सहायक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग, कृषी महाविद्यालय, दापोली, जि. रत्नागिरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com