अमरावती विभागात टँकरने ओलांडला साडेचारशेचा टप्पा

अमरावती विभागात टँकरने ओलांडला साडेचारशेचा टप्पा
अमरावती विभागात टँकरने ओलांडला साडेचारशेचा टप्पा

अकोला :  दुष्काळाची तीव्रता अमरावती विभागात सातत्याने वाढत आहे. पाणीटंचाईत बुलडाणा जिल्ह्यात हाहाकार उडाला आहे. अमरावती विभागातील पाच जिल्हे मिळून सुमारे ४२४ टँकर सध्या धावत असताना त्यात एकट्या बुलडाण्यात २६० पेक्षा अधिक टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्हा प्रशासनाला दररोज कुठल्याना कुठल्या गावासाठी टँकरने पाणी पुरविण्याबाबत आदेश द्यावे लागत आहेत, इतकी बिकट परिस्थिती झालेली आहे. मागील तीन वर्षांपासून बुलडाणा जिल्हा सातत्याने दुष्काळाशी लढतो आहे. यावर्षी दुष्काळाची व प्रामुख्याने पाण्याची समस्या तीव्र झाली आहे. मे महिना अखेर जिल्ह्यात २६० पेक्षा अधिक टँकर धावत आहेत. दररोज टँकरची मागणी येत असून टँकर देताना प्रशासनाचीही दमछाक होत आहे. अमरावती विभागात मे महिन्यात पाचही जिल्ह्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. यात प्रामुख्याने बुलडाणा जिल्ह्यात २६०, अमरावती ५०, वाशीम ४६, यवमताळ ४१, अकोला २९ टँकरचा समावेश आहे.   पावसाची शक्यता जूनमध्ये तितकीशी नसल्याने किमान दोन महिने अजूनही टँकरने पाणीपुरवठा करावा लागण्याची चिन्हे आहेत. बुलडाणा जिल्ह्यात कधी नव्हे एवढी भीषण पाणी समस्या निर्माण झालेली आहे. या जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पांमधील साठा संपलेला आहे. पाणी समस्येचा फटका जनावरांनाही सहन करावा लागत आहे. टँकर धावत असलेल्या गावांमध्ये पशुधन गृहीत धरून पाण्याचे नियोजन टँकरद्वारे केले जात असले तरी ते पाणी पुरेसे ठरत नाही. चाऱ्याचीही अशीच गंभीर स्थिती झालेली आहे.

चिंचोलीत रेशनकार्डवर पाणी बुलडाणा जिल्ह्यात शेगाव नजीकच्या चिंचोली कारफार्मा या गावात सर्वाधिक भीषणता निर्माण झालेली आहे. मध्यंतरी वादविवाद वाढल्याने काही दिवस तेथे पोलिस बंदोबस्तात पाणी द्यावे लागले. आता प्रशासनाने नियोजन करून एका रेशनकार्डवर २०० लिटर पाण्याचे वितरण सुरू केले आहे. नागरिकांमध्ये पाण्यावरून निर्माण होणारे वादविवाद मिटविण्यासाठी असे पाऊल उचलावे लागले आहे. टँकर गावात येणार ही माहिती कळताच वेशीपासून नागरिकांच्या तेथे रांगा लागतात. हातात बादल्या व पाइप घेऊन नागरिक टँकरच्या मागे धावत सुटतात. यामुळे एखादा अपघात घडू नये, यासाठी आता रेशनकार्डवर पाण्याचे वितरण सुरू करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com