साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर अमेरिकन लष्करी अळी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची तीव्रता वाढली असताना शेतकऱ्यांपुढे अमेरिकन लष्करी अळीचे संकट उभे राहिले आहे. सध्या उगवण झालेल्या सुमारे ११२२ हेक्टर क्षेत्रावरील मका पिकावर या अळीचा प्रादुर्भाव झाला असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. 

जिल्ह्यात मागील आठ दिवसांपर्यंत दोन विभागांत टोकाची स्थिती निर्माण झाली होती. पश्चिम भागात दमदार पाऊस तर पूर्व भागात पावसाची दडी यामुळे पेरणीची कामे ठप्प झाली होती. मात्र, गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पेरणीच्या कामांना गती आली आहे. दुष्काळी तालुक्यात जनावरांच्या चाऱ्यासाठी खरिपात मोठ्या प्रमाणात मका पीक घेतले जाते. जिल्ह्यात मक्याचे १५ हजार ८४४ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. यापैकी सहा हजार ९१६ हेक्टरवर मक्याची लागवड झाली आहे. जनावरांच्या चाऱ्यासाठी प्रमुख आधार असलेल्या मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

कृषी विभागाकडून करण्यात आलेल्या पाहणीत ११२२ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये फलटण तालुक्यातील सर्वाधिक ३६०, कऱ्हाडमधील २००, माणमधील २००, पाटणमधील १८५ व खटावमधील १०५ हेक्टर समावेश आहे. उर्वरित तालुक्यात दोन ते तीन टक्के क्षेत्र बाधित झाले आहे. मका हे जनावरांच्या चाऱ्यातील प्रमुख पीक आहे. या पार्श्वभूमीवर यंदा कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामपासूनच लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना सुरू केल्या.

गेल्या महिन्यात राष्ट्रीय चर्चा सत्राचे आयोजन करून याबाबत जागृती करण्यात आली. उपविभागीय स्तरावर अमेरिकन लष्करी अळीचा जीवनक्रम व नियंत्रण अधिकारी प्रशिक्षण, क्षेत्रिय पातळीवर शेतकरी प्रशिक्षण, अनेक गावात पोस्टरद्वारे उपाययोजनांविषयी मार्गदर्शन केले जात असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनील बोरकर यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com