नगरमध्येही मक्यावर अमेरिकी फॉल आर्मी वर्मचा प्रादुर्भाव

तालुक्यातील दहीगाव भागात काही ठिकाणी मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसत आहे. त्याबाबत कृषी विभागाने शेतकऱ्यांना उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे. अळीचा प्रादुर्भाव होणार नाही याबाबत शेतकऱ्यांनी दक्ष राहावे. - बाबासाहेब नितनवरे, तालुका कृषी अधिकारी, नगर.
मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव
मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव

नगर   : दुष्काळी परिस्थितीने शेतकरी हतबल आहेत. आता त्यात मका पिकावर स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा (अमेरिकी फॉल आर्मी वर्म) या लष्करी अळीचा प्राद्रुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. नगर तालुक्यातील साकत, दहीगाव परिसरात या अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या भागात पाहणी केली आहे. दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर या नव्या संकटामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

नगर जिल्ह्यातील अकरा तालुक्यांत तीव्र दुष्काळ पडला असल्याचे प्रशासनाने मान्य केले आहे. मात्र काही मोजकी गावे वगळता जिल्ह्यातील जवळपास सर्वच गावात यंदा परिस्थिती गंभीर आहे. पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत आहे. अजून सात ते आठ महिने जायचे असताना आजच काही तालुक्यांत चारा उपलब्ध नाही. त्यामुळे पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी चारा उत्पादन घ्यावे, असे शासन व प्रशासन आवाहन करत आहे.

नगर, कर्जत, शेवगाव, पाथर्डी या दुष्काळी तालुक्यांतील शेतकऱ्यांनी चारा पिके घेण्याला प्राधान्य दिले आहे. मात्र अशी कठीण परिस्थिती असताना आता मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. दहीगाव येथील रामदास जयवंत शिंदे यांच्या शेतातील मका पिकावर या किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.

मंडळ कृषी अधिकारी व्ही. एस. जाधव यांच्यासह कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शिंदे यांच्या पिकांची पाहणी करून कीड नियंत्रणाच्या उपाययोजना करण्याचा सल्ला दिला. या एकाच ठिकाणी ही अळी आढळल्याने कृषी विभागाचे म्हणणे असले तरी शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या भागात चार ते पाच शेतकऱ्यांच्या मका पिकावर तिचा प्रादुर्भाव झाला आहे. अळीने थेट मक्याच्या गाभ्यावरच हल्ला केला आहे. साहजिकच हा चारा जनावरांना टाकता येत नाही. आधीच दुष्काळाने हतबल झालेले शेतकरी आता या नव्या संकटामुळे चिंतेत आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com