agriculture news in marathi, american fall army warm on crops, solapur, maharashtra | Agrowon

सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव

टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 जुलै 2019

सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा दुष्काळामध्ये होरपळून निघत असताना, आता जेमतेम पाण्यावर केलेल्या मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने ऐन दुष्काळात तेरावा म्हणण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील एकूण क्षेत्रापैकी जवळपास ९० टक्के क्षेत्रावरील मका पूर्णपणे फस्त करण्यास सुरवात केली आहे. प्रामुख्याने सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर, दक्षिण सोलापुरात या अळीचा सर्वाधिक प्रभाव दिसत आहे. 

सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा दुष्काळामध्ये होरपळून निघत असताना, आता जेमतेम पाण्यावर केलेल्या मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने ऐन दुष्काळात तेरावा म्हणण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील एकूण क्षेत्रापैकी जवळपास ९० टक्के क्षेत्रावरील मका पूर्णपणे फस्त करण्यास सुरवात केली आहे. प्रामुख्याने सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर, दक्षिण सोलापुरात या अळीचा सर्वाधिक प्रभाव दिसत आहे. 

गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. त्यामुळे जेमतेम पाण्यावर खरीप आणि रब्बीची पिके शेतकऱ्यांनी घेतली. पण त्यातून काहीच हाती लागले नाही. उन्हाळी हंगामात आणि आता खरिपात ज्यांच्याकडे थोडे पाणी आहे त्यांनी तसेच काहींनी पावसाच्या भरवशावर मका घेतली आहे. पण त्यांना आता मक्यावरील लष्करी अळीने हैराण केले आहे. जिल्ह्यात मक्याचा सर्वाधिक वापर जनावरांच्या चाऱ्यासाठी होतो. 

जिल्ह्यातील सांगोला, माळशिरस, पंढरपूर, मंगळवेढा, करमाळा, माढा या भागांतील दूध व्यवसायाला मक्याचा मोठा हातभार आहे. पण गेल्या महिना-दीड महिन्यापासून मात्र मक्याचे संपूर्ण क्षेत्रच लष्करी अळीच्या प्रादुर्भावाखाली आल्याने शेतकऱ्यांवर नवीन संकट ओढावले आहे. जिल्ह्यात जवळपास १८ हजार हेक्टरवर मक्याचे क्षेत्र आहे. त्यापैकी जवळपास १७ हजार हेक्टर क्षेत्रावरील मका लष्करी अळीने फस्त करण्यास सुरवात केली आहे. मक्यावरील या वाढत्या प्रादुर्भावामुळे कृषी विभागाने गेल्या महिन्यापासून जिल्ह्यात शेतीशाळांचे आयोजन करून प्रबोधन सुरू केले आहे. आतापर्यंत जवळपास २०० हून अधिक शेतीशाळा गावागावात घेतल्या आहेत; पण वातावरणातील सततच्या बदलामुळे आणि या अळीला पोषक वातावरण राहत असल्याने ही अळी आजही हाताबाहेर आहे.

जिल्ह्यात २४१ शेतीशाळा
मक्यावरील लष्करी अळीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात आतापर्यंत २४१ शेतीशाळा घेण्यात आल्या. त्यात दक्षिण सोलापुरात ३७, मंगळवेढा ४८, माळशिरस, सांगोला आणि माढ्यात प्रत्येकी ५२ शेतीशाळा घेण्यात आल्या. या अळीची ओळख, त्याची लक्षणे, त्यावरील उपाय यावर तज्ज्ञांकडून या शेतीशाळात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या शेतीशाळांचा पहिला टप्पा आता पूर्ण झाला आहे. लवकरच दुसऱ्या टप्प्यातही या शेतीशाळा घेण्यात येणार आहेत. 

मक्याबरोबर ऊस, ज्वारीही लक्ष्य
सध्या लष्करी अळीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने मक्यावर दिसत असला, तरी पंढरपूर, माळशिरस, माढा, करमाळा या तालुक्यांतील उसावरही त्याचा काही प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. जिल्ह्यात जवळपास दीड लाख एकरवर ऊस आहे. त्यापैकी ५० टक्क्यांहून अधिक उसाचे नुकसान गतवर्षीच्या हंगामात या अळीमुळे झाले होते. यंदाही ऊस हे या अळीचे लक्ष्य राहीलच. पण आगामी रब्बी हंगामातील ज्वारीवरही त्याचा प्रादुर्भाव वाढण्याची चिन्हे आहेत. उसाच्याही ३३६ शेतीशाळा घेण्यात आल्या आहेत. त्याची संख्याही वाढवण्यात येणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

ठळक मुद्दे 

  • जिल्ह्यात मक्याचे १८ हजार हेक्टर क्षेत्र
  • सुमारे १७ हजार हेक्टर क्षेत्रावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव
  • कृषी विभागाच्या जिल्ह्यात २४१ शेतीशाळा
  • मक्याबरोबर उसावरही अळीची शक्यता
  • पंढरपूर, माळशिरस, माढा, सांगोला, मंगळवेढ्यात सर्वाधिक प्रभाव

प्रतिक्रिया

मक्यावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढतो आहे. कृषी विभागाकडून संबंधित भागाची पाहणी करून योग्य ते मार्गदर्शन करण्यात येत आहे. आतापर्यंत पहिल्या टप्प्यात २०० हून अधिक शेतीशाळा झाल्या आहेत, शेतीशाळांची संख्या आणखी वाढवली आहे. दुसऱ्या टप्प्यातही शेतीशाळांतून शेतकऱ्यांना सर्वतोपरी माहिती दिली जाईल. या अळीच्या नियंत्रणाचे आमचे सर्व प्रयत्न सुरू आहेत. 
- रवींद्र माने, कृषी उपसंचालक, कृषी विभाग, सोलापूर.

 

माझ्याकडे दोन एकरांवर मका आहे. सध्या पूर्णपणे लष्करी अळीच्या प्रादुर्भावाखाली आहे, हा सर्व मका जनावरांच्या चाऱ्यासाठी करतो, फवारण्या करूनही अळी नियंत्रणात नाही. आता चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. 
- महेंद्र बाजारे, शेतकरी, महुद ब्रु. ता. सांगोला
 


इतर ताज्या घडामोडी
कापूस दर ५१०० वर स्थिर, खेडा खरेदी वाढलीजळगाव  ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
पलटी नांगर योजनेसाठीचा निधी अपुरा जळगाव  ः जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे...
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बॅंकांचे...जळगाव  ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली...
जामनेरातील टेक्स्टाइल पार्क रखडलेजळगाव ः खानदेशातील कापसावर अधिकाधिक प्रक्रिया...
पुणे जिल्हा परिषद कृषी सभापतिपदी...पुणे : जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य...
पुणे बाजार समितीत कांद्याची विक्रमी ३२५...पुणे ः नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिक...
नियोजनात हिवरे बाजार देशाचे मॉडेल ः डॉ...नगर ः हिवरे बाजार हे दूरदृष्टी नियोजनाचे देशाचे...
वऱ्हाडात रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...अकोला  ः यंदा वऱ्हाडात रब्बीची लागवड बुलडाणा...
राज्यात आर. आर. पाटील स्मार्ट ग्राम...मुंबई : ग्रामविकास विभागामार्फत राज्यात कै. आर....
हृदयविकारामुळे होणारे मृत्यू...मुंबई : हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्याच्या...
दूधदरवाढीसाठी ‘स्वाभिमानी’चे परभणीत...परभणी ः मराठवाड्यात शासकीय दूध योजनेअंतर्गंत...
सोलापुरात कांद्यासह सर्व व्यवहार ठप्पसोलापूर : केंद्र सरकारने आणलेल्या सीएए आणि एनआरसी...
चार प्रकल्पातून मराठवाड्यात पावणेतीन...औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी, बीड,...
‘विठ्ठल’च्या कारभाराची स्वतंत्र चौकशी...पंढरपूर, जि. सोलापूर : विठ्ठल साखर कारखान्याच्या...
परभणीत फ्लॉवर ६०० ते १००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
आव्हानाला सामोरे जाण्यासाठी शेतकरी...हवामान बदलाच्या समस्येला सामोरे जाण्यासाठी शेतकरी...
खानदेशात कमाल तापमानात ९ अश सेल्सिअसने...जळगाव  : भर दुपारीही अंगात हुडहुडी भरविणारी...
फ्लॉवर रोपांना कंदच आले नाही;...नाशिक : ‘‘नाशिक शहराजवळील विविध गावांमध्ये...
'जलयुक्त शिवार' सामूहिक चळवळीतून...जळगाव : ‘महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली...
वाशीममध्ये मूग, उडीद नुकसानग्रस्तांना...वाशीम  ः जिल्ह्यात या खरीप हंगामात नुकसान...