नगर जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी अळीचे संकट

यंदा अतिपावसाने खरिपातील पिके गेली. आता रब्बीतील ज्वारीवर अमेरिकन लष्करी अळीचे संकट आले आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. जर ज्वारीचे पीक गेले तर दुष्काळापेक्षाही गंभीर संकट यंदा शेतकऱ्यांवर असेल. - शिवराज कापरे,सामनगाव, ता. शेवगाव, जि.नगर
ज्वारी पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे
ज्वारी पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे

नगर  ः खरिपात मक्याचे मोठे नुकसान करणाऱ्या अमेरिकन लष्करी अळीचा आता ज्वारी पिकावरही प्रादुर्भाव दिसून आला आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत सुमारे तीस टक्के क्षेत्रावरील ज्वारी पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी आता स्वतःच प्रयत्न सुरू केले असून, ज्वारीवर कीटकनाशकांची फवारणी केली जात आहे. या स्थितीची माहिती कृषी विभागाला नसल्याचे दिसत आहे.  

नगरसह राज्याच्या अनेक भागांत यंदा खरिपात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला. सुरुवातीच्या काळात अल्प प्रमाणात असलेला हा प्रादुर्भाव नंतर सुमारे साठ ते सत्तर टक्क्यांपर्यंत गेला. त्याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सोसावा लागला. कृषी विभाग, विद्यापीठे यांनी हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्याऐवजी केवळ शेतकऱ्यांनाच सल्ला देण्यावर भर दिला. आता या अमेरिकन लष्करी अळीचे संकट ज्वारी पिकावर येत आहे.

नगरसह राज्यातील सुमारे १५ ते २० जिल्ह्यांमध्ये रब्बीत ज्वारीचे क्षेत्र अधिक असते. नगर, मराठवाडा, विदर्भ, सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये ज्वारी हे प्रमुख पीक मानले जाते. एकट्या नगर जिल्ह्यामध्ये सुमारे पाच लाख हेक्टर क्षेत्रावर ज्वारीचे उत्पादन घेतले जाते. यंदा या प्रमुख पिकावरच अमेरिकन लष्करी अळीचे मोठे संकट आले आहे. गेल्या आठ दिवसांत शेवगाव, पाथर्डी, जामखेड यासह शेजारच्या बीड, शिरूर कासार, पाटोदा, सोलापूरमधील करमाळा तालुक्यात काही ठिकाणी ज्वारी पिकावर अमेरिकन लष्करी अळी दिसून आली आहे. ही अळी ज्वारी झाडाचा गाभा कुरतडताना दिसत आहेत. राज्यातील काही भागांत सर्वसाधारण वीस टक्के क्षेत्रावर सध्या अळीचा प्रादुर्भाव दिसत असून, तो रोखण्यासाठी शेतकरी फवारणी करत आहेत. 

एकतर यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून पुरेसा पाऊस नसल्याने चारापिकांवर परिणाम झाला. त्यातच खरिपातील मका अमेरिकन लष्करी अळीने मोठ्या प्रमाणात फस्त केला. नगर जिल्ह्यात खरिपात मक्याचे नुकसान झाल्याने त्याचा सर्वाधिक परिणाम जनावरांच्या चाऱ्यावर झाला. अनेक शेतकऱ्यांना मुरघास करता आला नाही. आता मक्यापाठोपाठ ज्वारीवरही अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. हा प्रादुर्भाव रोखता आला नाही, तर यंदा अभूतपूर्व चाराटंचाईला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागेल. 

ज्वारीवर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे नुकसान होत आहे. त्यामुळे ज्वारी जळू लागली आहे. नुकसान झालेले पीक काढून तेथे दुसरे पीक घेण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे फळकेवाडी (ता. शेवगाव) येथील पांडुरंग मरकड यांनी सांगितले.

उपाययोजना कधी करणार? राज्यात नगरसह काही भागांत ज्वारीवर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसत आहे. ही बाब गंभीर आहे. मात्र कृषी विभाग, कृषी विद्यापीठे व अन्य घटकांकडून अजूनही कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाहीत. कृषी विभागातील अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांनाच ज्वारीवर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याची माहिती नाही. त्यामुळे उपाययोजनांबाबत गांभीर्य दिसत नाही. ज्वारीचे पीक संकटात असताना उपाययोजना कधी करणार असा प्रश्न आता शेतकरी उपस्थित करत आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com