इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव

यंदा पहिल्यांदाच मक्याची एक एकरावर लागवड केली आहे. त्यावर दोन महिन्यांपासून लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. आत्तापर्यंत तीन वेळा फवारणी केली, तरीही लष्करी अळी आटोक्यात आलेली नाही. त्यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. - विजय खबाले, शेतकरी, भातनिमगाव, ता. इंदापूर.
लष्करी अळी नियंत्रणासाठी मार्गदर्शन करताना कृषी विभागाचे अधिकारी
लष्करी अळी नियंत्रणासाठी मार्गदर्शन करताना कृषी विभागाचे अधिकारी

पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात सुमारे ४५० हेक्टरवर मक्याची लागवड झाली आहे. त्यापैकी अडीचशे हेक्टरवरील मका पिकावर लष्करी अळीचा ४० ते ५० टक्के प्रादुर्भाव दिसून आला आहे. उर्वरित बारामती, दौंड या भागातही या अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मका पिकाचे मोठे नुकसान होण्याची भीती असून त्यावर उपाययोजना करण्यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.  

यंदा उशिराने पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मक्याची उशिराने लागवड करण्यास सुरवात केली आहे. मात्र, इंदापुरातील बावडा, भातनिमगाव, भिगवण, डहाळज, रूई न्हावी या गावातील अनेक शेतकऱ्यांनी मक्याची लवकर लागवड केली होती. त्यामुळे या भागात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. दौंड, बारामती, जुन्नर, आंबेगावमध्ये उशिराने मक्याची लागवड झाली आहे. त्यामुळे या भागात लष्करी अळीचा अद्याप प्रादुर्भाव झालेला आढळलेला नाही. मात्र पुढील काळात या भागात प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने कृषी विभागाने उपाययोजना सुरू केलेल्या आहे.

क्रॉपसॅपअंतर्गत कृषी सहायकांकडून सर्वेक्षण सुरू असून सल्ला देण्यात येत आहे. तसेच बारामती येथील राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था आणि बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. कृषी आयुक्तालयाने लष्करी अळीवरील उपाययोजनांसाठी घडीपत्रिका तयार केली आहे. त्यांचे वाटप शेतकऱ्यांना करण्यात येत आहे. जनजागृतीसाठी ३२ गावामध्ये शेतीशाळा घेण्यात येत आहे. यामध्ये एकात्मिक पीक व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाते आहे. आत्तापर्यंत सुमारे ९०० शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे. याशिवाय मे महिन्यातील शेवटचा व जूनमधील पहिल्या आठवड्यात उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहिमेअंतर्गत ९० गावांत मक्यावरील लष्करी अळीबाबत  जनजागृती मोहीम राबविण्यात आली होती. त्यानुसार शेतकरी योग्य त्या उपाययोजना करत आहेत. 

इंदापूर तालुक्यात मक्यावर लष्करी अळीचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. त्यासाठी कृषी विज्ञान केंद्र, राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. दौंड, बारामती भागात उशिराने मक्याची लागवड झाली आहे. त्यामुळे या भागात अळीचा प्रादुर्भाव अद्याप दिसून आलेला नाही, अशी माहिती उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com