अमेरिकन लष्करी अळीची कपाशीवरही चाल ! (video सुद्धा)

तीन फवारण्याकरूनही मका अळीने फस्त केला. दोनच दिवसांपूर्वी रोटाव्हेटर फिरवून संपूर्ण मका काढून टाकला. तर कपाशी पीक पाते व बोंड अवस्थेत आहे. तीन दिवसांपासून कपाशीवर ३० टक्के प्रादुर्भाव स्पष्टपणे दिसायला लागला. आधीच मक्याचे नुकसान आणि आता कपाशीवर अळी, खूप नुकसान होत आहे. - अर्जुन उदागे, शेतकरी, सुसरे, ता. पाथर्डी
कापसावर अमेरिकन लष्करी अळी
कापसावर अमेरिकन लष्करी अळी

नगर : अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा) मका पिकात सर्वत्र हाहाकार उडवलेला असतानाच राज्याचे प्रमुख खरीप पीक असलेल्या कपाशी पिकातही या किडीने आता शिरकाव केल्याचे स्पष्ट झाले आहे. नगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या मक्याच्या शेताला लागून असलेल्या बीटी कपाशीत बोंडे आणि फुलांवर या अळीने आक्रमण केले आहे. या शेतातील सुमारे २० ते ३० टक्के कपाशीवर अळीचा २० ते ४० टक्के प्रादुर्भाव आढळला असून काही बोंडात अळीने प्रवेश केल्याने गांभीर्य अधिकच वाढले आहे. कपाशी पिकातील या अळीची महाराष्ट्रातील ही पहिलीच नोंद असावी, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

अमेरिकन लष्करी अळी (स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा) या किडीने संपूर्ण मका पिकावर महाराष्ट्र व्यापत आता रुद्र रूप धारण केले आहे. मका हे या किडीचे मुख्य लक्ष्य असले तरी राज्यातील ऊस, ज्वारी, बाजरी, नाचणी आदी तृणधान्य पिकांमध्येही या अळीने कमी-जास्त प्रमाणात आपले अस्तित्व दाखवले आहे. पाने, खोडांपासून ते कणसांपर्यंत कोणताही भाग खाण्यापासून शिल्लक न ठेवणाऱ्या या अळीच्या प्रादुर्भावामुळे अनेक शेतकऱ्यांना आपले प्लॉट सोडून देण्याची किंवा उपटून टाकण्याची वेळ आली आहे. यात भर म्हणून की काय या अळीने आता तृणधान्यांव्यतिरिक्त कपाशीसारख्या नगदी पिकातही आपला शिरकाव केला आहे. नगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यातील सुसरे या गावात अर्जुन मुरलीधर उदागे या शेतकऱ्यांकडे कापूस पिकात या किडीचा प्रादुर्भाव नुकताच आढळला आहे. कपाशीची बोंडे व फुले फस्त करण्यास या अळीने सुरवात केली आहे.   अमेरिकन लष्करी अळीचा कपाशीवरील हल्ला प्रत्यक्ष पहा.. video

कपाशीसाठी मोठा धोका अमेरिकन लष्करी अळीची कपाशी पिकातील ही राज्यातील पहिलीच नोंद ठरण्याची शक्यता आहे. कपाशी हे राज्याचे मुख्य खरीप पीक असून सरासरी सुमारे ४४ लाख हेक्टर क्षेत्रावर या पिकाची लागवड केली जाते. विदर्भ, मराठवाडा व खानदेशातील बहुतांश शेतकऱ्यांचे अर्थकारण याच पिकावर अवलंबून आहे. हंगामात एक हजारपर्यंत अंडी देण्याची मादी पतंगाची क्षमता, पिकाचे नुकसान करण्याचे तीव्र स्वरूप, कमी कालावधीत शंभर किलोमीटरपेक्षाही अधिक प्रवास करण्याची पतंगांची क्षमता व एकाच पिकावर अवलंबून न राहाता असंख्य पिकांवर उपजीविका करण्याची वृत्ती या किडीच्या बाबी लक्षात घेण्याजोग्या आहेत. सुमारे ८० ते १०० पिकांना आपले भक्ष बनविण्याची तिची क्षमता आहे. हा सर्व विचार करता येत्या काळात ही अळी राज्यातील अन्य कपाशी पट्ट्यातही शिरकाव करण्याचा धोका निर्माण झाला आहे. वेळीच दक्ष न राहिल्यास व प्रतिबंधक उपाय न केल्यास मक्याप्रमाणेच संपूर्ण कापूस उद्योग संकटात त्यामुळे धोक्यात येण्याची चिन्हे आहेत.  

सातत्याने निरीक्षण ठेवण्याची गरज  अमेरिकन लष्करी अळी या विषयातील तज्ज्ञ व सिक्थ ग्रेन या कंपनीचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. अंकुश चोरमुले म्हणाले, की आत्तापर्यंतच्या माझ्या अभ्यासानुसार अमेरिकन लष्करी अळीची ही महाराष्ट्रातील कपाशीवरील पहिलीच नोंद असावी. जगभरात सुमारे ८० पिकांत या किडीची नोंद झाली आहे. मका हे या किडीचे प्राधान्याचे पीक असल्याने ज्या भागात त्याचे क्षेत्र अधिक आहे तेथे अन्य पिकांतही ही अळी शिरकाव करण्याचा धोका आहे. पाथर्डी भागात असेच झाले असावे. मका काढणीनंतर या अळीने कपाशीवर अंडी घातली असण्याची शक्यता आहे. कपाशी व्यतिरिक्त भात, सोयाबीन या पिकांतही अळीचा धोका आहे. विदर्भात मराठवाड्याच्या तुलनेत मक्याचे क्षेत्र कमी असल्याने तेथे कपाशी पिकात हा धोका तुलनेने कमी राहू शकतो. तरीही बेसावध न राहाता अत्यंत जागरूकपणे सातत्याने कपाशी, सोयाबीन आदी पिकांचे सातत्याने सूक्ष्म निरीक्षण करीत राहण्याची गरज असल्याचेही डॉ. चोरमुले यांनी सांगितले. 

संपूर्ण मका काढून टाकला... अर्जुन उदागे म्हणाले, २२ जूनच्या दरम्यान दीड एकरात कपाशीची लागवड केली. १ जुलै च्या दरम्यान ३ एकरात मका केला. क्रॉपसॅपच्या माध्यमातून आम्ही ३ एकर मका पिकाचे उत्कृष्ट व्यवस्थापन केले होते. दोन महिन्यांत तीन फवारण्या केल्या. कामगंध सापळे, पक्षी थांबे उभारले, मात्र तरीही मका पूर्णपणे नष्ट झाला. दोनच दिवसांपूर्वी रोटाव्हेटर फिरवून संपूर्ण मका काढून टाकला. कपाशी पाते व बोंड अवस्थेत आहे. तीन दिवसांपासून प्रादुर्भाव स्पष्टपणे दिसायला लागला. कपाशीवर साधारणत: ३० टक्के सध्या प्रादुर्भाव आहे. अळीने मक्याचे पूर्ण नुकसान केले. एकरी ३० ते ३५ क्विंटल उत्पादन मिळाले असते, मात्र अखेर संपूर्ण मका त्यांना काढून टाकावा लागला. तीन एकरात मिळून दीड लाखावर नुकसान अर्जुन उदागे यांना सहन करावे लागले.

तज्ञ्ज, कृषी अधिकाऱ्यांनी केली पाहणी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कापूस सुधार प्रकल्पातील कीटकशास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार भुते व कृषी तंत्रज्ञान विस्तार केंद्राचे सहायक प्राध्यापक डॉ. दत्तात्रय पाचारणे यांनी सुसरे गावातील या प्रादुर्भावित क्षेत्राला भेट दिली. क्रॉपसॅपच्या माध्यमातून तालुका कृषी अधिकारी प्रवीण भोर, कृषी सहायक पवन राठोड, एस. जे. कटके, एम. बी. गर्जे, मंडल कृषी अधिकारी या प्रसंगी उपस्थित होते. पाथर्डी (जि. नगर) तालुक्यात २८ हजार हेक्टर क्षेत्रावर सरासरी कपाशी घेतली जाते, मात्र यंदा यात चार हजार हेक्टर क्षेत्र वाढून ३२ हजार हेक्टरवर हे क्षेत्र गेले आहे. तर सरासरी ५३३ हेक्टर क्षेत्रावर असणाऱ्या मक्याची यंदा १५८२ हेक्टरवर लागवड झाली आहे. 

सुसरे गावातील अळीच्या प्रादुर्भावाचे स्वरूप... 

  • बोंडे व फुलांमध्ये अळीचा शिरकाव
  • बोंडाला छिद्रे पाडून आतील भाग अळी फस्त करीत आहे
  • अळी तिसरी ते पाचव्या अवस्थेत येथे आढळली
  • बोंड फस्त केल्यानंतर अळीने विष्ठाही मोठ्या प्रमाणात टाकली
  • अळीचा रंग तपकिरी, काळसर असा आढळून आला आहे  
  • मक्यातून कपाशीत स्थलांतर : डॉ. भुते मका पिका शेजारीच कपाशीचा प्लॉट होता. अळीच्या मोठ्या प्रादुर्भावामुळे रोटोव्हेटर फिरवून या शेतकऱ्याने मका काढून टाकला. मात्र, मक्यावरील अळी शेजारच्या कपाशी पिकात स्थलांतरित झाली. कपाशी हे पर्यायी पीक तिला मिळाले, तसेच ते पाते, फुल, बोंडे अवस्थेत असल्याने तिला खाद्य मिळाले. रिमझिम पाऊस, आर्द्रता अळीच्या वाढीस पोषण ठरले. मका काढणीनंतर ही अळी अन्य यजमान पिकात जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कापूस सुधार प्रकल्पातील कीटकशास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार भुते यांनी दिली.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com