अमेरिकन लष्करी अळीचे मका पिकावर आक्रमण

खरिपाची पेरणी होऊन महिना उलटत नाही तोच राज्यभरात मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा) आक्रमण केले आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा अळीने लवकर चाल केली.
fall army worm
fall army worm

पुणे ः खरिपाची पेरणी होऊन महिना उलटत नाही तोच राज्यभरात मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा) आक्रमण केले आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा अळीने लवकर चाल केली. सध्या अनेक ठिकाणी कमी अधिक असलेला हा प्रादुर्भाव येणाऱ्या काळात वाढण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात मात्र ५० टक्क्यांपर्यंत प्रादुर्भाव असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे राज्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.

यंदाचा खरीप शेतकऱ्यांची कसोटी पाहणारा ठरत आहे. निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे उगवण न झाल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर असतानाच आता मक्यावर लष्करी अळीने चाल केली आहे. राज्यातील सर्वच मका उत्पादक जिल्ह्यांमध्ये अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे अळी नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना फवारण्या कराव्या लागत आहेत.  पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील शेळगाव, निमगाव, वळकुटे, अंथुर्णे, वालचंदनगर, कळस, भिगवण, बावडा, भातनिमगाव, लाखेवाडी, डहाळज, रूई न्हावी परिसरात एक ते दीड हजार हेक्टरवर लष्करी अळीचा ४० ते ५० टक्के प्रादुर्भाव झाला आहे. दौड, बारामती, जुन्नर, खेड, शिरूर, आंबेगाव तालुक्यांमध्येही प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, मोहोळ, उत्तर सोलापूर, माळशिरस, अक्कलकोटच्या काही भागांत लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसत आहेत. मुख्यतः पानावर पांढरे ठिपके असल्याचे, पाने कुरतडली गेल्याचे तसेच कोंबात अळीची अंडी उबवल्याचेही दिसत आहे. नगर जिल्ह्यात दहा ते पंधरा टक्के म्हणजेच सहा ते सात हजार हेक्टर क्षेत्रावर अळीने आक्रमण केले असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. चार दिवसांपासून पाऊस थांबल्याने प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नाशिक जिल्ह्यात मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा ३ ते ४ टक्के प्रादुर्भाव असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. सुरुवातीला देवळा व सटाणा तालुक्यांतील काही भागांत लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला होता. मात्र, वेळीच उपाययोजना केल्याने व पाऊस झाल्याने हा प्रादुर्भाव कमी झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर, सिल्लोड, फुलंब्री तालुक्यांत काही ठिकाणी मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. दुसरीकडे जालना जिल्ह्यातील भोकरदन, जाफराबाद, जालना तालुक्यांत काही ठिकाणी अळी मका पिकावर आक्रमण करत असल्याचे निदर्शनास आले आहे. बुलडाणा जिल्ह्यात मक्याची लागवड एक ते १० जून दरम्यान झालेली आहे. पीक १५ दिवसांचे होताच पाने व पोंग्यामध्ये अळी दिसून येत आहे. काही ठिकाणी अमेरिकन लष्करी अळीचा पाच ते दहा टक्के प्रमाणात प्रादुर्भाव आढळून येत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी प्रादुर्भावाचे प्रमाण कमी-जास्त आहे.

लष्करी अळीचा प्रादुर्भाव

  • गेल्या वर्षीच्या तुलनेत लवकर आक्रमण
  • मका पिकाच्या पाने व पोंग्यांमध्ये डंख
  • काही ठिकाणी ज्वारीवर देखील प्रादुर्भाव
  • नगर जिल्ह्यात सात हजार हेक्टर क्षेत्र प्रभावित
  • इंदापूर तालुक्यात ५० टक्क्यांपर्यंत प्रादुर्भाव
  • सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी प्रादुर्भाव
  • बुलडाणा जिल्ह्यात १५ टक्क्यांपर्यंत नुकसान
  • प्रतिक्रिया चाऱ्यासाठी अर्ध्या एकरवर पेरणी केलेल्या मका आणि ज्वारी पिकांवर लष्करी अळी आढळून आली आहे. मक्याचे पोंगे खाल्ल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. वाढ खुंटली आहे.  - हनुमान आळसे, शेतकरी, ब्रह्मपुरी, जि. परभणी.   

    अमेरिकन लष्करी अळीचे प्रभावी नियंत्रण

  • वेळेवर कोळपणी व खुरपणी करून शेत तणमुक्त ठेवावे. अंडीपूंज, समूहातील लहान आणि मोठ्या अळ्या हाताने वेचून रॉकेलमिश्रित पाण्यात टाकून नष्ट कराव्यात.
  • सामूहिकरीत्या मोठ्या प्रमाणात नर पतंग आकर्षित करून मारावेत. यासाठी १५ कामगंध सापळे प्रतिएकरी लावावेत. सर्वेक्षणासाठी ५ सापळे प्रति एकरी लावावेत.
  • पीक ३० दिवसांपर्यंतचे असल्यास बारीक वाळू किंवा बारीक वाळू व चुन्याचे ९:१ प्रमाण करून पोंग्यात टाकावे.
  • ट्रायकोग्रामा प्रीटीओसम किंवा टीलेनोमस रेमस या मित्रकिटकांची परोपजीवीग्रस्त ५० हजार अंडी प्रतिएकर एक आठवड्याच्या अंतराने तीन वेळा शेतात सोडावीत. 
  • शिफारस केलेली कीटकनाशके
  • रोपावस्था ते सुरुवातीची पोंग्याची अवस्था (५-१० टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे) जैविक उपाय (प्रति १० लीटर पाणी) (खालीलपैकी एक पर्याय वापरावा.)

  • निंबोळी अर्क ५ टक्के 
  • अझाडीरॅक्टीन (१५०० पीपीएम) ५० मिली
  • मेटाऱ्हायझियम ॲनिसोप्ली ५० ग्रॅम
  • नोमुरिया रिलाई ५० ग्रॅम
  • बॅसिलस थुरिन्जिएन्सिस कुर्सटाकी प्रजाती -२० ग्रॅमरासायनिक उपाय (प्रति १० लीटर पाणी)(खालीलपैकी एक पर्याय वापरावा.)
  • मध्यम ते शेवटची पोंग्याची अवस्था (१०-२० टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे)
  • इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी ४ ग्रॅम
  • थायामेथोक्झाम १२.६ टक्के अधिक लॅंबडा सायहॅलोथ्रिन ९.५  टक्के (झेडसी)- ५ मिली 
  • क्लोरॲट्रानिलीप्रोल १८.५ टक्के एससी- ४ मिली
  • स्पायनोटोरम ११.७ टक्के एससी- ९ मिली
  • क्लोरॲंट्रानिलीप्रोल ९.३ % अधिक लॅंबडा सायहॅलोथ्रिन ४.६ % झेडसी- ५ मिली
  • विशेष सूचना

  • रासायनिक कीटकनाशकांची फवारणी चारा पिकांवर करू नये. एकाच रासायनिक कीटकनाशकाची फवारणी हंगामात दोन पेक्षा जास्त वेळा करू नये. 
  • तुऱ्याची अवस्था व त्यानंतर फवारणी टाळावी.  फवारणी करताना मजुरांच्या सुरक्षेची योग्य काळजी घ्यावी. 
  • एकात्मिक कीड व्यवस्थापन करावे. प्रतिक्रिया... आठ एकरांत मका लागवड केली आहे. दहा दिवसांपूर्वी पोंग्यामध्ये सर्वत्र अळ्या दिसून आल्या. यावर तातडीने एक फवारणी केली. फवारणी पोचू शकली नाही अशा ठिकाणी पिकाचे नुकसान दिसून येत आहे. आगामी काळात अळीचा प्रादुर्भाव कसा असेल याची चिंता आहे.  ​ - गोपाल महाजन, धामणगाव बढे, ता. मोताळा जि. बुलडाणा
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com