अमेरिकन लष्करी अळीच्या तडाख्यात कोल्हापूर जिल्ह्यातील रब्बी पिके

या किडीबाबत जागृती करण्यासाठी आम्ही युद्ध पातळीवर उपाय सुरू केले आहेत. एस.एम.एस द्वारे माहिती, तालुकावार गाववार प्रशिक्षणे, शास्त्रज्ञांच्या भेटी, कृषी वार्ताफलकावर माहिती आदी माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करीत आहोत. आतापर्यंतच्या आमच्या माहितीनुसार जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच तालुक्‍यांत ही अळी कमी जास्त प्रमाणात आढळत आहे. आम्ही शेतकऱ्यांशी संपर्क प्रतिबंधात्मक माहिती देत आहोत. - भाग्यश्री पवार- फरांदे, कृषी उपसंचालक, कोल्हापूर
लष्करी अळी
लष्करी अळी

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोवळ्या रब्बी पिकांवर आता अमेरीकन लष्करी अळीचा (स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा) प्रादुर्भाव सुुरू झाला आहे. यामुळे खरिपाच्या नुकसानीतून सावरणाऱ्या शेतकऱ्यांना लष्करी अळीने पुन्हा धक्का दिला आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍यांतील मका, रब्बी ज्वारी व उसावर ही अळी हल्ला करीत आहे. सध्या सरासरी पाच टक्के क्षेत्र या किडीच्या प्रादुर्भावाखाली आले आहे. काही ठिकाणी पंधरा टक्केपर्यंत नुकसान आहे. वेळीच उपाय न केल्यास ही तीव्रता वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.  कृषी विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यातील सुमारे साडेतीनशे हेक्टरवरील पिकांवर ही कीड आली आहे. तर साधारणपणे तीनशेच्या आसपास गावात ही कीडदिसून येत आहे. बहुतांशी करून हातकणंगले, शिरोळ, पन्हाळा, करवीर, गडहिंग्लज, कागल तालुक्‍यातील अनेक पिकांवर ही अळी दिसत आहे. काही ठिकाणी ती प्राथमिक अवस्थेत दिसून येत आहे. यामुळे वेळीच उपाय केल्यास भविष्यात होणारे नुकसान टळू शकते. परिणामी शेतकऱ्यांनी तातडीने रब्बी पिकांवर अशी अळी आढळल्यास तातडीने प्रतिबंधात्मक उपाय करावेत असे आवाहन केले आहे. जिल्ह्यात रब्बी पेरण्या वेगात आहेत अनेक ठिकाणी रोपांची नुकतीच उगवण झाली आहे.

कृषी विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका दिवसात तब्बल अनेक किलोमीटरचा प्रवास ही अळी करू शकते. यामुळे सलग प्लॉटवरील पिकांमध्ये या अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले. या किडीची मादी एकाच वेळेस 1500 अंडी पुंजक्‍यामध्ये देत असल्याने अळीच्या वाढीचा वेग जोरदार होऊन रब्बीचे क्षेत्रच धोक्‍यात येण्याचा संभव निर्माण झाला आहे. या अळीचे यजमान पीक हे ऊसदेखील आहे. यामुळे नव्याने लागवडी झालेले उस प्लॉट या अळीचे लक्ष्य ठरू शकतात. परिणामी नवीन ऊस लागवड केलेल्या व लागण केलेल्या उसावरही ही अळी मार्गाक्रमण करीत असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. असे होत आहे नुकसान

  • नुकत्याच अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या पाने खाल्ल्याने पानांची वाढ खुंटली
  • अंकुरलेल्या शेंड्यावर हल्ला केल्याने झाडाच्या वाढीची क्षमता नष्ट होण्याचा धोका
  • कृषी विभागाच्या शिफारशी 

  • कामगंध व प्रकाश सापळ्याचा वापर
  • अंडीपूंज व अळ्या वेचून नष्ट करणे 
  • पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी
  • प्रतिकारक वाणांची पेरणी
  • या किडीची नैसर्गिक शत्रू ट्रायकोडर्मा, टिलेनोमस, चिलोनस, आंदिंचे संवर्धन करणे
  • सुचविलेल्या कीडनाशकांची फवारणी करणे
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com