परागीभवन खुंटल्याने उत्पादनात घट: अमित गोडसे

परागीभवन खुंटल्याने उत्पादनात घट: अमित गोडसे
परागीभवन खुंटल्याने उत्पादनात घट: अमित गोडसे

पुणे: शेतीमधील वाढत्या रासायनिक कीटकनाशकांच्या वापरामुळे मधमाश्‍यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. परिणामी, मधमाश्यांव्दारे होणाऱ्या परागीभवनाची प्रक्रिया खुंटल्याने शेतीचे जीवनचक्र बिघडले. त्याचा परिणाम शेतीच्या उत्पन्नावर झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांमागे मधमाश्यांचे कमी होत चाललेले प्रमाण हेदेखील एक कारण असल्याचे मत मधमाशी संवर्धक अमित गोडसे यांनी व्यक्त केले.  १४व्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त मधमाशी संवर्धक अमित गोडसे यांच्याशी मंगळवारी (ता. ७) वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी ते बोलत होते. गोडसे म्हणाले की, ‘‘गांडूळ, बेडूक, साप हे जसे शेतकऱ्यांचे मित्र आहेत. त्यापेक्षाही मधमाशीदेखील शेतकऱ्यांसह वसुंधरेचे मित्र आहेत. मात्र, शेतीमधील वाढत्या रासायनिक कीटकनाशकांच्या वापरामुळे मधमाश्यांच्या विविध जाती धोक्यात आल्या असून, निसर्गचक्रात मोलाची भूमिका बजावणारी एक साखळी निखळली जात आहे. शेतातील परागीभवनाची प्रक्रिया खुंटल्याने शेतकऱ्यांचा बी-बियाण्यांचा खर्च वाढला आणि शेती हा न परवडणारा व्यवसाय ठरू लागला आहे. मधमाश्या स्थलांतरित होत असताना त्या एका ठिकाणी पंधरा दिवस ते चार-पाच महिने एवढाच काळ वास्तव्य करीत असतात. मधमाश्या या ग्रामीण भागातील जंगल, शेत या ठिकाणी पोळे करण्यापेक्षा शहरी भागात पोळे तयार करण्यास अधिक प्राधान्य देतात, असा धक्कादायक आणि आश्चर्यकारक निष्कर्ष हा अभ्यास करताना पुढे आला आहे.’’ ‘‘शहरात उपलब्ध होत असलेले भरपूर पाणी, रसायनविरहित फुले आणि उंच इमारतींमुळे त्यांना पोळे तयार करण्यासाठी उंचावर मिळणारी जागा या तीन कारणांमुळे त्यांनीही शहराकडे धाव घेतली आहे. शहरी लोकांना मध हवे आहे. पण, मधमाश्या नकोत, या चमत्कारिक मागणीला आम्हाला सामोरे जावे लागते. अशावेळी आम्ही पोळ्यांची पुनर्स्थापना करतो. मधमाश्यांच्या पोळ्यातील राणीमाशी मेल्यास त्यांची संपूर्ण वसाहत नष्ट होते. त्यामुळे आम्ही शास्त्रशुद्ध पद्धतीने या पोळ्यांची पुनर्स्थापना करीत असतो,’’ असे ते  म्हणाले.  ‘‘पालघर, ठाणे यांसारख्या शहरांपासून आदिवासी आणि ग्रामीण पाड्यांपर्यंत आम्ही प्रशिक्षित चमू तयार करीत असून, मधमाश्यांच्या संवर्धनाचे काम करीत आहोत. ‘वेस्ट टू वेल्थ’ हा आमचा प्रवास सुरू असून, आरोग्य आणि सौंदर्यप्रसाधन उद्योगात मध या नैसर्गिक घटकाचा कसा समावेश करून घेता येईल, यादृष्टीनेदेखील आमचे प्रयत्न सुरू आहेत. भारतात आढळणाऱ्या विविधतेमुळे वेगवेगळ्या चवीचे, वेगवेगळ्या रंगांचे आणि वेगवेगळ्या औषधी गुणधर्मांचे मध आपल्याला उपलब्ध होते. त्याचा उपयोग करून घेण्यासाठी मधमाश्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे,’’ असेही गोडसे  म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com