शरद पवार, राहुल गांधींनी ३७० कलमाबाबत भूमिका स्पष्ट करावी : केंद्रीय मंत्री अमित शहा

सोलापूर येथील सभेत बोलताना केंद्रीय मंत्री अमित शहा
सोलापूर येथील सभेत बोलताना केंद्रीय मंत्री अमित शहा

सोलापूर  ः कॉँग्रेसमुळे काश्मीर देशापासून दुरावलेला होता, मात्र नरेंद्र मोदींनी तो आपल्यात आणला. काश्‍मीर कायमस्वरूपी भारताचा झाला. ३७० कलम रद्द करून पाकिस्तानचे मनसुबे उधळून लावले. पंतप्रधान मोदी यांच्याशिवाय कोणत्याही पंतप्रधानामध्ये हे कलम रद्द करण्याची हिंमत नव्हती, असे सांगताना देशहिताच्या या प्रश्‍नावर शरद पवार आणि राहुल गांधी यांनी आपली भूमिका स्पष्ट  करावी, असे आव्हान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यातील समारोप येथे श्री. शहा यांच्या उपस्थितीत रविवारी (ता. १) सोलापुरात झाला. त्या वेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पक्षाचे प्रदेश प्रभारी भूपेंद्र यादव, खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी, रणजितसिंह निंबाळकर, माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी आदी या वेळी उपस्थित होते. 

श्री. शहा म्हणाले, की राहुल गांधी म्हणतात काश्‍मीर अशांत आहे. मात्र ५ ऑगस्टनंतर एकही गोळी काश्‍मीरमध्ये चालली नाही. राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा वापर पाकिस्तान करत आहे. राहुल गांधी आणि पाकिस्तान यांचं बोलणं एकच आहे. आम्हाला हे लोक सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे मागत होते. मात्र स्वतः इम्रान खान यांनीदेखील मान्य केलं की सर्जिकल स्ट्राइक झालं आहे. मैदानात या आम्ही दोन हात करायला तयार आहोत असे सांगताना देशाच्या सुरक्षेची तडजोड केली जाणार नाही.

विरोधकांनी केंद्र आणि राज्यात सत्ता असताना घोटाळा केला. शहिदांसाठी केलेल्या घरातदेखील घोटाळा केला. विरोधक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे फक्त आमिष दाखवत होते. मात्र, आम्ही जलपूजन करत स्मारकाच्या कामाला सुरवात केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचेदेखील  काम सुरू केले आहे.  कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी हे लोकशाही मूल्यांना मानत नाहीत. कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये फक्त घराणेशाही आहे, असे शहा म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.    धनंजय महाडिक, राणा जगजितसिंह पाटील, जयकुमार गोरे यांचा प्रवेश  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत या वेळी कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक, उस्मानाबादचे आमदार राणा जगजितसिंह पाटील, माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com