अमरावती विभागात १२८९ गावांची पैसेवारी कमी

सुधारित पैसेवारीत अमरावती विभागातील १,२८९ गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी आल्याने त्यांना दुष्काळी स्थितीचा लाभ मिळणार आहे. तर ५,९१८ गावांची पैसेवारी त्यापेक्षा अधिक आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र

अमरावती : या वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी व संततधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. विभागीय आयुक्तांनी अमरावती विभागाची सुधारित पैसेवारी जाहीर केली असून, ती ५३ पैसे आहे. सुधारित पैसेवारीत विभागातील १,२८९ गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी आल्याने त्यांना दुष्काळी स्थितीचा लाभ मिळणार आहे. तर ५,९१८ गावांची पैसेवारी त्यापेक्षा अधिक आल्याने दुष्काळाच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे.

अमरावती विभागात खरीप हंगामात ३१ लाख ४२ हजार १९६ हेक्टर क्षेत्रात प्रत्यक्षात पेरणी झाली होती. एकूण पेरणी क्षेत्राच्या सरासरी ९७ टक्के क्षेत्र पेरणीखाली आहे. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये पिकांना अतिवृष्टी व संततधार पावसाचा सर्वाधिक तडाखा बसला. महसूल व कृषी विभागाने केलेल्या संयुक्त पंचनाम्यानंतर नुकसानाचे क्षेत्र जाहीर केले आहे. यामध्ये ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झालेल्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना नव्या निकषांप्रमाणे मदतनिधी जाहीर करण्यात आला आहे.

अमरावती विभागात ५ लाख ११ हजार ३७ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झाल्याचा संयुक्त अहवाल आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील १ लाख ६५ हजार ७६, अकोल्यातील ३८०५, यवतमाळ १ लाख ७७ हजार ४४७, बुलडाणा १ लाख ३३ हजार ९७२ व वाशीम जिल्ह्यातील ४५ हजार ४८५ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. विभागातील ५ लाख ४६ हजार ५६६ शेतकऱ्यांना या अतिवृष्टी व संततधार पावसाचा फटका बसला आहे.

महसूल विभागाने जाहीर केलेल्या सुधारित पैसेवारीत अमरावती विभागातील ५२ तालुक्यांतील ७ हजार २०७ गावांपैकी १२८९ गावांतच दुष्काळी स्थिती असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे उर्वरित ५ हजार ९१८ गावांना दुष्काळी स्थितीचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा भ्रमनिरास झाला आहे. खरिपातील एकूण स्थिती व नुकसान बघता शेतकऱ्यांना मोठ्या आशा होत्या; मात्र त्यावर पाणी फेरले गेले आहे. जिल्हानिहाय ५० पैशांपेक्षा कमी-अधिक असलेली गावांची संख्या...

जिल्हा ५० पैशांपेक्षा कमी ५० पैशांपेक्षा अधिक
अमरावती ३०९ १५६८
अकोला ०० ९९०
यवतमाळ २४ २०२२
वाशीम २२२ ५७१
बुलडाणा ७४२ ६७७
एकूण १२८९ ५९१८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com